September 17, 2024
Ekagra Murti 240 Corrodes Owner Infosys
Home » एकाग्र  240 कोटींचा मालक !
विशेष संपादकीय

एकाग्र  240 कोटींचा मालक !

गेल्या सप्ताहामध्ये इन्फोसिस लिमिटेड  या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या संदर्भात दोन अत्यंत महत्त्वाच्या आनंददायी  घडामोडी झाल्या.  सर्वात पहिली महत्त्वाची  घटना म्हणजे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुरमु यांनी त्यांच्या अधिकारात  जेष्ठ उद्योजिका, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व इन्फोसिस फौंडेशनच्या  माजी अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती यांची राज्यसभेचे सभासद म्हणून नियुक्ती केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सहा वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली. श्रीमती सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठाच्या इंजीनियरिंग महाविद्यालयातून बी.ई.  इलेक्ट्रिकची पदवी सुवर्णपदकासह मिळवली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्यांनी संगणक शास्त्रात एम ई. ची पदवी तसेच कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम. टेक.  पदवी संपादन केलेली आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात पुण्यातील टेल्को कंपनीत पहिल्या महिला अभियंता म्हणून केली. टाटा कंपन्यांमध्ये त्यांनी पुणे मुंबई व जमशेदपूर येथे काम केले. काही काळ वालचंद उद्योग समूहामध्येही त्यांनी जेष्ठ सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून काम केलेले होते.  पुण्यातील एका महाविद्यालयात त्या प्राध्यापिकाही होत्या. त्या खूप नामवंत सामाजिक कार्यकर्त्या व कुशल लेखिका आहेत. मराठी, कन्नड  व इंग्रजी या भाषांमधून विपुल लेखन केलेले आहे. त्यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिलेल्या असून त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह  प्रसिद्ध झालेले आहेत. उत्तम शिक्षक या पुरस्कारासह त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेले आहेत. सर्वात महत्वाचे    पद्मश्री व पद्मभूषण हे दोन राष्ट्रीय नागरी सन्मान मिळालेले आहेत. सामाजिक क्षेत्रासाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे. इन्फोसिस कंपनीने स्थापन केलेल्या इन्फोसिस फाउंडेशन या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या त्या सहसंस्थापिका व माजी अध्यक्ष आहेत.  विरोधी पक्षांपासून तळागाळातील सर्व भारतीयांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून सर्वांनाच  मनापासून आनंद झालेला आहे.

इन्फोसिस लिमिटेड  ही केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय भारतीय कंपनी नाही तर जगातील 50 पेक्षा जास्त देशांमध्ये डिजिटल सेवा व सल्ला देण्याचे काम  करते.  उत्तर अमेरिका व युरोप मधील अनेक देशांमध्ये इन्फोसिस तर्फे उत्तम दर्जाची सेवा अनेक वर्ष दिली जात आहे. आजच्या घडीला या कंपनीत 3 लाख 20 हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. कंपनीचा सध्याचे महसुल उत्पन्न हे 18.55 बिलियन डॉलरच्या घरात आहे. तसेच त्यांचे भाग भांडवल 75 हजार 795 कोटी रुपये ( 9.50 बिलियन डॉलर्स ) इतके आहे. कंपनीची स्थापना 1981 मध्ये पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील लकाकी  तळ्याजवळील एका इमारतीत करण्यात आलेली होती. त्यावेळी त्यांचे भांडवल केवळ अडीचशे डॉलर्स इतके .  त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1983 मध्ये  कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे स्थलांतरित करण्यात आले.

कंपनीने त्यांच्या समभागांची पहिली खुली विक्री फेब्रुवारी 1993 मध्ये केलेली होती. अमेरिकेतील नशडॅक स्टॉक एक्सचेंज वर ए. डी. आर. म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसीटची नोंदणी करणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरली. सहसंस्थापक श्री एन आर नारायण मूर्ती हे कंपनीचे अनेक वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष होते. ते आज 77 वर्षांचे आहेत. अगदी प्रारंभी केवळ दहा हजार रुपये गुंतवणूक त्यांनी या कंपनीत केलेली होती. इन्फोसिस कंपनीचे सात प्रवर्तक व त्यांच्या सर्व कुटुंबीयांकडे साधारणपणे 13 टक्के 55.16 कोटी शेअर्सचे भाग  भांडवल आहे. त्यातील 3.54 टक्के भांडवल (सुमारे 15 कोटी पेक्षा थोडे जास्त शेअर्स) श्री नारायण मूर्ती (0.39 टक्के), त्यांची पत्नी सुधा मूर्ती (0.81 टक्के) कन्या अक्षता मूर्ती( 0.81 टक्के) व चिरंजीव रोहन मूर्ती( 1.43 टक्के) यांच्याकडे आहे. या सर्वांना प्रत्येकी दरवर्षी लाभांशापोटी काही कोटी रुपये रक्कम मिळत असते.

त्याच्या माध्यमातूनच त्यांनी इन्फोसिस फाउंडेशन या सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कंपनीची स्थापना केलेली आहे.हे दोघेही पती-पत्नी त्यांच्या सामाजिक बांधिलकी व औदार्य यासाठी सर्वांना परिचित आहेत. त्या दोघांचीही अत्यंत साधी राहणी व सातत्याने उच्च विचारसरणी हा त्यांचा मूळ गाभा आहे. श्री नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांना अक्षता मूर्ती ही कन्या असून त्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. त्यांचा विवाह इंग्लंडचे विद्यमान पंतप्रधान श्री ऋषी सुनक यांच्याबरोबर झालेला आहे. त्यांना दोन कन्या आहेत. श्री नारायण मूर्ती यांचे श्री रोहन मूर्ती हे चिरंजीव असून त्यांचा विवाह अपर्णा कृष्णन यांच्याशी झालेला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांना एक पुत्ररत्न झाले. त्याचे नाव त्यांनी ” एकाग्र” असे ठेवले. या शब्दाचा संस्कृत अर्थ “अत्यंत अतूट, लक्ष केंद्रित असणारी निश्चयी व्यक्ती”अशा स्वरूपाचा आहे.

मूर्ती कुटुंबीयांमध्ये आगमन झालेला हा पहिला नातू आहे. श्रीमती सुधा मूर्ती यांच्या आनंददायी नियुक्तीच्या   पार्श्वभूमीवरच दुसरी महत्त्वाची घटना घडलेली आहे. ती म्हणजे  श्री नारायण मूर्ती यांनी   ” एकाग्र” या नातवाला  त्यांचे 0.04 टक्के   समभाग भेट दिले आहेत. आजमितीला इन्फोसिसच्या एका शेअरचे बाजारमूल्य   लक्षात घेतले तर  त्याचे बाजार मूल्य 240 कोटी रुपयांच्या घरात जाते असा अंदाज आहे.  यामुळे किमान भारतात तरी इतक्या लहान वयाचे बालक एखाद्या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचा भागधारक होऊन कोट्याधीश बनण्याची घटना घडलेली आहे. गेल्या सप्ताहात त्याच्या नावावर ते हस्तांतरित करण्यात आले. अर्थात हा व्यवहार शेअर बाजाराच्या दररोजच्या व्यवहारांमध्ये न करता कौटुंबिक हस्तांतरण असल्याने ज्याला “ऑफ मार्केट” व्यवहार म्हणतात त्या पद्धतीने हे शेअर्स त्यास भेटी दाखल दिलेले आहेत.  त्याची कागदोपत्री नोंद मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांवर रीतसर करण्यात आलेली आहे.

अर्थात या कंपनीचे जे अन्य सह संस्थापक आहेत त्यांच्या नातवंडांनाही अशाच प्रकारची कोट्यावधी शेअर्सची भेट देण्यात आली आहे. त्यात नंदन  निलकेणी यांनी त्यांचा नातू तनुष निलकेणी चंद्रा या ला 0.09 टक्के भाग भांडवल भेट दिलेले आहे. तिसरे सह संस्थापक श्री शिबुलाल यांचा नातू मिलन शिबुलाल मनचंदा याला त्यांनी 0.19 टक्के भाग भांडवल भेट दिले आहे. तसेच त्यांच्या नातीकडे निकिता शिबुलाल मनचंदा  हिच्याकडे 0.19 टक्के भाग भांडवल आहे. या सर्व नातवंडांना त्यांच्या आजोबांनी अशी मोठी भेट दिलेली आहे.

नंदुकमार काकिर्डे
अर्थविषयक जेष्ठ पत्रकार व बँक संचालक


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

खरा धर्म कोणता ?…

पेशव्यांच्या डुबेरगडापासून गाळणपर्यंतची भ्रमंती

रायगडमधील एलिफंटा गुंफाचा वारसास्थळ दत्तक योजनेत समावेश

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading