September 24, 2023
ek-hoti-sara-book-review-by-sharad-thakar
Home » माणसातल्या माणुसकीचा शोध घेणारी सारा शगुफ्ता
काय चाललयं अवतीभवती

माणसातल्या माणुसकीचा शोध घेणारी सारा शगुफ्ता

मोर आपले पाय बघून रडतो असे लिहिणारी सारा हे ठिक आहे, पण ती माझी माणसं बघून रडते असं का म्हणत असेल या उत्सुकतेपोटी तिच्याबद्दल जाणून घेताना. साराचे दुःख काय आहे हे खरोखर तिचे ‘एक होती सारा’ मुळातून वाचल्याशिवाय समजणार नाही.

शरद ठाकर

सेलू, जि परभणी
८२७५३३६६७५

“एक होती सारा” अर्थात सारा शगुफ्ता एक पाकिस्तानी कवयित्री अमृता प्रीतम यांच्यामुळे सर्वांना माहीत झाली. बाई म्हणून, कवयित्री म्हणून तिचा जो पाकिस्तानमध्ये छळ होत होता. त्याबद्दल सारा शगुफ्ता अमृता प्रीतम यांना पत्र पाठवते. त्या पत्रांमधून त्यातल्या मजकूरांमधून, कवितांमधून अमृता प्रीतम त्या पत्रांच्या कवितांच्या तुकड्या – तुकड्या मधून साराच्या कवितेची ताकद, तिचे दुःख समजून घेते. तिला जगण्याची उमेद देतात आणि त्या दोघी एकमेकींच्या सख्या होऊन जातात. दोघींना एकमेकीं बद्दल पत्राच्या माध्यमातून संवाद साधल्या शिवाय चैन पडत नाही.

‘आशयघन’ अंकाच्या स्त्री विश्व विशेषांकाचे संपादन करताना संपादक तथा कवयित्री संजीवनी तडेगावकर यांना

“मोर आपले पाय बघून रडतो,
मी माझी माणसं बघून रडते”

ह्या सारा शगुफ्ताच्या ओळी वाचायला मिळतात. तिच्या बद्दल अधिक जाणून घेण्याच्या उत्सुकतेने संजीवनी तडेगावकर सारा बद्दल अधिक माहिती मिळवतात आणि त्यातूनच मराठी वाचकांसाठी ‘एक थी सारा’ हे सारा शगुफ्ताचे अमृता प्रीतम यांनी लिहिलेले जीवन चरित्र आपल्याला मराठीत अनुवादित रूपात ‘एक होती सारा’ वाचायला मिळत आहे.

मोर आपले पाय बघून रडतो असे लिहिणारी सारा हे ठिक आहे, पण ती माझी माणसं बघून रडते असं का म्हणत असेल या उत्सुकतेपोटी तिच्याबद्दल जाणून घेताना. साराचे दुःख काय आहे हे खरोखर तिचे ‘एक होती सारा’ मुळातून वाचल्याशिवाय समजणार नाही. एक स्त्री म्हणून स्त्रीवर माणूस किती बंधने टाकत असतो, तिला एक वस्तू म्हणून तिचा वापर करतो. तिच्या मनाचा, मताचा कसलाही विचार न करता. तिला फक्त स्वतःसाठी राबवून घेणे एवढेच माणसाला माहीत असते. गपगुमान राबवून घेणारा नवरा, घराच्या बाहेर पडायचे बंधन, लिहायचे, वाचायचे बंधन, बाप मेल्यावर बापाच्या अंत्ययात्रेला जायचं बंधन, नव-याच्या वाईट वागण्यामुळे सारा घटस्फोट घेते. न्यायालयातून पोटगी मिळवते आणि मुलांना स्वत:कडे ठेवण्यासाठी न्यायालयात उभे राहून नवऱ्याचे सर्व खोटे आरोप काळजावर दगड ठेवून मान्य करत तिला म्हणावं लागतं

“जज साहेब, हा माणूस एकदम खरं बोलतो आहे, मी स्वैराचारी आणि चारित्र्यहीन आहे. त्यामुळे मी हे कबूल करते की, ही मुलं या माणसाची नाहीत त्या मुलांचा बाप दुसराच कोणी तरी आहे. न्यायालयाने मला परवानगी द्यावी, की मी त्या मुलांना त्यांच्या खऱ्या वडीलाकडे पोहोचू शकेल.” मुलांना स्वतःजवळ ठेवण्यासाठी असं मार्मिक बोलणाऱ्या साराच्या मनाला झालेल्या वेदना कोण समजून घेणार आहेत.

