वर्षात एकदाच साजरा होणारा देवाचा उत्सव वर्षभर आनंद देऊन जातो. सेवा ही करवून घेतली जाते. त्यांची इच्छा असेल तर त्या सेवेचा लाभ आपणाला मिळतो. हे लक्षात घेऊन कर्म करायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें बहु न म्हणिजे ।
निवांतचि अर्पिजे । माझ्या ठायी ।। 123 ।। अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ – आणि जें जें कर्म घडेल तें कमी अथवा जास्त म्हणूं नकोस, तर तें निमूटपणानें माझ्या ठिकाणी अर्पण कर.
मनातील चिंता दूर कशी करायची ? मनात अनेक विचारांची कालवा कालव सुरु असते. अशाने मन कधी आनंदी, तर कधी दुःखी होते. दुःखाने नैराश्यही प्राप्त होऊ शकते. अशा मनाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीचा उपाय म्हणजे जे काही घडले आहे ते माझे नाही असे म्हणणे. शरीराने, मनाने जे काही कर्म केले जाते ते सर्व माझे नाही, असा विचार मनामध्ये रुजवायचा. याचाच अर्थ कर्म करत राहायचे पण ते मी केले असा अहंकार बाळगायचा नाही. म्हणजे त्या कर्माचा त्रास आपणाला होणार नाही.
मनापासून करा कर्म अर्पण
अपयश आले तर ते मनाला लावून न घेता. त्यापासून अलिप्त राहायचे. अपयश आलेच नाही असा सकारात्मक विचार करून पुढे जायचे. अपयश ही यशाही पहिली पायरी आहे, असे समजून वाटचाल करायची. अपयश आले ते यशासाठीच हाच विचार मनात ठेऊन कर्म करत राहायचे. सुख आणि दुःखाच्या घटनेत सदैव सम विचार ठेवायचा. सुख मिळाले ते सद्गुरुंच्याकृपेने. दुःख झाले तेही सद्गुरुंच्या कृपेने. असे म्हणून सर्व त्यांच्याचरणी अर्पण करायचे. सद्गुरुंच्यामुळे घडले असे विचार जरी मनात आले तरी ते त्यांच्याचरणी अर्पण होते. तो विचारच तर खऱ्याअर्थाने जोपासायचा आहे.
सर्व सदगुरुंच्या कृपेने
जे काही विचार आले तेही त्यांच्यामुळेच सुचले. त्यांनीच ते आपल्याकडून करवून घेतले असे समजायचे. अशाने आपल्यातील दुष्ट विचार आपोआपच कमी होतात. अहंकार सुद्धा जातो. मीपणा सुद्धा जातो. मन मोकळे होऊन आनंदी होते. सुखी होते. हे सुख सद्गुरुंच्या कृपेने मिळते. जे काही कर्म होते ते, मग ते छोटे असो की मोठे ते त्यांच्यामुळे होते असे जेव्हा म्हणून आपण त्याचा स्विकार करतो. तेव्हा त्या कर्माची बाधा आपणाला होत नाही. सर्व त्यांच्याचरणी अर्पण केल्याने मनातील चिंता कायमची नष्ट होते. चिंतेचे कारणच राहात नाही.
समर्पणामुळे अंहकार, मीपणा नष्ट
सद्गुरुंच्याकृपेनेच कर्म होत राहाते. कर्माची प्रेरणा ही त्याच्यापासूनच त्या परमात्मामुळेच मिळते. असा बुद्धीचा निश्चय करायचा आहे. ही प्रेरणा त्यांचीच आहे, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते सर्व तोच पाहून घेईल असा भाव आपोआप प्रगट होतो. देवाच्या देवळात उत्सव साजरे होतात. कधी कधी होत नाहीत. ही देवाची इच्छा आहे असे समजून कर्म करायला हवे. उत्सव देवाचा असतो. आपण फक्त त्याच्यात सहभागी होऊन आनंदी व्हायचे असते. त्या आनंदात डुंबायचे असते. देवच तो उत्सव आपल्या आनंदासाठी साजरा करत असतो. अशाने आपणाला उर्जा मिळते. प्रेरणा मिळते. स्फुर्ती मिळते. वर्षात एकदाच साजरा होणारा देवाचा उत्सव वर्षभर आनंद देऊन जातो. सेवा ही करवून घेतली जाते. त्यांची इच्छा असेल तर त्या सेवेचा लाभ आपणाला मिळतो. हे लक्षात घेऊन कर्म करायला हवे. म्हणजेच आपण प्रत्येक गोष्टीत निमित्तमात्र व्हायला शिकले पाहीजे. सर्व कर्मे त्याच्याचरणी अर्पण केली पाहीजेत. मनाने सुद्धा ती अर्पण करता येतात. फक्त तसा विचार आपल्यात निर्माण करायला हवा. म्हणजे आपणातील अहंकार, मी पणा नष्ट होईल.