जीवनात चढ-उतार हे येतच असतात. प्रवासात कधी डोंगर आडवा येतो, तर कधी खोल दरी येते, पण प्रवास मध्येच सोडून देता येत नाही. अपेक्षित ठिकाण गाठण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात ही करावीच लागते. वादळ आले तर सुरक्षित जागा शोधावी लागते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा ।
पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ।।६८७।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहत जातो, त्याप्रमाणें मनोरथांच्या ओघाने त्याचे मन भटकत असतें, असे समज.
मनोरथ, संकल्प कशाचा करायचा, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. संकल्पाशिवाय प्रगती होत नाही. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. रात्रंदिवस झटतो. मन त्यातच गुंतते. कधी तरी तो पूर्ण होतो. कधी पूर्णही होत नाही; पण आपण पूर्ण होईल, या आशेने त्यामध्ये कार्यरत असतो. मनोरथ पूर्ण झाले नाही तरी मन समाधानी असावे. आशा सोडायची नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे समजून त्यामध्ये प्रयत्न करत राहायचे. वादळे ही होतच राहतात.
जीवनात चढ-उतार हे येतच असतात. प्रवासात कधी डोंगर आडवा येतो, तर कधी खोल दरी येते, पण प्रवास मध्येच सोडून देता येत नाही. अपेक्षित ठिकाण गाठण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात ही करावीच लागते. वादळ आले तर सुरक्षित जागा शोधावी लागते. यासाठी संकल्प करतात. योग्य ते नियोजनही आवश्यक आहे. म्हणजे येणाऱ्या अडचणींवर सहजपणे मात करता येईल. उद्दिष्ठ गाठता येईल. कामात नियोजनाचा अभाव असेल तर अपयश येण्याची शक्यता असते. यासाठी योग्य ती तयारी करणे आवश्यक आहे. नुसते प्रयत्न करून चालत नाहीत.
नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत राहिल्यास प्रगती होत राहते. निराशा येत नाही. काळजी, भीती वाटत नाही. दूरगामी विचार करून नियोजन करावे म्हणजे संकल्पात येणारे अडथळे कमी होतील. मनाचा दृढ संकल्प हा उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी ठरतो, हे विसरता कामा नये. लक्ष्य साधताना मनाची स्थिरता ही आवश्यक आहे. मन भरकटता कामा नये. पुरात पडलेला भोपळा प्रवाहात वाहत जातो तसे मन भरकटते, पण ते संकल्पावर स्थिर करणे आवश्यक आहे. आलेल्या अडथळ्यांवर मात करीत पुढे चालत राहावे. नियोजनबद्ध कार्यक्रम कधीही अपयशी ठरत नाही.
साधना करताना अनेक अडचणी येतात. पण म्हणून साधना सोडायची नसते. साधनेतील अपेक्षीत साध्य करणे हा मनोरथ केला जातो. तसा संकल्प केला जातो. पण हा संकल्प सिद्धीस जाईल की नाही याची काळजी करायची नाही. फक्त कष्ट करत राहायचे. साधना करत राहायची. एक-ना-एक दिवस जरूर आपला मनोरथ पूर्ण होईल या आशेने कष्ट करत राहायचे. आत्मज्ञानाची तडफडच योग्य वाट दाखवते. साधनेच्या प्रवाहात वाहून गेलो तरच आत्मज्ञानाचा मनोरथ पूर्ण होऊ शकेल ही आशा ठेवायला हवी. फक्त चांगल्या गोष्टीत वाहून जावे. वाईट गोष्टीत वाहून गेल्यास वाईटच हाती लागणार हे लक्षात ठेवायला हवे.