October 14, 2024
Waterfall rapling article by Santos Dukare
Home » Privacy Policy » धुंदी वॉटरफॉल रॅपलिंगची !
पर्यटन

धुंदी वॉटरफॉल रॅपलिंगची !

धुव्वाधार कोसळणारा उत्तुंग धबधबा, आसंमतभर तुषार आणि कानोकानी घुमनारी गाज… कधी मनमोहक तर कधी अक्राळविक्राळ आणि त्यात स्वतःला पाठमोरं झोकून देत त्या जलधारा, ते तुषार, काळ्या किंवा निळ्या आभाळासह तो सारा नजरा अंगावर घेत तर्जनी एवढ्या दोरखंडावर कसरत करत झुलणारा साहसवीर. वॉटरफॉल रॅपलिंगमधला हा थरार जेवढा रोमांचक आहे तेवढाच सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायकही. वॉटरफॉल रॅपलिंगच्या वाटेला जाण्यापुर्वी पर्यटक, साहसवीर, ट्रेकर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवर्जून समजून उमजून घ्यायला हव्यात…

संतोष डुकरे
संचालक, शेकरु आऊटडोअर्स
सचिव, शिवनेरी ट्रेकर्स, जुन्नर

वॉटरफॉल रॅपलिंग हा साहसी क्रिडाप्रकार असलेल्या गिर्यारोहणाचाच एक भाग आहे. तो कायदेशीरही आहे आणि त्यावर कुठेही बंदी वगैरे नाही. (अपवाद – त्या त्या वेळी प्रतिबंधात्मक आदेश लागू असलेली ठिकाणे). त्याला आनंदाच्या आणि काळजीच्या अशा दोन्ही बाजू आहेत. अर्थात त्यावर बंदी नाही वा कायदेशीर आहे म्हणून उठसूठ कुणीही, कुठेही, कसंही करावं एवढं ते सहज सोपं आणि निर्धोकही नाहीये. वॉटरफॉल रॅपलिंग हा साहसविरांना भुलविणारा, पण सुरक्षेच्या दृष्टीने नाकापेक्षा मोती जड असा प्रकार असल्यानं भल्या भल्या अनुभवी प्रतिथयश संस्था आणि हाडाचे अनुभवी प्रशिक्षित गिर्यारोहकही व्यवसायिक दृष्ट्या त्याच्या नादी लागत नाहीत, ही वस्तुस्थिती सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवी. त्याची साधक बाधक कारणे अनेक आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत धबधबे सुरु झाले की लगेचच अनेक लहानमोठे ट्रेकिंग गृप, कोरोना काळापासून अचानक संख्या वाढलेल्या आयोजक संस्था ताम्हिणीपासून लोणावळा, भिवपूरी ते नाशिकपर्यंतच्या पट्ट्यात वॉटरफॉल रॅपलिंग उपक्रमांचे आयोजन करतात. घरात साधं शॉवरचे तुषार अंगावर झेलणं किती आनंददायी असतं… मग तेच जर धबधब्याचे तुषार, जलधारा आणि ओथंबलेला रानवारा हवेत अधांतरी लटकत अंगावर घेता आला तर… ही कल्पनाच मुळात रोमांचक आणि ती प्रत्यक्ष अनुभवणं ही चाकोरीबद्ध पर्यटकाच्या दृष्टीने न भुतो न भविष्यती अशी अत्युच्च आनंददायी गोष्ट असते. ती तशी असण्यात वावगं काही नाही.

