शिवरायांनी जे काही कर्तृत्व त्यांच्या कारकिर्दीत गाजवलं त्यासाठी त्यांना प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ, वडील शहाजीराजे भोसले यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. आई-वडिलांचे संस्कार मुलांवर असतील, त्यांची प्रेरणा पाठीशी असेल तर आपण कितीही मोठं आव्हान पेलू शकतो, हे शिवरायांच्या कारकिर्दीकडे पाहता लक्षात येते.
मधुकर बालासाहेब जाधव
मोबाईल – 9421327689
महाराष्ट्र ही ज्याप्रमाणे संतांच्या विचारांनी पावन झालेली भूमी मानली जाते, त्याप्रमाणेच ती अनेक पराक्रमी पुरुषांच्या शौर्याने दुमदुमलेली भूमी म्हणून देखील ओळखली जाते. कितीतरी राजे-महाराजे या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. प्रत्येकाने आपापल्या कारकिर्दीत सर्वसामान्यांचे पालनपोषण, रक्षण करण्याचे कार्य केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे म्हणजेच स्वराज्य स्थापन करणारे शक्तियुक्तिकुशल राजे म्हणून महाराष्ट्रालाच नव्हे, भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला परिचित आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धात विजय मिळवले, स्वराज्य स्थापन केले. मोगलांच्या कचाट्यातून रयतेला मुक्त केले. शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ दिले. माता भगिनींच्या अब्रूचे रक्षण केले. त्याकाळातील प्रत्येकाला स्वाभिमानाने, ताठ मानेने जगायला शिकवले. अशी एक नाही तर अनेक महत्त्वाची कार्ये शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत पार पाडली. छत्रपती म्हणून लाखांचा पोशिंदा म्हणून शिवराय अजरामर आहेत. परंतु यामागे त्यांना करावा लागलेला संघर्ष, करावा लागलेला त्याग आपण लक्षात घेतला पाहिजे एखादी व्यक्ती यश मिळवते, नाव कमावते. आपल्याला वाटतं आपणही असंच प्रसिद्ध झालं पाहिजे; पण त्यासाठी कष्ट करण्याची, त्याग करण्याची मात्र आपली तयारी नसते. ‘दे रे हरी पलंगावरी’ असे जर आपण वागलो तर आपल्याला यश कसे मिळेल ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली, वयाच्या सोळाव्या वर्षी मावळ्यांच्या मदतीने तोरणा किल्ला जिंकला… स्वराज्य उभं केलं. आपण जेव्हा एखादं कार्य हाती घेतो, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आदर्श म्हणून, प्रेरणास्थान बनून कुणीतरी आपल्या पाठीशी नक्कीच असतं. एखाद्या व्यक्तीचा प्रभाव आपल्यावर पडलेला असतो. शिवरायांनी जे काही कर्तृत्व त्यांच्या कारकिर्दीत गाजवलं त्यासाठी त्यांना प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ, वडील शहाजीराजे भोसले यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. आई-वडिलांचे संस्कार मुलांवर असतील, त्यांची प्रेरणा पाठीशी असेल तर आपण कितीही मोठं आव्हान पेलू शकतो, हे शिवरायांच्या कारकिर्दीकडे पाहता लक्षात येते.
विदर्भकन्या राजमाता जिजाऊंनी बालशिवबावर संस्कार केले. पुणे परिसरातील जहागिरी टिकवताना अशुभ ठरवली गेलेली जमीन, गाढवाच नांगर फिरवली गेलेली शेती जिजाबाईंनी नांगरून घेतली. शिवबाच्या हाताने पेरणी केली आणि जो जमीन कसेल त्याचा निवेश होईल, ही अफवा केली. एखादी गोष्ट आपल्याला इतरांना पटवून द्यायची असेल त्यासाठी स्वतःला त्या कार्यात झोकून द्यावं लागतं, हे आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्याकडून शिकता येते. अनेक घटना प्रसंगाचे शिवराय स्वतः साक्षीदार असल्याने आपोआप त्यांच्यामध्ये रयतेप्रति कळवळा, प्रेम, व्यवहारकुशलता असे अनेक गुण रुजले. या बळावरच ते शिवबाचे शिवाजी व शिवाजीचे छत्रपती शिवाजी महाराज बनले.
छत्रपती शिवरायांनी सर्वच बाबतीत रयतेची काळजी घेतली. जिजाऊंच्या प्रेरणेने शिवराय राज्यकारभार पाहू लागले, स्वतः निर्णय घेऊ लागले. स्वराज्यातील माता-भगिनींचे रक्षण करू लागले. एखाद्याने गुन्हा केला व तो सिद्ध झाला तर गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाई. याबाबतची अनेक उदाहरणं इतिहासामध्ये सापडतात.
पुण्याजवळ असलेल्या रांझेगावच्या पाटलाने स्त्रीवर अत्याचार केला, ही माहिती जिजाऊ – शिवरायांपर्यंत पोहोचली. गुन्हेगाराला शिवरायांसमोर उभे केले. गुन्हा सिद्ध झाला. पाटलाला साधी शिक्षा दिली तर कोणीही असे दुकर्म करीत राहील, हा विचार करून पाटलाचा चौरंगा करण्याची शिक्षा दिली. चौरंग म्हणजे त्याचे हात व पाय कापून टाकण्यात आले, तिला न्याय तर मिळाला सोबतच इतरांवर देखील वचक निर्माण झाला. यावरून एखादी समस्या मुळापासून नष्ट करण्याचे धोरण शिवरायांनी अंगीकारले होते, हे आपल्या लक्षात येते. आताच्या काळात आपण पाहतो निर्भया, कोपर्डी, हिंगणघाट, हैदराबाद वा इतर ठिकाणी स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहेत. ते थांबवण्यासाठी शासनाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे. आपणही शासन काहीतरी करेल या पलीकडे जाऊन विचार करायला हवा व आपल्या पातळीवर माता-भगिनींचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
कल्याण-भिवंडी या अरबी समुद्राजवळील औरंगजेबाच्या व्यापारी ठाण्यांवर आक्रमण करण्याची मोहीम शिवरायांनी आखली. ही जबाबदारी आबाजी कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली. कल्याणचा सुभेदार लढाईत टिकला नाही, पळून गेला. जेव्हा लुटीचा हिशेब सादर केला गेला, तेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांसमोर उभं करण्यात आलं. शिवाजी महाराज म्हणाले हा काय प्रकार आहे ? सरदार उद्वारले शत्रू जेव्हा लूटमार करतात तेव्हा आपल्या स्त्रिया पळवून नेतात, म्हणून भी सुभेदाराच्या सुनेला बंदी बनवले आहे. शिवराय रागाने लालबुंद झाले त्यांनी कानउघडणी केली. शत्रूचे राज्य व स्वराज्य यातला फरक समजपूर सांगितला. त्या स्त्रीला चोळी-बांगडी देऊन सन्मानाने परत पाठवले ही प्रत्यक्षात घडली की, नाही याबाबत मतभेद असले तरी अशी घटना झाल्यास परस्त्रीला मातेसमान मानावे, हा एक गुण घेण्यासारखा सुभेदाच्या सुनेला पाहून शिवरायांच्या मनामध्ये जो विचार आला तो कवीने असा मांडला आहे की…..
अशीच असती आमची आई, सुंदर रूपवती
आम्हीही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती
स्त्रिला आईचा दर्जा देऊन, तिचा आदर करून शिवरायांनी एक नवा आदर्श निर्माण केला. तो आपण वारसा म्हणून नक्कीच जपायला हवा व परस्त्रीला समान मानायला हवे.
कर्नाटक प्रांतात बेडवळीच्या किल्ल्यावर शिवरायांचे मेहुणे सखूजी गायकवाड यांनी आक्रमण केले. किल्लेदार सावित्री देसाई यांनी प्रतिकार केला. तेथील स्त्रिया सैनिकांचा पोशाख घालून लढल्या. सखूजी गायकवाडांना मिळेना तेव्हा शिवाजी महाराजांनी अधिकचे सैन्य पाठवले तेव्हा किल्ला जिकता आला. सावित्री देसाई यांना सखूजी गायकवाडांकडून कैद करण्यात आले. या लढाईदरम्यान गायकवाड यांनी आमच्या स्त्रियांचा अवमान केला, अशी तक्रार सावित्री देसाई यांनी महाराजांच्या कानावर घातली. शहानिशा करण्यात आली. गायकवाड दोषी आढळले. परिणामी त्यांना सरदारकी गमबाबी लागली. तिथेही त्यांनी आपला परका हा विचार केला नाही. सद्यस्थितीला अशा निरपेक्ष वृत्तीच्या माणसाची गरज आपल्याला भासते.
अण्णाजी दत्तोच्या जावयाने आरोप केला की, त्याच्या पत्नीला- गोदावरीला शंभुराजांनी नादाला लावले आहे. शिवरायांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. आरोप सिद्ध झाला तर युवराज संभाजींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येईल, असे जाहीर केले. प्रकरण निकाली निघेपर्यंत संभाजीनी शिवरायांची भेट घेऊ नये, असा आदेश काढला. युवराज संभाजींचे सर्व प्रशासकीय अधिकार गोठवण्यात आले. सोयराबाईनी या सर्व प्रकरणाची चौकशी केली. युवराज संभाजी हे निर्दोष असल्याचा निर्वाळा सोयराबाईनी दिला, तेव्हा शिवरायांनी युवराज संभाजींवरील निर्बंध हटवले व भेट घेण्याची मुभा दिली. हे पाहता लक्षात येईल की, न्यायनिवाडा करताना शिवराय आपला परका असा भेद करीत नव्हते.
शिवराय ज्याप्रमाणे स्त्रियांचे रक्षण करायचे, त्याप्रमाणे त्यांचा व त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मानही करायचे. याबाबतचे उदाहरण आपल्याला हिराची नंतर हिरकणी म्हणून ओळखली जाऊ लागलेल्या स्त्रीच्या रुपाने पाहता येते. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात राहणारी हिरा दिवसभर गडावर जाऊन दूध विकायची. सूर्यास्तानंतर रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे ते थेट सकाळी सूर्योदय झाल्यानंतर उघडायचे, त्यामुळे गडावरून खाली यायचं असेल तर सूर्यास्तापूर्वी बाहेर पडावे लागे. एक दिवस हीरा दरवाजाजवळ येईपर्यंत उशीर झाला. दरवाजे बंद झाले होते. उघडण्याची परवानगी कुणालाच नव्हती. घरी लहान बाळ सोडून आलेली हिरा अस्वस्थ झाली. बाळापर्यंत पोहचायचंच हा निर्धार तिने केला आणि गडावरील एका अवघड तटावरून ती खाली उतरली व घरी पोहचली. ही माहिती जेव्हा शिवरायांना समजली, तेव्हा ते चकित झाले. गडाचे दरवाजे बंद असताना कुणाला आत यायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल तर सकाळपर्यंत वाट बघावी लागायची. रायगडाची ख्याती अशी होती की, एकदा दरवाजे बंद झाले की, आत फक्त हवा प्रवेश करू शकत होती व बाहेर पडू शकत होते ते फक्त गडावरचे पाणी. असं असताना हिरा नावाची स्त्री गड्द्यावरून खाली उतरते. त्या स्त्रीच्या-हिराच्या धाडसाची दखल घेत शिवरायांनी भेट घेण्यासाठी तिला निरोप पाठवला. तिचं कौतुक केलं आणि त्या तटावर एक बुरूज बांधला त्याला हिरकणी हे नाव दिले.
छत्रपती शिवरायांनी त्यांच्या मातोश्री राजमाता जिजामाता यांच्याकडून मिळालेल्या संस्काराच्या बळावर रयतेच्या मनावर अधिराज्य गाजविले. स्वराज्याची निर्मिती करून एक नवा इतिहास घडविला. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण वाचले व त्यावर चिंतन केले तर शिवराय हे स्वतः संस्काराचे समृद्ध विद्यापीठ होते हा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही…
संस्काराचे समृद्ध विद्यापीठ मधुकर बालासाहेब जाधव यांच्या 'संस्कृती : काल आणि आज या लेखसंग्रहातील लेख एकाच वेळी विचारप्रवणता, अंतर्मुखता आणि चिंतनशीलता यांनी परिप्लुत आहेत. लालित्याच्या अवगुंठनातून त्यांची अभिव्यक्ती झाली आहे. यातील लेख जसे लेखकाच्या चिंतनशीलतेतून जन्मलेले आहेत तसेच ते जीवनमूल्यांवरील निष्ठेतून साकारलेले आहेत. आजच्या समाजात नैतिक मूल्यांची होणारी परवड पाहून अस्वस्थ होणाऱ्या मनातून शब्दरूप बनले आहेत. समाजाला सुस्थिर बनवणारी शाश्वत मूल्ये, सुसंस्कार, विधायक विचार, आश्वस्त करणारी जीवनशैली यांना नावीन्याच्या हव्यासापायी तिलांजली देऊ पाहणारी आजची तरुणाई जाधवांच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करते. संवेदनशील मनाची ही अस्वस्थता शब्दरूपातून प्रकटते. असे असल्याने 'संस्काराचे समृद्ध विद्यापीठ असणारे छत्रपती शिवराय .....' त्यांच्या जीवनधारणेचा आदर्श आहेत. म्हणूनच प्रेरक व संस्कार देणाऱ्या, राष्ट्रभक्ती तेवत ठेवणाऱ्या कविता रसिकांकडून वाचल्या जाव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. मातृभाषा हा अभिमानाचा विषय असला पाहिजे, बनला पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन आहे. आपल्या संस्कृतीचा. सामाजिक परंपरांचा, नीतिमत्तेचा लोकनाट्याप्रमाणे 'तमाशा' होणार नाही यांची खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे समाजाला बजावणारे हे आग्रही मन आहे. आजच्या बाजारू, दिखाऊ व प्रदर्शनीजगात शाश्वताचा, सुसंस्कारांचा. नैतिक मूल्यांचा होत चाललेला -हास पाहून जाधव अस्वस्थ होतात. अंतर्मुख होतात. अंतर्मुख वृत्तीतून जन्मलेल्या या 'संस्कृती : काल आणि आज मध्ये म्हणूनच वाचकालाही अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य निश्चित आहे. - डॉ. अरुण प्रभुणे, माजी व्हिजिटिंग स्कॉलर. स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिका
पुस्तकाचे नाव – ‘संस्कृती : काल आणि आज
प्रकाशन – नभ प्रकाशन, अमरावती मोबाईल – 7798204500, 9923145400
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.