अनेक प्रसंग छत्रपती शिवरायांचा दूरदृष्टिकोन, स्त्री पुरूष समानता, स्त्री स्वातंत्र्य, धर्मभावना, आदराची भावना, स्त्रीकडे पाहाण्याचा निकोप दृष्टिकोन स्पष्ट करतात. ‘शिवचरित्रातून काय शिकावे?’ या प्रश्नाचे उत्तर आपल्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट, समस्येशी जोडून घेता येईल.
ॲड. शैलजा मोळक
शिवस्फूर्ती, अ-४८ कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी पुणे -१५
मो. ९८२३६३७२४४
मातृसत्ताक संस्कृती ही वैभवशाली भारताची खरी ओळख आहे. भारताला वैभवशाली बनविण्यासाठी अनेक स्त्रियांनी आपले सर्वस्व व कर्तृत्व पणाला लावल्याची नोंद इतिहासात सापडते. ऐतिहासिक काळात डोकावताना राष्ट्रमाता जिजाऊंचे स्थान अग्रक्रमावर दिसते. महाराष्ट्राला दोन छत्रपती देणारे हे व्यक्तिमत्व समस्त स्त्रीवर्गाचे प्रेरणास्थान आहे.
शिवपूर्वकाळात मुसलमानी अंमलाखाली होणाऱ्या जुलमाने जनता त्रस्त होती. मुली व महिलांना पळवून नेऊन अन्याय व अत्याचार करणे, गुलाम स्त्रियांची विक्री होणे असे प्रकार सर्रास होत होते. शहाजीराजे आदिलशाहीत सरदार होते पण जिजाऊंशी चर्चा होताना ते दोघेही स्वराज्याचे स्वप्न पहात होते.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंनी गोरगरीबांचे पालनहार करणारा, स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या शिवबाला जन्म दिला. ७-८ वर्षाच्या शिवबाला घेऊन जिजाऊ बंगळूरला शहाजीराजांकडे काही काळासाठी गेल्या. तेथे २ वर्ष शहाजीराजांनी स्वराज्य निर्मितीस आवश्यक ते शिक्षण व संस्कार शिवबाला केले. तिकडून पुण्यात परतताना शहाजीराजांनी राज्यकारभारास लागणारे पेशवे, मुजूमदार, डबीर, सबनीस इ. अधिकाऱ्यांसह व काही शिक्षकांसह राजमाता जिजाऊ व शिवबांना पाठवले.
शिवाजीराजांना ‘प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ’ ही मुद्रा व स्वराज्य ध्वज शहाजीराजांनी बनवून दिला आणि स्वराज्य निर्मितीचे स्वप्न शिवबाच्या मनात निर्माण केले. स्वराज्य व्हावे ही शहाजीराजे व राजमाता जिजाऊंची इच्छा होती त्यानुसार राजे घडत होते.
मावळ प्रांतात फिरताना लोकांची दयनीय अवस्था, मुसलमानी अत्याचार, स्त्रीयांचे अपहरण, धर्माचा प्रतिदिन होणारा ऱ्हास हे सारं शिवबाराजे पहात होते. राज्याचा राज्यकारभार, पत्रव्यवहार, न्यायनिवाडा, रयतेच्या अडीअडचणी, समस्या हे सारं जिजाऊंच्या देखरेखीखाली ते शिकत होते. जिजाऊंनी राज्यकारभारात घेतलेले निर्णय व केलेले न्यायनिवाडे राजे काळजीपूर्वक पहात होते, आत्मसात करीत होते. त्यामुळे पुढील काळात राजांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन हा निकोप राहण्यास मदत झालेली दिसते. जिजाऊंच्या एकूणच विचारांचा प्रभाव, स्वभावाची छाप, उदारमतवादी, समतावादी नेतृत्व गुण, उमदे व्यक्तिमत्व हे सारं राजांच्या जडणघडणीसाठी पायाभूत ठरलेले दिसते. जिजाऊ सर्व निर्णय घेताना स्त्री सन्मान, स्त्रीजातीबद्दल कळवळा व्यक्त करत तटस्थपणे घेत त्यामुळे पुढे शिवाजीराजांनीही ‘शत्रूच्या भाजीच्या देठाला व स्त्रीच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेण्याची सक्त ताकीद सैन्याला होती.’
लढाईच्या वेळी स्त्रीया व मुलं पकडणे हा गुन्हा मानला जात असे. परकीय स्त्रीचाही सन्मान करायची शिकवण त्यांना मिळाली होती व ती त्यांनी हयातभर जपली. युध्दकाळात सैनिकांनी स्त्रीयांच्या वाटेला जाऊ नये अशा सक्त आदेश सैनिकांना देणारा छत्रपती शिवाजी महाराज हा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहासातील एकमेवाद्वितीय राजा होता.