वॉटरफॉल रॅपलिंग म्हणजे दोराच्या साहाय्याने वाहत्या धबधब्यातून खाली उतरणे. गिर्यारोहनात कड्यावरून खाली उतरण्यासाठी रॅपलिंग तंत्राचा वापर केला जातो. अत्युच्च गुणवत्ता, उच्च कोटीची ब्रेकिंग स्ट्रेन्थ व आंतराष्ट्रीय मानकांनी प्रमाणित गिर्यारोहण साहित्य यासाठी वापरले जाते. बिगर प्रमाणित, जुगाड वा चायनिज साहित्य आणि ते वापरणाराची अकुशलता म्हणजे हमखास अपघाताला आमंत्रण असा प्रकार असतो. हार्नेस कमरेला बांधला जातो. याचेही प्रकार असतात. फुल बॉडी हार्नेस हा अननुभवी मंडळींसाठी अधिक उपयुक्त असतो. रॅपलिंगसाठीचा रोप या हार्नेसला जोडला जातो. धबधब्याच्या वरच्या बाजूला नैसर्गिक किंवा पक्क्या खडकात कृत्रीम बेस बनवला जातो आणि तेथून भाविकांना रॅपलिंग करण्यासाठी सोडलं जातं.

रॅपलिंग ते वॉटरफॉल रॅपलिंग

मुळात रॅपलिंग हाच तंत्र व कौशल्याचा मिलाफ असलेला सुंदर साहसी प्रकार आहे. वॉटरफॉल रॅपलिंग ही त्याची अधिक थरारक, अधिक कौशल्य व शारिरिक आणि मानसिक स्ट्रेन्थ पणाला लावणारी पायरी आहे. त्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंत साधं रॅपलिंगही कधी केलेलं नसेल तर शक्यतो थेट वॉटरफॉल रॅपलिंगच्या नादाला लागू नये. मान्यताप्राप्त, प्रमाणित, शासन नोंदणीकृत व अनुभवी संस्था वा प्रशिक्षकांकडून सुरवातीला रॅपलिंगचे धडे गिरवावेत आणि मग ते तंत्र अवगत झालं आणि किडा जागा असलाच तर सुरक्षेची योग्य काळजी घेवून योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वॉटरफॉल रॅपलिंगचा नाद करावा.

खेळ निसर्गाशी

कोसळत्या धबधब्यात उतरणं हे नैसर्गिक नाही. तो निसर्गाशी खेळ करणं आहे. अर्थात कृत्रीम साधणं वापरुन केलेल्या गिर्यारोहणातील अनेक साहसं अनैसर्गिक याच प्रकारात मोडतात. निसर्गाकडे जाताना त्यापुढे नतमस्तक होणं, आणि नतमस्तक राहूनच सर्व गोष्टी करणं अत्यावश्यक असतं. तो डोंगरातला सुरक्षेचा संस्कार आहे. गिर्यारोहणात पाय लावण्यापुर्वी डोंगर पुजला जातो, सर्वोच्च शिखरांच्या सर्वोच्च ठिकाणी पाय ठेवला जात नाही, त्याच्या काही अंतर अलिकडेच झेंडा फडकवला जातो आणि त्यास ते शिखर सर केले असं मानलं जातं. हा कृतज्ञतेचा, श्रद्धेचा आणि त्यातून येणाऱ्या सुरक्षात्मक जबाबदारीचाही भाग आहे. वॉटरफॉल रॅपलिंग उपक्रमही त्यास अपवाद नाही.

पाणी हे अत्यंत अनिश्चित, अकल्पित भूत आहे. पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या या भुताला कधी काय घुरं येईल, सांगता येत नाही. पावसाळ्यात तर त्याचे एक ना अनेक नखरे असतात, त्याच्या वाटाही हजार असतात आणि त्या सर्व आपल्या दृष्टीक्षेपात वा आवाक्यात असतात असं नाही. अचानक पाण्याची आवक वाढते, लोंढे येतात, पाण्यातून दगडगोटेही कोसळतात. गुरूत्वाकर्षण + पाण्याचा दाब यामुळे या दगडांची गती व परिणाम बंदुकीच्या गोळीहून कमी नसतो. गोटीएवढा दगड सुद्धा हेल्मेट भेदण्यास पुरेसा असतो.

