May 22, 2024
Dr Yashawant Thorat Speech on Book Navi vat Nave Kshitij
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ स्पर्धा परीक्षा, शिक्षण

डॉ. यशवंतराव थोरात यांचे लेखन व्यापक मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठ

कोल्हापूर : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा विचारवंत डॉ. यशवंत थोरात यांचे लेखन हा व्यापक मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठ आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या ग्रंथचर्चेमध्ये उमटला.

डॉ. थोरात यांच्या ‘काही वाटा, काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितीज’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या दोन्ही पुस्तकांच्या अनुषंगाने विशेष ग्रंथचर्चा कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर सभागृहात आयोजन करण्यात आले. राजाराम महाविद्यालयाचे डॉ. रघुनाथ कडाकणे आणि डॉ. रणधीर शिंदे हे प्रमुख वक्ते होते, तर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास डॉ. यशवंतराव थोरात, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. उषा थोरात व प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. यशवंतराव थोरात म्हणाले, मी सुरवातीपासूनच माझ्या कुठल्याही लेखात उपदेश न देण्याचा निर्धार केला. मध्यममार्ग मला प्रिय आहे. टोकाची भूमिका घेणे मला योग्य वाटत नाही. सत्याचे सर्व पैलू चिकित्सापूर्वक लक्षात घेऊन लेखन करण्याकडे माझा कल असतो. सत्याच्या पावित्र्यावर माझा सदैव विश्वास आहे. आपल्या देशातील विविधता ही आपली ताकद आहे, पण आपापसातली भेदभावाची भावना आपल्याला दूर लोटायला हवी. आपल्या भारतीयत्वाचा विसर आपण कधीही पडू देता कामा नये. आपले हृदय आभाळाएवढे विशाल करा, विवेकी व्हा, विचार करा आणि देशाच्या प्रगतीची दिशा निश्चित करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, मराठी साहित्यामध्ये स्वकेंद्री, मध्यमवर्गी अनुभवकथनात ललितलेखन गुरफटलेले आहे. या पार्श्वभूमीवर मराठी ललितलेखनाच्या क्षेत्रात डॉ. थोरात यांचे मुक्त, वैश्विक वाचनानुभव देणारे लेखन वेगळे ठरते. त्यांचा अनुभवसंचय दांडगा आणि मांडण्याची शैली ही त्यांच्या लेखनाला वेगळे वैशिष्ट्य प्रदान करते. त्यांचा अनुभव व सादरीकरणाच्या कक्षा या अत्यंत विस्तृत स्वरुपाच्या आहेत. स्वतःकडे न्यूनत्व घेऊन बहुकेंद्री व समाजकेंद्री लेखनाकडे त्यांचा कल आहे. व्यापक सामाजिक बांधिलकी, जगण्याविषयीची शहाणीव, सामाजिक-आर्थिक विषमता निर्मूलनासाठी आग्रह, नैतिकता व बुद्धिमत्ता यांचा आपसमेळ आणि मानव व समतेची पूजा म्हणजेच धर्म याची जाणीवपेरणी करीत माणूसपणाचे अधोरेखन डॉ. थोरात त्यांच्या लेखनातून करतात. संविधानाप्रती अविचल निष्ठा आणि मानवतेविषयीचे चिंतन त्यांच्या लेखनातून अखंड पाझरते. त्यांच्या ठाम व भक्कम इतिहासदृष्टीचे प्रत्यंतर त्यातून येते.

डॉ. थोरात हे आपल्यातील सुप्त अनुवादकाचे जन्मदाते असल्याचे सांगून डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले, भारताचे संविधान ज्या व्यक्तीला गोष्टीरुपात वाचावयाचे असेल, त्याने डॉ. थोरात यांची पुस्तके वाचावीत. डॉ. यशवंत थोरात म्हणजे अखंड अस्वस्थता आहे. अविश्रांत अभ्यासातून त्यांनी त्यांचे व्यासंगी व्यक्तीमत्त्व घडविले आहे. वडिलांच्या निष्ठूर प्रेमाने त्यांना घडविले. त्यांच्या समग्र व्यासंगाचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. अर्थशास्त्रासह, नीतीशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, ऊर्दू कविता, काव्यशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास अशा अनेकविध विषयांचा त्यांचा व्यासंग स्तिमित करणारा आहे. आपल्या अवघडातील अवघड इंग्रजीचा सोप्यात सोप्या मराठीत अनुवाद व्हावा, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्या अर्थाने ते ‘शब्दांचे उत्तम कारागीर’ आहेत. त्यांच्या या कौशल्याचे प्रत्यंतर ललित लेखनातून येते.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, आपल्या प्रचंड अनुभव संचिताची मांडणी सहज संवादी भाषेत कशी करावयाची, हे डॉ. थोरात यांच्या लेखनातून समजते. अनेक दुर्मिळ संदर्भ त्यांच्या लेखांमध्ये आढळतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाला साहित्यमूल्याबरोबरच संदर्भमूल्यही प्राप्त आहे. आपल्या प्रत्येक लेखाच्या शेवटी ते वाचकाला विचारप्रवृत्त करतात, हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य आहे.

सुरवातीला मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुखदेव एकल यांनी आभार मानले.

उपक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अरुण कोलटकर लिखित ‘भिजकी वही’ या कवितासंग्रहाचे नाट्यात्म सादरीकरण जळगाव येथील परिवर्तन चमूतर्फे करण्यात आले. यामध्ये शंभु पाटील, सोनाली पाटील, हर्षदा कोलटकर, राहुल निंबाळकर, हर्षल पाटील, मंगेश कुलकर्णी, जयश्री पाटील, सुदिप्ता सरकार, मंजुषा भिडे, अंजली पाटील, सुनीला भोलाने आदी कलाकारांचा समावेश होता.

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात ग्रंथदिंडी उत्साहात

मराठी अधिविभाग तसेच डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज सकाळी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठ परिसरामध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी काढली. त्यांना हुपरीच्या अनुभवी वारकऱ्यांची साथसंगत लाभली. त्यामुळे दिंडीमध्ये अधिकच रंगत आली. दिंडीतील पालखीमध्ये श्री ज्ञानेश्वरीसह तुकारामबोवांची गाथा, नामदेवांची गाथा यांसह भारतीय संविधान ठेवण्यात आले होते. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीस सुरवात झाली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे दिंडी वि.स. खांडेकर भाषा भवन येथे आल्यानंतर विसर्जन करण्यात आले.

Related posts

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

Saloni Arts : असे रेखाटा चमच्याचे थ्रीडी चित्र

ग्रामगीतेतील आदर्श गाव

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406