सद्गुरूंचा हा उपदेशच मनाला मोठा धीर देतो. त्यांच्या या नुसत्या शब्दानेच मोठा आधार मिळतो. कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धाडस अंगात उत्पन्न होते. कामांमध्ये आधार मिळतो. या आधारावरच समोरच्या समस्या आपोआपच सुटतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
जया सद्गुरू तारू पुढे । जे अनुभवाचिये कासे गाढे ।
जया आत्मनिवेदन तरांडे । आकळिले ।।98।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा
ओवीचा अर्थ – ज्यास सद्गुरु हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मानुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदेनरूपी ताफा प्राप्त झाला आहे.
सद्गुरूंनी गुरुमंत्र दिल्यानंतर साधना ही आपणासच करायची असते, पण प्रत्यक्षात ही साधना सद्गुरूच आपल्याकडून करवून घेत असतात. गुरुमंत्राच्या उपदेशानंतर अनेक अनुभूती सद्गुरू देतात. त्यामुळे साधनेत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टींत सद्गुरूंचा सहवास असल्याची अनुभूती येते. हे आपण करत नसून सद्गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत, अशी अनुभूती येते; पण मोहमायेमुळे आपण अंध झालेले असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी अवधानाचा वाफसा असणे आवश्यक आहे. तरच गुरुमंत्राची व त्यानंतर होत असलेल्या उपदेशाची पेरणी वाया जाणार नाही. हे बीज वाया जाणार नाही ना?
अध्यात्मात प्रगती होईल ना? अशा अनेक शंका येत राहतात. काळजी वाटते, पण अशी काळजी करणे व्यर्थ आहे. कारण कर्तेकरविते हे सद्गुरूच आहेत, हे अनुभवाने आपल्या लक्षात येते. आपल्या डोळ्यांवरची ही झापड सद्गुरू दूर करतात आणि आपणास दृष्टी देतात. जीवनात येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगात सद्गुरूंची साथ असते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणारे स्वामी सदैव साथ देत असतात. फक्त आपली त्याकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, यावर ही अनुभूती अवलंबून आहे.
सद्गुरूंचा हा उपदेशच मनाला मोठा धीर देतो. त्यांच्या या नुसत्या शब्दानेच मोठा आधार मिळतो. कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धाडस अंगात उत्पन्न होते. कामांमध्ये आधार मिळतो. या आधारावरच समोरच्या समस्या आपोआपच सुटतात. प्रश्न मार्गी लागतात. कधी स्वप्नात येऊन सद्गुरू दृष्टांत देतात. या स्वप्नानेही मनाला धीर मिळतो. मनातील विचारांना चालना मिळते. हे विचार सद्गुरूच आपल्या मनात उत्पन्न करत असतात, असा भाव असायला हवा, पण हे होत नाही. यामुळेच अनुभूती मनाला भावत नाही.
सद्गुरू सदैव आपल्या सहवासात असतात. फक्त त्यांचे अस्तित्व आपणास जाणवले पाहिजे. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. तरच अनुभूती येते. अनुभूतीतूनच आध्यात्मिक प्रगती होत राहते. अनेक संकटे जरी आली तरी तारणारे सद्गुरु असल्यानंतर घाबरण्याचे कारणच उरत नाही. या भवसागरात बुडण्याची भितीच नाही. पण यासाठी शिष्याने आत्मानुभवांचे लाईफ जॅकेट जवळ ठेवलेले असायला हवे. हे जॅकेट असेल तरच आपण वाचू शकतो. अवधान ठेवून आत्मनुभवाची अनुभुती घेऊन शिष्याने प्रगती साधायला हवी. प्रयत्न करत राहायला हवे. मग तो कधीच बुडणार नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.