July 16, 2024
Awaking Culture Environment Drama book by Baban Shinde
Home » संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…
काय चाललयं अवतीभवती

संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…

मुलांच्या मनात संस्कार, संस्कृती आणि पर्यावरणाची जनजागृती करणाऱ्या ‘निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम ‘ या सुंदर नाटिकेचे लेखन बबन शिंदे यांनी केलेले आहे.

प्रा. रामदास केदार

उदगीर

बबन शिंदे हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील प्रसिद्ध कवी असून त्यांचे काटेरी वाटा, पोटमारा हे कविता संग्रह, प्रांजळ मन, एकोपा, बडबडी बबली, आमच्या गावात आमची शाळा हे बालकविता संग्रह. संतचरित्र, बुरुजावरचे भूत, सत्कार्याचा आनंद, छोट्यांच्या आटापिटा हे कुमार कथासंग्रह. गोष्ट आधुनिक संताची दीर्घ कथा संग्रह. मराठवाड्याचे बालसाहित्य आकलन आणि समीक्षा, धन्या, माणिक झाला राष्ट्रसंत हे किशोर कादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचा वा. गो. मायदेव बालवाङ्मय पुरस्कारासह इतर महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. बालभारती चौथीच्या अभ्यासक्रमात त्याच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

एकविसावे शतक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असले तरी आपण आपल्या स्वार्थासाठी जुन्या रुढी परंपरेला, संस्कार आणि संस्कृतीला फाटा देत पर्यावरणऱ्हासाला कसे कारणीभूत ठरत आहोत ? तसेच इंटरनेटच्या जाळ्यात संपूर्ण जग व्यापल आणि याचा मोठा परिणाम आजच्या बालकांच्या मनावर कसा होतो आहे ?. औद्योगिक वसाहती, उद्योगधंदे, शिक्षणांचे बाजारीकरण, राजकारणी नेत्यांची बदलेली मानसिकता यामुळे देशाची सांस्कृतिकता चंगळवाद आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करू लागली. जगण्यासाठी अनेक प्रश्न डोक्यात निर्माण होऊ लागले. त्या असंख्य प्रश्नांची उकल करणारी ही अतिशय सुंदर अशी नाटिका आहे.

कमी पात्र, छोटे छोटे संवाद आणि लेखकांने मांडलेली वास्तविक भावना यामुळे ही नाटिका आजच्या मुलांना खूप प्रेरणादायी ठरणारी आहे. ही नाटिका पाच प्रवेशात लेखन केली गेली आहे. तर रमण, पवन, मदन, करण, शरद ही पुरुषी पात्रे तर सई आणि गंगाबाई ही दोन स्त्रीपात्रे आहेत. या नाटकाचे नाव वाचले की आतील आत्मा लवकर कळतो. इतकी सहजता या नाटकात आहे. निर्धार मनात ठाम धरुन एखादे काम आपण केले तर आपणास यश संपादन कसे करता येते ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही नाटिका होय.

आपण लावलेल्या झाडवेलीचा नायनाट करून टाकतो. सिमेंटची जंगले, वसाहती, कारखाने उभा करुन तापमान वाढीला लवकर आमंत्रण देतो. मग नद्या, धरणं कोरडी पडतात. याला मानव जबाबदार आहे. येणारा काळ हा गंभीर असेल. यावर कायतरी उपाय केला पाहिजे हा निर्धार करून प्रत्येकी पाच झाडे लावली पाहीजे असे रमण म्हणतो, तर शरद यावर उत्तर देतो की, यात काय विशेष आहे. सरकार दरवर्षी कोट्यावधी झाडे लावत आहे. त्यातले पावसाळा संपल्यानंतर एकही झाड दिसत नाही. म्हणजे लावलेल्या झाडाकडे दुर्लक्ष कसे केले जाते. वर्तमानपत्रात बातमी आली की आपले काम संपले. ही सवय इथल्या माणसांना लागलेली आहे. याचे विपरित परिणाम प्राण्यांच्या, पक्षांच्या, किडामुंग्यावर किती मोठे होत आहेत ? यामुळे कृषी जीवन बदलत जाऊन शेतीत शेणखता ऐवजी आपण रासायनिक खतांचा उपयोग करून मानवी आणि प्राणी जीवनाला धोक्यात घालत आहेत. हे शरदला आणि मदनला ठणकावून सांगांयचे आहे.

मार्मिक संवादातून ही नाटिका साकारलेली आहे. समाजात चांगल्या गोष्टी रुजायला वेळ लागतो. सुरवातीला लोक विरोध करतात. टिंगल टवाळी करतात. त्याकडे डोळे झाक करायची. आता आपण हे होऊ देऊ नये, हा निर्धार करुन काम करु असे पवन, शरदला वाटते.