पावसाळ्यात धबधब्यांनी अचानक रौद्र रुप धारण करुन जिवितहानी झाल्याची उदाहरणे कमी नाहीत. दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणांनी पावसाळ्यात धबधब्यांवर जिव गमवणारांची संख्या दुर्लक्षनिय निश्चितच नाही. त्यामुळे पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपलिंग हा प्रकार अधिकच निषिद्ध मानला जातो. आणि रॅपलिंगमध्ये अत्यंत अनुभवी असलेल्या संस्थाही वॉटरफॉल रॅपलिंगपासून चार हात लांब असतात ते याच बाबींमुळे.

सुरक्षात्मक बाबी

वॉटरफॉल रॅपलिंगचा आनंद घेण्याआधी सहभागी व्यक्तीनं स्वतःच स्वतःच्या सुरक्षेविषयी जागरुक असणं, त्याकडे काटेकोरपणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा माकडांच्या टोळीसारखी अवस्था असते. कुणीतरी अर्धवटराव मोहरक्या होतो आणि सर्वांची जीव धोक्यात टाकतो. चलता है, त्याला काय होतंय… ही कानामागं टाकण्याची वृत्ती गिर्यारोहण संलग्न साहसी खेळात चालत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल या तत्वानंच प्रत्येक पाऊल टाकावं लागतं, टाकलं पाहिजे. ज्या वॉटरफॉलवर पावसाळ्यात उपक्रम आयोजित करायचा आहे, त्याची पावसाळ्यापुर्वीच पहाणी करुन, त्यातील टप्पे, ओहरहँग, संभाव्य रॅपलिंग रुट निश्चिती, त्यातील अडथळे काढणे या गोष्टी आधीच करणे गरजेचे व फायद्याचे असते.

आयोजक संस्थेकडे फिल्डवर उपलब्ध असलेले प्रशिक्षित अनुभवी मार्गदर्शक, लागणारे आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे तांत्रिक साहित्य, त्यांचा गिर्यारोहणाचा, तसेच गिर्यारोहणातील तांत्रिक बाबींचा अनुभव किती आहे, हे पाहणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ अनेकदा बेसिक माऊंटनिअरिंग कोर्स केलेल्या अननुभवी फ्रेशर मंडळींच्या हाती सर्व कारभार असतो. त्यांच्याकडे अशा उपक्रमांच्या लीडरशीपची पात्रता आणि त्यातील धोक्यातून बचाव करण्याची क्षमता असतेच असं नाही. त्यामुळे आपला जीव दुसऱ्याच्या हाती सोपवताना संबंधीत मंडळींची निवड योग्य पद्धतीनेच करायला हवी. गिर्यारोहणातील बेसिक माऊंटनिअरिंग कोर्स (BMC), अॅडव्हान्स माऊंटनिअरिंग कोर्स (AMC), सर्च अॅन्ड रेस्क्यू (S&R) हे कोर्स केलेली मंडळी प्रशिक्षित असतात, पण फक्त प्रशिक्षण पुरेसं नसतं, सोबतचा अनुभव खुप मॅटर करतो. अशी मंडळी आपल्याला हवी तेव्हा उपलब्ध असतीलच असे नाही, तसे झाले तर ती उपलब्ध होईपर्यंत थांबायची तयारीही हवी. एखाद्या उपक्रमाची जाहिरात पाहिली जावंस वाटलं तर तत्पुर्वी जावं की नाही याबाबत परिचयातील इतर तज्ज्ञ गिर्यारोहकाचा सल्ला घेवूनच निर्णय घ्यावा.

फिटनेस महत्वाचा…

गिर्यारोहन संदर्भातील सर्व साहसी खेळ हे तंत्रकौशल्याचे असले तरी फिटनेस हा त्यांचा पाया आहे. व्यवसायिक आयोजक मंडळी तुमच्या पाठीवरची बँग त्यांच्या पाठीवर घेतीलही कदाचीत, पण तुमच्या शरिराचं ओझं तुमचं तुम्हालाच वहावं लागतं. सर्वसामान्यपणे चांगले धबधबे हे जंगलाच्या बरेच आत असतात. त्यांच्यापर्यंत पोहचणं आणि परत येणं हा सुद्धा एक लहान मोठा ट्रेकच असतो. फिटनेस नसेल तर हा ट्रेक एवढा दमछाक करणारा असतो की पुढच्या सगळ्या गोष्टी पाण्यात जातात. तात्पर्य एवढंच की आपण जे कोणतं साहस करणार आहोत त्यासाठी आवश्यक असलेला फिटनेस हा कमवलाच पाहिजे, अन्यथा उत्साहावर आपत्तीचं विरजण पडायला वेळ नाही लागत.

