सावळी
सोनवर्खी ऊन्ह गाली सावळी माझी सखी
ती अशी न्हाऊन आली सावळी माझी सखी
मोकळ्या केसांत वेडी गुंतलेली वादळे
वादळी आवेग झाली सावळी माझी सखी
गंध अंगीचा तिचा रानात फुलल्यासारखा
दरवळे ती भोवताली सावळी माझी सखी
रंग ओठांचा कुसुंबी संग ओठांचा खुळा
वीज ओठांनीच प्याली सावळी माझी सखी
श्वास श्वासाला मिळाला एकवटला अंतरी
आग झाली आग ल्याली सावळी माझी सखी
नेहमी परक्यापरी मी भेटतो माझा मला
सांगते माझी खुशाली सावळी माझी सखी
रीत वा विपरीत काही पाहते ना जाणते
जन्मही करिते हवाली सावळी माझी सखी
- कवी – श्रीराम ग. पचिंद्रे