December 7, 2023
to remeber swaroop memory article by rajendra ghorpade
Home » स्वरुपाची आठवण होण्यासाठी…
विश्वाचे आर्त

स्वरुपाची आठवण होण्यासाठी…

अंतरंगातील स्वरुपाची जाणीवही आपणाला होत नाही. चैतन्य देहात आले आहे. हे चैतन्य देहापासून वेगळे आहे. पण आपण हे मानायलाच तयार नाही. अनुभव आल्याशिवाय अध्यात्म समजत नाही. आपल्या आचारात, विचारात अनुभवाने, अनुभुतीने बदल व्हावा लागतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारे ।
आभासोनि आविष्कारे । देहपणें जें ।। ३२४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें आपल्या स्वरुपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे, असे मानावयास लागते.

आपल्या अवतीभवतीच्या विश्वात आपण इतके गुंतले आहोत की आपणास खऱ्या स्वरुपाची आठवणच राहात नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपणाला मी कोण आहे ? याचा विचारही करायला वेळ नाही. इतके आपले जीवन व्यस्त झाले आहे. असे नाही की आपण देवधर्म करत नाही ? देवधर्म करतो, पण त्याकडे आपण धार्मिक पर्यटन म्हणून पाहात आहोत. दररोजच्या कटकटीच्या जीवनात थोडासा बदल म्हणून आपण धार्मिक पर्यटन करत आहोत. याची जाणीवही आपणास होत नाही. विज्ञानाच्या विकासाने सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आपण त्यातच गुतलो गेलो आहोत. अशा या व्यस्त जीवनशैलीत आपणाला आपल्या स्वरुपाची आठवण कशी होणार ? देवदर्शनाची व्याख्याच जिथे बदलली आहे तेथे खरे दर्शन कसे होणार ? स्वरुपाचे दर्शन कसे होणार ?

जग चंद्रावर पोहोचले आहे. आपणही आपले विचार बदलायला हवेत. विज्ञानाच्या प्रगतीने आपण अंध झालो आहोत, हे लक्षातही येत नाही. चंद्रावर जाऊन चंद्रावर वस्ती करण्याचा विचार आपण करत आहोत. म्हणजेच आपण केवळ स्वतःच्या देहाचाच विचार करत आहोत. अरे हा चंद्र कोणी तयार केला असेल ? तो कसा तयार झाला असेल ? त्याचे या विश्वातील प्रयोजन काय ? कशासाठी त्याची निर्मिती झाली असेल ? इतके सुंदर विश्व निर्माण करणारा कोण आहे ? कसा असेल तो ? विज्ञानाने या प्रश्नांच्या शोधातच आपण फिरत आहोत. पण हे फिरता फिरता आपण प्रदुषणच, घाणच अधिक करत आहोत याचा विचार आपल्या लक्षात येत नाही. विश्वातील जैविक चक्राला आपण आव्हान देत स्वतःच्याच गुर्मित आपण वावरत आहोत. विज्ञाना ऐवजी स्वतःच्या अंतरंगातील ज्ञानाने हे जग अनुभवण्याचा विचार आपण कधी करतच नाही ?

युद्ध, सत्ता, वर्चस्व यातून महासत्ताक होण्याची स्वप्ने आपण पाहात आहोत. महासत्ता होताना आपण कोणता विचार घेऊन पुढे जात आहोत ? प्रगतीची कोणती दालने आपण उघडत आहोत. यातून प्रगती होते की विध्वंस होतो आहे याचा विचार आपण कधी केला आहे का ? माणूस स्वतःच्या कुटुंबाचा, परिवाराचा विचार करून जीवन जगत आहे. विश्वची माझे घर असे म्हणून तो कधीही पुढे येत नाही. विश्वाचा विचार करून महासत्ता होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विश्वाच्या परिवारातील सर्वांना सुखी, आनंदी करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करणे म्हणजे खरे महासत्ता होणे. पण हे सर्व देहासाठी सुरु आहे. देहाला सुखी करण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत. यामुळे स्वरुपाची आठवणही होत नाही. स्वतःच्या स्वरुपाचा विचारही आपल्या मनात डोकावत नाही.

वयोमानानुसार देहामध्ये बदल होत राहातो. पण देह चांगला दिसावा यासाठीच आपले प्रयत्न सुरु असतात. म्हणजेच आपण देहाच्या विकासातच गुंतलेले आहोत. देहातील अंतरंगात आपण कधी डोकावूनही पाहात नाही. बाह्यस्वरुपाचाच विचार आपल्या मनात डोकावतो. अंतरंगातील स्वरुपाची जाणीवही आपणाला होत नाही. चैतन्य देहात आले आहे. हे चैतन्य देहापासून वेगळे आहे. पण आपण हे मानायलाच तयार नाही. अनुभव आल्याशिवाय अध्यात्म समजत नाही. आपल्या आचारात, विचारात अनुभवाने, अनुभुतीने बदल व्हावा लागतो. हा बदल झटकण होत नाही. हळूहळू अनुभवाने हा बदल घडवता येतो. स्वरुपाच्या बोधाने स्वरुपाचे ज्ञान विकसित होऊ शकते. हळूहळू त्यात प्रगती होऊन आत्मज्ञानी होता येते.

Related posts

अक्षरसागरचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

आशा आहे शेतकरी आत्महत्या थांबण्याची…

सामाजिक अन् साहित्यिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या मयुराताई

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More