रॅपलिंग करताना…

तांत्रिक बाबी काटेकोर फॉलो केल्या तर रॅपलिंगचा आनंद वेगळाच असतो. रॅपलिंगसाठी योग्य बेस बनवणं, बेसला बॅकअप असणं, योग्य सिस्टिम लावणं, हेल्मेटपासून सर्व सुरक्षात्मक बाबींची काटेकोर अंमलबजावणी करणे… हे करताना अननुभवी व्यक्ती मध्येच अडकली तर त्याचा तातडीने आपत्कालीन रेस्क्यू करण्याच्या अनुषंगाने आधीच तयारी करुन ठेवणं, रॅपलिंग करणारी व्यक्ती पूर्णतः अननुभवी असेल तर त्याला त्याचा व्यवस्थित डेमो देणं, त्यांच्याकडून ट्रायल करुन घेणं महत्वाचं असतं. रॅपलिंग करणाराचा सिस्टिमवर, रोपवर आणि मार्गदर्शकावर विश्वास असणं, त्याआधी स्वतःची मानसिक अवस्था कनखर आणि शारिरक अवस्था चांगली असणं महत्वाचं.

दोन्ही पायातील अंतर, खडकाशी किंवा कड्याशी पायांचा 90 अंशाचा कोन होणं. ओहरहँग असेल तर त्यावेळच्या जंपची तयारी आदी अनेक बाबी महत्वाच्या असतात. एक्स्ट्रा बिले (तो शक्यतो फायरमॅन बिले) आणि रॅपलिंग रोप चं खालचं टोक धबधब्याच्या खाली उभ्या असलेल्या मार्गदर्शकाच्या हाती असणंही गरजेचं असतं. रॅपलिंग करणाऱ्या व्यक्तीकडून गडबड झाली, नियंत्रण सुटलं तर ही खालची व्यक्ती त्यास कंट्रोल करु शकते. अशा अनेक तांत्रिक बाबी आहेत. तंत्र आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेली असली तरी आपत्कालीन परिस्थितीत त्याचा अचुक वापर करण्याचं भान आणि तत्परता हा कळीचा मुद्दा असतो.

रॅपलिंग सुरु करण्यापुर्वी आपण सर्व गोष्टींची योग्य खातरजना केली आहे, आपण सुरक्षित हाती आहोत आणि तरीही आपण मध्येच अडकलो तर…. वरुन किंवा बाजूने पाणी पडतंय, आवाज ऐकू येत नाही, भिती वाटणं सहाजिक असतं. पण भिऊन चालत नाही. प्रसंगावधान राखणं महत्वाचं असतं. पॅच मोठा असेल तर सुचना पोचवण्यासाठी गळ्यात किंवा हेल्मेटच्या बेल्टला चांगली शिट्टी असणं महत्वाचं असतं. शिट्टीने मेसेज पास करता येतो. मदत बोलवता येते.

लाईफलाईन महत्वाची

रॅपलिंगसाठी वापरला जाणारा रोप म्हणजे रॅपलिंग करणाऱ्याची ‘लाइफलाइन’ असते. इतर वेळी संपूर्ण रोपवर सतत बारकाईने लक्ष ठेवले जाते. मात्र वॉटरफॉल रॅपलिंगमध्ये सुक्ष्म बारकाईने लक्ष ठेवणे अनेकदा शक्य नसते. ओला रोप वापरणं अति कौशल्याचा भाग असतो. रोप व सेटअप सातत्याने चेक करत रहावं लागतं. धबधब्यातील दगडांच्या कपच्या, त्यात साचणारं शेवाळ, पाण्यात सतत भिजणारा रोप, रोपच्या सहनशिलतेत या सर्व बाबींमध्ये होणारा ज्ञात, अज्ञात परिणाम आणि त्यामुळे वाढणारा ताण व धोका. यामुळे वॉटरफॉल रॅपलिंग हे इतर रॅपलिंगप्रमाणे पूर्ण सुरक्षित मानले जात नाही व त्याचा कोठेही पुरस्कार केला जात नाही. कोणत्याही गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत ते शिकवले जात नाही.

