March 29, 2024
In spirituality we have to recognize our own image
Home » अध्यात्मात आपणच आपली प्रतिमा ओळखायची असते
विश्वाचे आर्त

अध्यात्मात आपणच आपली प्रतिमा ओळखायची असते

आत्मज्ञान हे गुरूच्या मार्गदर्शनाखाली मिळवायचे असते. गुरूंच्या कृपेने याचा लाभ होतो. यातूनच भक्ती मार्गाचा उदय झाला. फक्त संशोधक, चिकित्सकवृत्तीने कार्य करणारा शिष्य असायला हवा. येथे आपणच आपली छाया ओळखायची असते. आपल्या छायेला आपण भ्यायचे नसते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

पैं आपणपेनि जालिया। छाया गा आपुलिया।
बिहोनि बिहालिया। आन आहे ।। १३३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, आपल्यापासूनच झालेल्या छायेला भ्यालें असता, ती छाया भ्यालेल्या पुरूषाहून काही वेगळी आहे काय ? तर नाही. म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपण केले आहे.

पुरातन मंदिराची रचना करताना त्यामध्ये प्रकाश पोहोचेल अशी व्यवस्था केली जायची. त्या काळात सूर्य, चंद्राच्या प्रकाशाव्यतिरिक्त तेलाच्या दिव्याचाच प्रकाश होता. मंदिरातील मूर्तीपर्यंत प्रकाश पोहोचेल, अशी रचना केली जायची. किरणोत्सार केव्हा होईल, तो केवढा असेल. संपूर्ण किरणोत्सार कधी असेल याचेही गणित मांडले जायचे. सतत केलेल्या संशोधनातूनच अशा रचनांचा जन्म झाला. छाया कधी कशी पडते यावरून सूर्याच्या उत्तरायण, दक्षिणायन याचा शोध लागला. या नोंदीतूनच दिनदर्शिकेचा उदय झाला. छायेच्या नोंदीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला.

चंद्रग्रहण, सूर्यग्रहण याचाही अभ्यास झाला. साधुसंतांनी आत्मज्ञानातून अनेक गूढ गुपिते शोधून काढली. आता अनेक गोष्टींचा उलगडा झाल्यानेच आत्मज्ञानाची गरज फारशी भासत नाही. चिकित्सक वृत्तीने झालेल्या संशोधनाचा वापर व्यवहारात होऊ लागला. संशोधनाला पुढे व्यापारी स्वरूप आले. आता तर संशोधन विकले जाते. यावर कोट्यवधी रुपयांची कमाई केली जाते. यातून पेटंट कायदा अस्तित्वात आला. संशोधनावर हक्क सांगण्यात येत आहेत. संशोधनाचा आता असा व्यापार होत आहे.

आत्मज्ञानाचा शोध घेणारा साधक हासुद्धा एक संशोधक आहे; पण येथे ते विकत मिळत नाही. त्याचे पेटंटही कोणी विकत देत नाही. त्याचा व्यापारही होत नाही. व्यापारी विचारसरणीमुळे आता आध्यात्मिक संशोधनाला फटका बसला आहे. अध्यात्म हा व्यापार नव्हे. आत्मज्ञान हे सर्वांसाठी आहे. सर्वांचा त्याच्यावर हक्क आहे. सर्वंचजण ते प्राप्त करू शकतात. संशोधनाच्या प्रसारासाठी शिक्षण संस्थांची निर्मिती झाली. तशी अध्यात्माच्या प्रसारासाठी मठ, मंदिरे अस्तित्वात आली. गुरू-शिष्य परंपरा उदयाला आली.

आत्मज्ञान हे गुरूच्या मार्गदर्शनाखाली मिळवायचे असते. गुरूंच्या कृपेने याचा लाभ होतो. यातूनच भक्ती मार्गाचा उदय झाला. फक्त संशोधक, चिकित्सकवृत्तीने कार्य करणारा शिष्य असायला हवा. येथे आपणच आपली छाया ओळखायची असते. आपल्या छायेला आपण भ्यायचे नसते. आपले खरे स्वरूप ओळखायचे असते. छाया वस्तूची पडते. देह ही एक वस्तू आहे. या वस्तूत आत्मा आल्याने त्याला चैतन्य प्राप्त झाले आहे. त्याच्यात जिवंतपणा आला आहे. तो नाही तर हा देह निर्जीव आहे. देह आणि देहाची सावली जशी वेगळी आहे. तसा आत्मा आणि देह हासुद्धा वेगळा आहे.

देहाची सावली पडते. आत्म्याला सावली नाही. आत्मा वस्तू नाही. त्याचा जन्मही होत नाही व मृत्यूही होत नाही. तो अमर आहे. देह नाशवंत आहे. अमर आत्म्याला जाणणे हेच आत्मज्ञान. या ज्ञानाची प्राप्ती गुरूकृपेने ज्याला होते तो आत्मज्ञानी होतो. ब्रह्मज्ञानी होतो.

Related posts

कृष्‍णात खोत हे  शेती समूहाचे चित्रण करणारे समर्थ कादंबरीकार – आसाराम लोमटे

वाचकाला अंतर्मुख अन् आनंदी करणाऱ्या कविता

संस्काराच्या कमाईवरच यशाची कमाई…

Leave a Comment