कुणीही कसंही वागावं. माझं बिचारीचं काहीही म्हणणं नाही. पण जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर कुणाकडं मागायचं ? म्हटलं ज्याच्याबद्दल प्रश्न पडतो, त्यालाच विचारू या. पण तो तर भेटतच नाही. दिसतो फक्त. काहीच वेळ. कधी श्रोत्यांमधे. कधी व्यासपीठावर. कधी माईक समोर. त्यानंतर धुमकेतू सारखा अचानक गायब होतो. म्हणूनच वाटलं, त्याला या पत्रातून गाठू…
अर्चना मुळे,
समुपदेशक, सांगली. ९८२३७८७२१४
प्रिय कविमित्र,
काव्यपूर्ण नमस्कार…🙏
गेली अनेक वर्षे मी कवी संमेलनाला येते. तुझ्या कविता मनापासून ऐकते. कारण मला कविता ही कवी मुखातून ऐकायला आवडते. तुझ्या सादरीकरणातून तुझं शब्दांचं अंगण, तुझं भावविश्व मला समजतं. तुझ्याच शब्दात तू रमलास की मला तुझी कविता उत्तम झाल्याचा आनंद होतो. आणि म्हणूनच मी तुझ्या प्रत्येक कवितेला दाद द्यायला येते. मी संमेलनाच्या सुरुवातीपासून उपस्थित असते. शेवटपर्यंत थांबते. मला यायला एखाद्या वेळी उशीर झाला तर तुझी कविता ऐकायला मिळेल की नाही याची धास्ती वाटते. बहिणाबाई, नारायण सुर्वे, इंदिरा संत, कुसुमाग्रज, ग्रेस यांच्या कविता म्हणजे माझा जीव की प्राण. या सगळ्याना मी प्रत्यक्षात ऐकू शकले नाही म्हणून आजही जीवाची तगमग होते. ती शमवण्याचा एक प्रयत्न म्हणून देखील मी संमेलनाला येते. मला पाडगांवकर आणि मधुभाई एकदा असे भेटले जणू आमच्यात काहीतरी नातं असावं. पण तू सहज भेटू शकणारा.. माझ्या जवळचा.. तरीही भेटत नाहीस. कधीकधी तर ओळखही दाखवत नाहीस. कदाचित मी तुझी साहित्यिक नातलग नाही म्हणूनही असेल. ते ठीक आहे. मी समजू शकते. पण तुझी कविता ऐकण्याची माझी एकतर्फी धडपड कायम सुरू असते. श्रोता म्हणून माझं काय चुकलं मला कळत नाही की तुला तुझी कविता माझ्यापर्यंत पोहोचवावी असं वाटत नाही ? माहीत नाही.
प्रत्येक संमेलन संपल्यावर मला प्रश्न पडतो. कविमित्रा तू असा का वागतोस ? मुळात तू तिथं येतोसच का ?
फक्त तुझी कविता वाचायला तू येतोस का रे ? अशानं तू लोकांपर्यंत पोहोचतोस, पण तुझी कविता.. ती तुझ्यासह निघून जाते त्याच दारातून ज्या दारातून तू संमेलनासाठी येतोस. तुला माहीत आहे का परवाच्या एका संमेलनात ज्येष्ठ समीक्षक म्हणाले, “शाळेच्या अभ्यासक्रमातून कविता काढून टाकायला हव्यात.” हे ऐकून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. पण त्या तुला कशा कळणार. कविता वाचत, ऐकत मी भाषेचा अभ्यास केला होता. आता कविताच नाहीशी झाली तर..? विचार करूनच घाबरायला होतं.
मी कवयित्री नाही. पण काव्य श्रवणाची गोडी असणारी एक उत्तम श्रोता आहेच ना रे. संमेलन काय असतं हे माहीत नव्हतं तेव्हाची गोष्ट. त्यावेळी महाकाव्यसंमेलन भरलं होतं. गटागटाने कवी येत होते. निवांत. समोर एक कवी त्याची कविता गात होता. समोर हे गटाधिपती येऊन बसले. पुढच्या १५ मिनिटात या कवी गटाचं पाठोपाठ वाचन झालं. ते निघून गेले. आजही तसाच वागतोस तू. तुझी कविता वाचतोस. निघून जातोस.