भिती आणि गाठोडं

काही लोकं खोलीच्या भितीवर विजय मिळवायचा म्हणून रॅपलिंग करण्याचे कारण सांगतात. पण भितीघालवण्यासाठी एकदम टोकाची कृती करायची नसते. ती टप्प्याटप्प्याने घालवायची असते. त्यामुळे कड्याची, खोलीची, पाण्याची वा निसर्गाच्या रौद्र रुपाची भिती घालवून त्याला मिठी मारायचीय म्हणून थेट वॉटरफॉल रॅपलिंग करायला जाणार असाल तर हा थोडासा अतिरेक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधीही कुठेही रॅपलिंगचा अनुभव न घेता थेट वॉटरफॉल रॅपलिंगला जाणं. या पद्धतीनं वॉटरफॉल रॅपलिंग करणं आणि गवताचा भारा किंवा गाठोडं दोरीने बांधून खाली सोडणं यात फार काही फरक नाही. आनंदाबरोबर आपलं कौशल्यही वृद्धींगत होतंय की आपलं गाठोडं केलं जातंय याचाही विचार सहभागी होताना अवश्य करावा.

प्रथमोपचार पेटी अत्यावश्यक

प्रथमोपचाराविषयीचे अज्ञान व त्याबाबतच्या गांभिर्याचा अभाव ही महाराष्ट्राच्या ट्रेकिंग व साहस पर्यटन क्षेत्रातील मोठी उणीव आहे. अमुक तमुक ट्रेकला चालताना ट्रेकरचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू या बातम्या दर वर्षी वाचनात येतात. यंदाही अशा घटना घडल्यात. याशिवाय अपघातग्रस्त झाल्यानंतर तातडीनं प्रथमोपचार न मिळणं आणि त्यामुळे उद्भवणारे मृत्यू हा ही गंभीर विषय आहे. याबाबतचे दुर्लक्ष एवढे भयानक आहे की आपत्कालीन बचाव म्हणजे दरीतून वा पाण्यातून डेड बॉडी काढणे म्हणजे रेस्क्यू करणे असा समज अनेकांत रुढ होत आहे. ते तसं नाहीये… जीव वाचवणे हे शोध व बचाव कार्याचे, आपत्कालीन मदतीचे मुख्य उद्दीष्ट असते आणि प्रथमोपचार ही त्यातील सर्वात महत्वाची बाब आहे.

कोणताही ट्रेक किंवा साहस मोहिम आयोजित करताना आयोजकांनी त्यात प्रथमोपचार एक्स्पर्ट व प्रथमोपचार पेटी उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे. दोन दिवसाच्या प्रथमोपचार प्रमाणपत्र अभ्यासक्रम पासून ते जागतिक पातळीवर सर्वोच्च समजल्या जाणार्या NOLS च्या वाईल्डरनेस फस्ट रिस्पॉन्डर (WFR) या अभ्यासक्रमापर्यंत अनेक महत्वाचे कोर्सेस यात उपलब्ध आहेत. आवड असेल, वारंवार ट्रेकिंग, निसर्ग भ्रमंती होत असेल तर आपण स्वतःच असा एखादा कोर्स करणे अधिक हिताचे राहील.