पालकत्वाची जबाबदारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार साराकडे असताना मुलांचा बाप मुलांना भेटायला आल्यावर. नवऱ्याचा अनादर न करता. मुलांना भेटायला परवानगी देते, पाहुणचार करते. नवरा कुराणवर हात ठेवून काही दिवसांसाठी मुलं मला दे ! काही दिवसांनी मी ते परत आणून सोडील म्हणतो किंवा कायदेशीर कागदपत्र करायचे असतील तर ते पण करून घे असं नवरा म्हणतो. तेव्हा सारा म्हणते “जर तू कुराण हातात घेऊन एवढं सांगतोस तर कायदेशीर कागदपत्रांची काही गरज नाही, माझा कुराणवर विश्वास आहे. “

पण साराचा नवरा पुन्हा साराला कधीच मुलांना भेटू देत नाही. उलट सारा त्याच्या घरी मुलांना भेटायला गेली तर तिच्यावर नोकराकरवी गोळीबार करून तिला त्रास देतो.

सारा पुढे कुटुंबनियोजन विभागात नोकरीला असणाऱ्या मित्रासोबत लग्न करते. सातव्या महिन्यातच तिला बाळ होतं आणि ते काही क्षणातच जगाचा निरोप घेते. त्याही परिस्थितीत नवऱ्याची साथ नसते. दवाखान्यात ती एकटीच असते. तो त्याच्या स्वतःच्या व मित्राच्याच नादात असतो. वरवर नमाज पठण करत जा म्हणणारे, वरवर चांगले वागणारे आणि मनात कोतेपणा असणारे माणसं साराला खूप खुजी वाटायला लागतात. सारा म्हणते “मला भुकेपेक्षा जास्त माणुसकीचा शोध आहे.” तिला सक्तीचे सहजीवन मान्य नव्हते. सारा पंजाबी आणि उर्दू भाषेतून कविता लिहायची पाकिस्तानमध्ये तिचा कवितासंग्रह प्रकाशित होत नव्हता.

खोटेपणा, ढोंग, नाटक, फसवणूक या सगळ्यांशी सारा चांगलीच परिचित झाली होती, म्हणून तिला कोणाशीच नातं जोडाव वाटायचं नाही. आयुष्यात जे पुरुष आले त्यांचे रूप तिने चांगलेच अनुभवले होते. तिला घरच्यांनी आणि समाजाने वेडं ठरवून वेड्यांच्या दवाखान्यात ठेवलं होतं. इलेक्ट्रिक शॉक दिले. तरीही ती कविता लिहित रहायची. तिचं सुख-दुःख समजून घेणारी तिची मैत्रीण अमृताला पत्र लिहायची. तिने चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण मृत्यु आला नाही. तेव्हा सारा म्हणते, “जेव्हा वाचवणारा देव असतो, तेव्हा विषाचे देखील अमृत होते.”

तरूण असलेल्या साराला आई म्हणायची पुन्हा लग्न कर , लग्न हाच तुझ्या दुखण्यावर इलाज आहे, असे डाॅक्टर सांगत आहेत म्हणून तू लग्न कर असे अम्मा साराला म्हणते “माझं ऐक बांगड्याच्या गोंगाटात सामावून जा, तू तरुण आहेस. मोहल्ल्यातील लोक नाही नाही ते बोलतात-“

सारा अम्माच्या इच्छेखातर पुन्हा कमी शिकलेल्या, कुरूप मुलासोबत लग्न करायला तयार होते. तेव्हा सारा पूर्वानुभवानुसार म्हणते, “आम्मी पण माहितीय का, बांगड्या कधीच गोंगाट केल्याशिवाय राहत नाहीत”

तेव्हा अम्मी म्हणते हारशील म्हणून भीती वाटते काय ? तेव्हा सारा जे उत्तर देते त्यावरून आपल्याला सारा किती संवेदनशील आहे हे समजून येते. ती म्हणते “नाही अम्मी ! जर तुझ्या जिंकण्यात माझी हार असेल तर मी आयुष्यभर हरणे पसंत करीन” दुसऱ्याच्या आनंदासाठी अपार संकटं, यातना सहन करणारी सारा आयुष्यभर पराभव पसंत करते. आणि हे लग्नही अवघे पंचवीस दिवस टिकते. त्यानंतर सारा पुन्हा एकटी राहते.

सारा तिच्या एका कवितेत म्हणते.
“कुणाची काही वस्तू हरवली, तर मी शोधू लागणाऱ्या मध्ये सहभागी आहे”
अशी हळव्या मनाची सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसातल्या हरवलेल्या माणुसकीला शोधू लागणारी सारा आपल्याला समजून घ्यायची असेल तर तडेगावकर अनुवादित “एक होती सारा” मुळातून वाचायला लागेल. तरच सारा काय होती, कशी होते आपल्याला समजू शकेल. अवघ्या तीस वर्षाच्या आयुष्यात संघर्ष, अपार दु:ख याशिवाय तिच्या वाट्याला काहीच आले नाही. तरीही त्या संघर्षातही ती कशा पद्धतीने जीवनाकडे सकारात्मकपणे पहाते, किती अडचणींचा सामना करत लेखन करते. हे मुळातून समजून घ्यायला “एक होती सारा ” हे वाचावेच लागेल.

वेडं ठरवून वेड्यांच्या दवाखान्यात ठेवल्यानंतर सारा दवाखान्यात राहून तिथल्या बायांच्या व्यथा वेदना जाणून घेते. त्या आपल्या लेखनातून जगासमोर मांडते, तेव्हा माणसाचं मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहात नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी शहाण्या बायांना वेडं ठरवणारे दवाखान्याच्या बाहेर राहणारे कसे खरे वेडे आहेत, हे आपल्याला समजायला लागतं.

कुटुंबाने, जगाने वेडं ठरवलेल्या साराला ओळखणारा, निस्वार्थ प्रेम काय असतं ते ज्याच्याकडून शिकायला मिळतं असा सईद अहमद आपल्याला ‘एक होती सारा’ यामध्ये साराचा मित्र म्हणून भेटतो. जो की त्याच्या मित्राला भेटायला दवाखान्यात जातो आणि तिथे लिहित बसलेली सारा त्याला दिसते.

सारा आणि सईदचे दवाखान्यात थोडे बोलणे होते, परंतु माणसांपासून दूर राहू इच्छिणारी सारा. सारा या नावाने बदनाम झालेली सारा. त्याला ओळख सांगताना रुबी हे तिचं खोटं नाव सांगते, पण सईद अहमद मात्र आपलं खरं नाव, खरा टेलीफोन नंबर तिला देतो. रूबी अर्थात साराने सईदला वचन दिले होते, की मी फोन करीन, पण तिचे वचन तिच्या रुबी या नावासारखेच खोटे होते. तिला कोणावरही प्रेम करायचे नव्हते. तिला फक्त कविता लिहायची होती. तिच्या स्वतःच्या दुधाच्या शपथेसाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, परंतु सईद अहमद सारासाठी सतत दोन वर्ष तिच्या फोनची वाट पहात असतो.

जेव्हा सईद अहमद काही कामानिमित्ताने बाहेर जायचे, तेव्हा विश्वासू नोकराला फोन जवळ बसून ठेवायचा. सतत दोन वर्ष ती वर्तमानपत्रात काम करते म्हणून सर्व वर्तमानपत्राच्या ऑफिसमधून चकरा मारत राहिले. पुन्हा पुन्हा दवाखान्याच्या रस्त्यावरून येत – जात राहिले आणि शेवटी सईद अहमद यांना सारा त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच जागेवर भेटते.

जीवनातील अतीव दुःखद घटना नंतर दोघांची भेट होते. तेव्हा सारा सईदला म्हणते. “माझे डोळे विझून गेले तरी, मी तुझी वाट पाहत असेन ! मी झोपी गेले तरी माझं मन नेहमी तुझ्यासाठी जागं राहीन. हे जागं रहाणं मी तुझ्याकडूनच शिकले आहे आणि तूही मोठ्या कर्तव्यभावनेने मला ते शिकवलेस.”

साराने एका पत्रात सईदला म्हटलय एक गोष्ट सांगू, एक होती सारा, एक होता सईद ! ते दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करत होते, की “इतकं” हा शब्द कमी पडत होता. टागोरांचं एक गाणं आठवतंय
“तूच माझा समुद्र आहेस, तूच माझा ईश्वर,
मी एक होडी आहे,
काठाला लाव असं तुला का म्हणू !
बुडून जरी गेले तरी तुझ्यातच बुडेन कारण, तूच माझा समुद्र आहेस आणि तूच माझा ईश्वर”

अशी ही माणसाने लिहिलेले माणूसकीचे कुराण शोधणारी, माणसातली माणुसकी शोधणाऱ्या सारा शगुफ्ताची कहाणी वाचताना हा अनुवाद नसून आपल्याच भाषेतील आपल्याच हळव्या साराचे जीवन चरित्र, कविता, पत्र, पत्रातले संवाद या रूपात वाचतांना आपणही साराच्या कधी प्रेमात पडतो हे कळत नाही. आपण “एक होती सारा” नक्की वाचावं तिच्याकडून लिहिण्याची प्रेरणा घ्यावी, यासाठी हा लेखन प्रपंच.

पुस्तक – एक होती सारा
मुळ लेखिका – अमृता प्रीतम
अनुवाद – संजीवनी तडेगावकर
प्रकाशक – सुनिताराजे पवार, संस्कृती प्रकाशन, पुणे
पृष्ठ – १७६
मूल्य – २५० ₹

Related posts

अक्षरसागरचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

सायबर समाजाच्या प्राबल्यामुळे परिवर्तनवादी चळवळींचा अवकाश आक्रसतो – रणधीर शिंदे

भारतातील भाषा आणि साहित्य तसेच जैवविविधता या विषयावरील टपाल तिकीटांचे प्रदर्शन

Leave a Comment