तुला तू सर्वश्रेष्ठ आहेस असं वाटत असेल. दोन मिनिटाच्या कवितेसाठी दोन तीन तास कोण बसेल असंही वाटत असेल.पण मी बसते ना रे तुझं ऐकायला. आता तू असंही म्हणशील की, तुला कुणी सांगितलंय बसायला. आम्ही काही आग्रहाचं निमंत्रण नाही दिलंय.” खरंय, तू न बोलवताच मी तिथं येते. कारण मी श्रोता आहे. पण तू..तू तर हाडाचा कवी. हृदयानं लिहिणारा, मनानं गाणारा, तुझ्या मनासारखा मुक्त विहरणारा, व्यक्त होणारा..तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का ? असं कसं ?
असो.. आता मला यू ट्युब सारखा वेगळा मार्ग मिळाला आहे. तुला जर माझ्यासारख्या श्रोत्याची गरज नसेल. तर मी तरी कशाला संमेलनासाठी वेळ देऊ ? नाही का ? मी हा निर्णय कधीही घेऊ शकते. पण तुझ्या जातबंधूंचं काय ? त्यांना तरी तू कुठे वेळ देतोस. तू फक्त तुझी कविता वाचतोस. निघून जातोस. तुझा जातवाला पुढे तुझीच ‘री’ ओढतो. ‘तू माझं ऐकत नाही. मी तुझं ऐकत नाही.’ असं म्हणत उत्साहाने सुरू झालेलं संमेलन मृतावस्थेला पोहोचतं. म्हणजे मृत शरीराला कधी उचलतात याची वाट पाहणार्या नातेवाईकांप्रमाणे कधी एकदा शेवटचा कवी वाचन करतो आणि संमेलन संपतं याची वाट पाहत संमेलन अध्यक्ष, आयोजक आणि मी असे चार पाच जण उरतो. अलिकडं अध्यक्षांचा अपमान नको म्हणून त्याना मधेच कधीतरी बोलू दिलं जातं. मग उरतो मी एक श्रोता.
कविमित्रा, तू असा का वागतोस मला नाही कळत. पण तू तुझ्या जातभाईंसाठी तरी त्यांच्यासोबत राहवंस असं मात्र मला वाटतं. मला काय वाटतं यासाठी तू थोडाच बदलशील. कवितेच्या क्षेत्रातलं तुझं महत्त्व कमी होऊ नये म्हणून तू असाच पुढेही संमेलनात जात राहशील. कविता वाचशील. कुणाचं काहीही न ऐकता तसाच बाहेर पडशील. बदलणार काहीच नाही.
मी उत्तरं शोधण्याचा नाद सोडून दिला. जे आहे, जसं आहे तसं स्वीकारलं. शेवटी मला ऐकायचं असतं. मी ऐकते. बाकी कवी म्हणून तू काय करावं हा तुझा प्रश्न आहे. शेवटी तू कविता लिहावी. वाचावी. मी ऐकावी. फक्त ती कविता माझ्या हृदयापर्यंत पोहोचावी यासाठी तुला काही करता आलं तर एकच कर. तुझ्या जातभाईंच्या कवितेसाठी उत्तम श्रोता हो. बस्स इतकंच!!
एक श्रोता
पत्ता – काव्यसंग्रह, कोणतंही पान, मुखपृष्ठ,
कवीच्या फोटोसह मलपृष्ठ, किंमत- रू.००/-
फोन नं. – संग्रह आवडला तर मीच फोन करेन.
ता.क. – सुरुवातीपासून शेवटपर्यंत संमेलनात सहभागी कवीचा सन्मान करण्यात यावा. त्याना निमंत्रित कवी म्हणून पुढील संमेलनात आदरानं निमंत्रण द्यावं. तसंही हल्ली दर्जा विचारात घेतला जात नाही. गटबाजीत जो माहीर तो सुप्रसिद्ध कवी ठरतो. तो सगळीकडे असतोच. त्याला निमंत्रणाची गरज नाही.
अर्चना मुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.