ट्रेकला 2 जण जावोत वा 200, सहभागी लोकांची संख्या विचारात घेवून स्थळ, काळ आणि साहसाचे स्वरुप विचारात घेवून प्रथमोपचार पेटी सुसज्ज असणं अत्यंत महत्वाचं असतं. त्यासोबत त्या भागातील स्थानिक ग्रामस्थांशी आयोजकांचा संपर्क असणं, आपत्कालीन मदत उपलब्ध करण्याची सक्षमता असणं महत्वाचं असतं. (प्रथमोपचार पेटी नक्की कशी असावी हा स्वतंत्र विषय आहे.) स्थानिक जाणकार सोबत असणं अत्यंत फायद्याचे असते. पाण्यातील, निसर्गातील सुक्ष्म बदल टिपून संभाव्य धोक्याची वेळीच जाणिव करुन द्यायचं काम स्थानिक माणसाएवढं कुणीही परफेक्टली करु शकत नाही.

महाराष्ट्रातील लोकप्रिय धबधबे व वॉटरफॉल रॅपलिंग स्पॉट

महाराष्ट्रात एकटया सह्याद्रीच्या कुशीत छोटेमोठे असंख्य धबधबे आहेत. त्यात सातारा जिल्ह्यात तारळी नदीवर असलेला ठोसेघर (853 फुट) हा सर्वात उंच धबधबा समजला जातो. सह्याद्री लगतच्या सर्व जिल्ह्यांमधील धबधब्यांचे आपले आपले स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. कोल्हापूर ते नाशिक जसंजसं वर सरकत जाऊ तसतसं सह्याद्रीचं भौगोलीक स्वरुप, कोकणकड्यांची भिषनता बदलत जाते आणि पर्यायाने धबधब्यांचे स्वरुपही. वॉटरफॉल रॅपलिंगचे उपक्रम मात्र पुणे मुंबई व नाशिक भोवती एकवटलेले आहेत. त्यातही विहीगाव (कसारा), सांधन व्हॅली- 50 ते 500 फुट (भंडारदरा), काळू (माळशेज), कातळधार – 450 फुट, दुधीवरे – 135 फुट (लोणावळा), मढेघाट- 150 फुट, देवकुंड,भिवपूरी, बदलापूर, कर्जत, दुधानी (पनवेल), कोलाड (रायगड) येथील धबधबे विशेष लोकप्रिय आहेत.

थोडक्यात…

वॉटरफॉल रॅपलिंग हा आयोजक व सहभागी दोन्हींचीही कसोटी पाहणारा क्रिडाप्रकार आहे. अनुभव, कौशल्य व क्षमता असल्याशिवाय हा नाद करु नये. शक्यतो कमजोर दिलाच्या, बीपीचा त्रास असलेल्या मंडळींनी या नादाला लागू नये. आणि त्यातूनही खुमखुमी स्वस्थ बसू देत नसेलच तर किमान पावसाळा थांबेपर्यंत धीर धरावा. पावसाळा थांबला म्हणजे धबधबे ओसांडायचे थांबतील असे नाही. ते सुरुच राहणार आहेत पावसाळ्यानंतरही बराच काळ. त्यावेळी आकस्मिक धोके कमी झालेले असतील आणि अधिक सुरक्षित आनंद लुटता येऊ शकेल. जेव्हा कधी असा आनंद लुटाल तेव्हा सेफ्टी ला शेपटी समजू नये, ते आपलं कवच कुंडल असतं, साहसवीराचं खरं आभूषण असतं… ते सारं काटेकोरपणे फॉलो करुनच मिरवायला हवं.

बचाव पथकांमध्ये काम करणाऱ्या वा पर्यटक, ट्रेकर मंडळींच्या सुरक्षेसाठी कायम अग्रसेर असलेल्या मंडळींनी मात्र वॉटरफॉल रॅपलिंगचा सराव रेस्क्यू च्या अॅगलने त्या अनुभवासाठी आवर्जून करायला हवा. अर्थात तो सुद्धा कॅज्युअली न घेता, प्रदिर्घ अनुभवी, तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या हाताखालीच. कारण एकच… सह्याद्रीत चुकीला माफी नाही.🙏

(लेखक उच्च प्रशिक्षित अनुभवी ट्रेकर, गिर्यारोहक असून साहस व पर्यटनातील सुरक्षा विषयक जागृतीसाठी विशेष प्रयत्नशील आहेत.)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading