पूर्वीच्या काळी अनेक राजांचे सत्ता भोगण्यातच आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणही नव्हती. ऐशआरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येक वर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे ।
हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ।। १८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा
ओवीचा अर्थ – ब्रह्मदेवाचें आयुष्य मिळावें आणि मग निजूनच राहावें, यावाचून त्याला दुसरा नादच नाही.
महत्त्वाच्या पदावरील अनेक माणसे केवळ नाममात्र कारभारी असतात. त्यांना अनेक अधिकार असूनही ते त्याचा वापर करत नाहीत. सरकारी कार्यालयात ही परिस्थिती पहायला मिळते. नुसती हजेरी मांडून पगार तेवढा घ्यायला जातात. ही तामस वृत्ती दुसऱ्यांना सुद्धा त्रासदायक ठरते आहे. त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या सान्निध्यातील इतरांनाही ही सवय लागते. वरिष्ठच झोपलेले असतील तर कार्यालयातील शिपायापासून सर्वजण आळशी असलेले पाहायला मिळतात.
नशीबाने एखादे उच्चपद मिळाले तर त्याचा वापर योग्य कामासाठी, सत्कर्मासाठी करायला हवा. अशी वृत्ती त्याच्यात असायला हवी. उच्च पदावरील तामसी वृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे सरकारी कार्यालयांची परिस्थिती खूपच वाईट होते. याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागतो. राज्यकर्तेही अशा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. अशा अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यातच राज्यकर्ते अधिक रस घेतात. अशा या कारभारामुळे जनता मात्र त्रस्त होते. किरकोळ कामासाठीही जनतेला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. अशा या अधिकाऱ्यांना उच्च पदे मिळूनही काय उपयोग ? पदाचा वापर चांगल्या कामासाठी होत नसेल तर ते अधिकारी तर कसले ? आयुष्य खूप छोटे असते त्यात मिळालेले उच्चपद हे चांगल्यासाठी वापरले तर या छोट्या आयुष्यात काहीतरी कमावल्याचे सुख मिळेल पण तसे होत नाही.
काही अधिकारी या अशा वृत्तीला अपवाद असतात, पण असे कार्यक्षम अधिकारी फार काळ सेवेत टिकत नाहीत, असाही अनुभव आहे. कारण तामसाच्या सान्निध्यात आपणही तामस होऊ का? अशी भीती त्यांना वाटते. असे हे तामसी वृत्तीचे सात्वीक वृत्ती विसलेले, झोपी गेलेले अधिकारी सात्त्विक होणार तरी कधी ? विकासाच्या, महासत्तेच्या चर्चा होतात. पण त्यासाठी मनोवृत्तीही तितकीच चांगली असावी लागते. मोठी मोठी साम्राज्ये ही एका चांगल्या विचारधारेने, त्यागीवृत्तीने उभी राहीली आहेत. हे विसरता कामा नये. यासाठी चांगले कर्म करण्याची मानसिकता ठेवायला हवी.
मिळालेले पद हुकुमशाही गाजवण्यासाठी नाही याचे भान असायला हवे. ऐश्वर्य भोगण्यासाठी नाही. किंवा मुठभर लोकांच्या भल्यासाठी इतर जनतेला भरडण्यासाठी नाही याचे भानही असायला हवे. अशा या हुकुमशाही विरोधात आवाज उठवण्याची हिंमत जनतेत नाही. अशा भ्रमात राहू नये. अशा मोठ्या मोठ्या सत्ता जनतेनेच उलथवून लावल्या आहेत याचे भान असायला हवे. जनतेला झोपीची गोळी दिली तरी अन्याया विरोधात जनता ही गोळीही पचवू शकते. अन् उठाव करू शकते. तमोगुणाचे साम्राज्य सद्सदविवेक बुद्धीच्या जनतेकडून उलथवून लावले जाऊ शकते.
पूर्वीच्या काळी अनेक राजांचे सत्ता भोगण्यातच आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणही नव्हती. ऐशआरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येक वर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये. तसेच अशा राजांचे साम्राज्यही जनतेनेच उलथवून लावले आहे. जनतेत क्रांतीची लाट कधीही उठू शकते. यासाठीच पदाचा योग्य वापर करण्याची सद्बुद्धी वरिष्ठांनी जागृत ठेवण्याची गरज आहे. मिळालेले पद हे सत्कर्मासाठी आहे याचा विचार करून योग्य कृती करण्याचा प्रयत्न सातत्याने करायला हवा.
ब्रह्मदेवाचे आयुष्य लाभल्यानंतर झोपूनच राहाणे कधीही योग्य नाही. आत्मज्ञानी झाल्यानंतर त्या आत्मज्ञानाचा जनतेला लाभ होण्यासाठी कार्य करणे हाच धर्म आहे. मिळालेले आयुष्य कशासाठी आहे हे जाणून घेऊन त्यासाठी कर्म करणे हे कर्तव्य आहे. मी कोण आहे ? हे समजल्यानंतर इतरांनाही आपण कोण आहात याची जाणिव करून देण्यासाठी आयुष्य वेचने हा आयुष्याचा धर्म आहे. हे विसरता कामा नये. मिळालेले आयुष्य यामुळेच सत्कारणी लागेल. आपल्यासही इतरांचेही आयुष्य सुखी केल्याचे समाधान लाभेल.