छत्रपती शिवाजी राजांना अगदी लहान वयातच स्त्री अत्याचाराचा निवाडा करायची संधी मिळाली. रांझाच्या पाटलाने पळवलेल्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केले. त्या मुलीने अब्रू गेली आता मरण बरं असे समजून जीव दिला. पाटलाला दरबारात हजर केले व जिजाऊंनी शिवबाराजेंना निवाडा करायला सांगितले. क्षणाचाही विलंब न करता शिवबांनी पाटलाचे हात कलम करायचा आदेश दिला. या कठोर निर्णयाने सगळीकडे आश्चर्य पसरले व शिवाजी राजांची दहशत बसू लागली. अशाच पनवेलच्या जवळच असलेल्या प्रबळगडाचा प्रमुख केसरीसिंह याच्याशी झुंज देऊन तो मारला गेला. तेव्हा केसरीसिंहची आई व दोन लहान मुलं तेथेच लपून होती त्यांना शोधून त्यांना नमस्कार करून तिला पालखीचा मान व संपूर्ण संरक्षण देऊन तिच्या मूळगावी पाठवले.
तसेच कल्याणच्या सुभेदाराचीही घटना मराठ्यांच्या इतिहासात अविस्मरणीय आहे. परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श आज समस्त पुरूषांनी घेण्याची गरज आहे. सावित्रीबाई देसाई या किल्लेदार स्त्रीने आपल्या पतीच्या निधनानंतर सलग २७ दिवस किल्ला लढवला. पण सकुजी गायकवाड या सेनापतीने तो जिंकला. सावित्रीबाईने जेरीस आणले या सूडभावनेने त्याने तिच्यावर बलात्कार केला. हे शिवाजी राजांना समजताच त्यांनी विजयी सेनापतीची सुध्दा गय केली नाही. त्याचे डोळे काढण्याचे फर्मान काढले व जन्मभर तुरूंगात डांबले. आणि आज मात्र कुटुंबातील, नात्यातील पुरूष आपल्याच स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार करत आहेत व त्याकडे घरचेही दुर्लक्ष करतात किंवा ती गोष्ट दडपण्याकडे कल असतो. हे भयानक वास्तव आज आहे.
संभाजी राजांना दूध पाजणाऱ्या धाराऊचा सन्मान असो की रात्रीच्या वेळी तान्ह्या लेकराच्या ओढीनं खडतर बुरूज उतरून लेकराला कवटाळणाऱ्या हिरकणीचा साडी चोळी देऊन सन्मान करणे आणि त्या बुरूजाला ‘हिरकणी बुरूज’ हे नाव देणे या सर्वांची बीजं जिजाऊंच्या संस्कारात आढळतात.
शिवाजीराजांनी आपल्या सर्व पत्नींना योग्य तो मानसन्मान तर दिलाच पण कौटुंबिक निर्णयात सहभाग, राज्यकारभारात सल्लामसलत केल्याचेही दिसते. शिवाजी राजांनी घेतलेले काही निर्णय जिजाऊंनी फिरवलेले दिसतात. शिवाजी राजांच्या वतीने’जिजाऊ-वलिदा-इ-राजा शिवाजी’ हा फारसी शिक्काही उपलब्ध होता. संभाजीराजांची पत्नी येसूबाईंना तर संभाजीराजासोबत बालपणापासूनच राजकारणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले. पुढे येसूबाईंनाही ‘सखी राज्ञी जयति’ असा शिक्का मोर्तब दिला होता. संभाजी राजांच्या गैरहजेरीत राजपत्रे देणे व आवश्यक ते हुकूम काढण्याचा अधिकार येसूबाईंना बहाल केलेला दिसतो. संभाजीराजे दिलेरखानाकडे गेल्याने शिवाजीराजे हताश व विवश झाल्याने येसूबाईंनाच काही उपाय सुचवा असे म्हणून चर्चा करताना दिसतात. याचाच अर्थ शिवाजी राजे आई सारखेच सूनेसोबतही सल्ला मसलत करतात हे लक्षात येते.
पुढे राजारामाची पत्नी महाराणी ताराराणीनेही औरंगजेबाला ९ वर्ष जेरीस आणल्याचा इतिहास आहे. पडदानशीन काळातही छत्रपती शिवाजीराजांनी व त्यापूर्वी राजमाता जिजाऊंनी लढाईचे शिक्षण घेतले होते. तेच पुढे इतिहासात झिरपलेले दिसते. असे अनेक प्रसंग छत्रपती शिवरायांचा दूरदृष्टिकोन, स्त्री पुरूष समानता, स्त्री स्वातंत्र्य, धर्मभावना, आदराची भावना, स्त्रीकडे पाहाण्याचा निकोप दृष्टिकोन स्पष्ट करतात. ‘शिवचरित्रातून काय शिकावे?’ या प्रश्नाचे उत्तर आपल्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट, समस्येशी जोडून घेता येईल.