फळमाशी एक समस्या
🐝🍊🐝🍊🐝🍊🐝🍊🐝🍊🐝🍊
आंबा, चिकू, सफेद जांब, लीची, केळी, बोर इत्यादी अनेक फळपिकांवर आणि वेलवर्गीय भाजीपाला काकडी, दुधी, कर्टोली, दोडका, खरबूज, कलिंगड इत्यादी फळ भाज्यांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होत असते. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनात पालघर जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात पाच प्रजातीच्या फळमाश्या फळपिकांवर तर एक प्रकारची जात ही वेलवर्गीय भाजीवर आढळली आहे.
नुकसानीचा प्रकारः
ही किड फळ पक्वतेच्या वेळेला प्रादुर्भाव करते. माशी फळाच्या सालीवर अंडी देते. त्यातून तयार झालेली अळी फळाच्या आत शिरून गर खाते. अशा फळांचे बाजारमूल्य कमी होते किंबहुना जवळपास शून्य होते, तसेच परदेशी बाजारपेठेत असा माल स्वीकारला जात नाही. या किडीची माशी आकाराने घरमाशी पेक्षा थोडी मोठी असून सोनेरी रंगाची असते. एक मादीमाशी तिच्या जीवनकाळात सुमारे ५०० ते १००० अंडी देते. आणि एक वर्षात ९ ते १० पिढ्या पूर्ण होतात. यावरून ही माशी किती मोठ्या प्रमाणात वाढून नुकसान करू शकते हे आपल्या लक्षात आले असेलच.
उपाय:
कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने या फळमाशी नियंत्रणासाठी सापळे बनविले आहेत.
प्लायवूडचा ठोकळा ज्यात लावलेल्या रसायनाने फळमाशीच्या नर माशीला आकर्षित करून मारले जाते. बागेतील नर माश्या ची संख्या कमी होते. मादीला मिलनासाठी नर मिळत नाही. पर्यायाने मादी वांझ अंडी घालते त्यातून अळी तयार होत नाही. हा ठोकळा प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटलीला दोन छिद्र पाडून त्यात टाकावा व बागेत टांगून ठेवावे. एक एकरात 4 ते 6 सापळे लावावेत. पुढे 2 ते 3 महिने हा ठोकला काम करतो. आवश्यकता वाटल्यास ठोकला पुन्हा नव्याने लावता येतो. फळं लागण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून हे सापळे लावणे आवश्यक आहे.