February 25, 2024
Friends Forever article by Sunetra Joshi
Home » ज्याची त्याची जागा…
मुक्त संवाद

ज्याची त्याची जागा…

तुला काय आता नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या मग माझी काय आठवण येणार ? असे आपण म्हणतो पण तसे कधीच नसते. ज्याची त्याची जागा ही जिथे आहे तिथे रिकामीच राहते ती व्यक्ती गेल्यावर… आणि त्याचे महत्त्व कितीही काळ लोटला तरी तितकेच असते..

सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व आहे. परमेश्वर सुध्दा एकासारखा दुसरा निर्माण करत नाही. म्हणुनच प्रत्येकाचे बोटांचे ठसे वेगळे असतात. एक राजा जातो त्याच्या जागी दुसरा येतो. पण… म्हणून तो पहिल्याची जागा घेतो का ? तर नाही. तो त्या जागेवरच काम पाहतो. आणि म्हणुनच आपण पण नेहमी एकाची दुसर्‍याशी तुलना करतोच ना. तर तसेच हे प्रत्येक व्यक्तीच्या मनातल्या जागेला सुध्दा लागू होते. आपल्याला आयुष्यात कोण भेटणार ? कधी भेटणार ? अगदी किती काळासाठी हे सुद्धा ठरलेले असते. आपण म्हणतो तेवढाच ऋणानुबंध होता वगैरे. तेव्हा मुद्दा हा आहे की अशी एकाची जागा दुसरा कुणी घेऊ शकतो का ?

लहानपणी शाळेत गेलो की मित्र होतात. त्यातला एखादा खूप आवडतो. गट्टी जमते. एकमेकांना भेटल्याशिवाय करमत नाही. मग कधीतरी शाळा बदलते किंवा गाव बदलते. नवीन मित्र होतात. तिथेही कुणी जिवाभावाचे होते आणि तशीच गट्टी जमते. असे पुढे पुढे होतच राहते. पण…

जे सुटले त्यांची जागा दुसरे कुणीच घेऊ शकत नाही. प्रत्येकाची एक स्वतंत्र जागा आपल्या मनात असते. कितीही मोठे झालो तरी तो मित्र आठवला की चुकल्यासारखे होतेच. पुन्हा एकदा तरी भेटायला हवा असे वाटतेच की. जसे की आईवडील सुध्दा. ते नसतात तेव्हा आईवडीलांसारखे कुणी भेटतातही पण ते… सारखे असतात ते नाही. त्यामुळे ती रिकामी जागा भरत नाही. ती तशीच राहते. फक्त कुणी त्या सारखे भेटल्याने त्या उणीवेची तीव्रता थोडी कमी होते. मग कुणी कितीही माया केली तरी सुखात किंवा दुःखात आज ते असायला हवे होते. त्यांना किती आनंद झाला असता. किंवा त्यांच्या जवळ मन मोकळे करता आले असते असे वाटतेच.

कधीकधी दोनचार मुले असतात. त्यातला एखादा जवळ असतो एखादा किंवा दुसरा दूर असतो. पण एक जवळ आहे म्हणून दुसर्‍याची आठवण येत नाही किंवा कमी जाणवत नाही असे थोडीच आहे ? जो तो त्याच्या जागी प्रिय असतो. अगदी आपले गाव घ्या. आपण जगाच्या पाठीवर कुठेही असा अगदी परदेशात सुद्धा. खरे तर तिथे सगळ्या सुखसोयी असतात  तरी पण आपले गाव आपल्याला तेवढेच प्रिय असते. अगदी आपण जिथे राहतो तिथे कितीही सुखसोयी असू देत. कितीही आनंदात असू तरी मनातली ती जागा आपण दुसर्‍या कुणाला नाही देऊ शकत.

अगदी छोट एक उदाहरण आपली गान कोकिळा लतादिदी.. तिचा गोड आवाज… आपल्याकडे कितीतरी चांगल्या गायिका होत्या आल्या आणि होत आहेत. पण… लता ती लता… तसेच लता ती लता म्हटले म्हणजे आशा कमी आहे का तर नाही. आशा ती देखील आशाच.. म्हणजे आपल्या आशा भोसले हो. तर असा हा आपल्या मनात सगळ्यांसाठी स्वतंत्र कप्पा असतोच. तो तसाच रिकामा राहतो. वरवर बघणार्‍याला तिथे दुसरा कुणी दिसत असेलही पण ज्याचे त्यालाच ते कळते.
कुणाच्या जवळचे कुणी जाते तेव्हा पण आपण जगण्यासाठी काही आधार शोधतो. आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोच ना. पण म्हणून ती पोकळी नाही भरून येत. आजुबाजुचे धागे त्या पोकळीला वाढू देत नाहीत इतकेच.

तुला काय आता नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या मग माझी काय आठवण येणार ? असे आपण म्हणतो पण तसे कधीच नसते. ज्याची त्याची जागा ही जिथे आहे तिथे रिकामीच राहते ती व्यक्ती गेल्यावर… आणि त्याचे महत्त्व कितीही काळ लोटला तरी तितकेच असते.. त्यामुळेच आपण नेहमी म्हणतो झाले बहू होतील बहू पण या सम हा… पटते का ?

Related posts

प्रेम चिरंतन…

मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग

पुन्हा नव्याने…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More