दुसऱ्या प्रवेशात वेळेला आणि कामाला महत्त्व दिलेले आहे. माणसाने स्वतः ला कामात गुंतून ठेवले पाहिजे. राजकीय मंडळी तरुणांचा गैरफायदा घेतात. यातून सुटका करून घेण्यासाठी आपण आपल्या कामात गुंतून घावे. अशा अनेक प्रश्नांची उकल आपणाला पहायला मिळते.

तिसऱ्या प्रवेशामध्ये लेखकाने अंधश्रद्धेवर प्रकाशझोत टाकलेला आहे. अभ्यास न करता टक्केवारी मिळावी म्हणून नवस केला जातो. तर जोतिषाला भविष्य कळत असेल तर भूकंप, महापूर, कोरोना, दुष्काळ अशा महाभयंकर आपत्तीबद्दल का बोलत नाही. ज्याला स्वत:चे भविष्य माहीत नाही त्यांनी इतरांच्या भविष्याबद्दल का बोलावे ? हा पोटभरू धंदा आहे. अंधश्रद्धेला जवळ करुन पोट भरणाऱ्या ढोंगी माणसांवर व व्यवस्थेवर लेखक टिका करतो आहे. समाजाला जागे करु पाहतो आहे.

चौथ्या प्रवेशात बुरसटलेल्या विचाराला गाडून टाकायला सांगतात. तर मुलांनी मोबाईलचा वापर ज्ञान मिळविण्यासाठी, शैक्षणिक साधन म्हणून केला तर योग्य दिशा मिळते. जर आपण खेळण्यांचे साधन म्हणून केला तर मुलांना धोका होऊ शकतो, असे शरदला वाटते.

पाचव्या प्रवेशात घरातील आईवडीलांचा मान सन्मान, आदर हा विचार मांडलेला आहे. कष्ट करून आई वडील शिकवतात. मुलांना मोठा साहेब करतात. आणि हीच मुलं पुढे आपल्या आईवडील यांना दूर लोटतात. भीक मागण्यापर्यंत त्या आईवर वेळ आणतात. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. हे गंगाबाई जेंव्हा स्टेशनवरच्या म्हातारीला विचारते तेंव्हा कळते. ज्याला नऊ महिने पोटात वाढवलं, लहानाचे मोठे करुन शिकवल. तोच मुलगा नोकरीच्या निमीत्ताने आईला वाऱ्यावरती सोडून जातो. ही म्हातारी आजीची कहाणी ऐकतांना डोळे पान्हावतात. तेंव्हा आईवडीलांवर प्रेम केलं पाहिजे. मान, सन्मान, आदर आपण केला पाहिजे असे गंगाबाईला वाटते.

बबन शिंदे यांनी अशी छोटी छोटी अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तरही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबद्दलची जनजागृती या नाटिकेतील पात्रे करत आहेत. येणाऱ्या काळात कोणकोणत्या समस्येला आणि प्रश्नांना सामोरे जावे लागेल. हे सांगण्याचा प्रयत्न लेखक करतो आहे. पर्यावरण, औद्योगिक, वाढती वसाहती, कारखानदारी, बेरोजगारी, शिक्षणातील क्लासेसचा काळा बाजार, मोबाईल इंटरनेटमध्ये गुरफटलेली मुलं, फोटोपुरतेच राजकारणी, माणुसकी हरवत चालेली माणसं, वेळेचा उपयोग करुन न घेणारी आळशी माणसं या सर्व विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.

बोलक्या व सहज संवादातून ही मुलं उज्ज्वल भविष्यासाठी ठाम असा निर्धार करून आपले काम शेवटाला नेऊ असा वसा ही मुलं हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी तयार होतात. हा निर्धार मुलांच्या मनात खोलवर रुजविण्याचा प्रयत्न लेखक करतो आहे.

बालसाहित्यिक डॉ. न. म. जोशी यांची पाठराखण आणि प्रस्तावना आहे. ते या नाटिकेबद्दल लिहितात, आपलं नैसर्गिक पर्यावरण तर प्रदूषित झालं आहेच पण आपलं कौटुंबिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण हेही झाकोळलं आहे. त्यावर मळभ दाटलं आहे. हे या नाटिकेतून सूचित केले आहे. अमोल गवळी यांनी मुखपृष्ठ व रेखाटन सुंदर केलेले आहे.

पुस्तकाचे नाव – निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम (बालनाट्य )
लेखक – बबन शिंदे, मो. ९५२७८६८१८१
प्रकाशक – सप्तर्षी प्रकाशन
पृष्ठे – ५२ , मूल्य – १०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भरडधान्य पिकांना भविष्यात मोठी मागणी

हिरव्या शालूत नटलेली काळभैरी…

करटोली (ओळख औषधी वनस्पतीची)

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading