February 15, 2025
Clean Mind with removing unwanted subject from mind article by rajendra ghorpade
Home » मनानेंच मागे हटवा मनातील विषय
विश्वाचे आर्त

मनानेंच मागे हटवा मनातील विषय

मनाने सर्व क्रियावर मात करता यायला हवी. सर्व विचारांपासून दूर नेण्याची मनाची ही क्रिया समजून घ्यायला हवी. विषयांपासून मन दूर कसे नेता येईल यावर अभ्यास करायला हवा. यासाठी मन साधनेत गुंतवायला, साधनेत मन रमवायला शिकले पाहीजे. मन साधनेत रमले की मग मन इतरत्र भटकत नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगे ।
ते देहीं देहाजोगे । होतीचि ना ।। ५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा

ओवीचा अर्थ – ते विचार शुर पुरुष आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेंच मागे हटवून, अंगाने विश्रांती झाल्यावर ( स्वतः ब्रह्मरुप झाल्यावर ) जरी देहात असतात तरी पण ते देहाजोगे होत नाहीत ( देहां एवढेच आपल्याला समजत नाहीत )

साधनेने ब्रह्म रूपाची अनुभूती येते, पण साधना करण्यासाठी निवांत जागा आता आहे कोठे?. सध्या तर सर्वत्र प्रदूषणच प्रदूषण पाहायला मिळते. हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण हे प्रदूषणाचे सर्व प्रकार आपल्या साधनेत व्यत्यय ठरतात. शहरात निवांतपणा राहीलेला नाही. ध्वनी प्रदुषण इतके वाढले आहे की साधनेला बसल्यानंतर हे आवाज स्पष्ट ऐकू येतात अन् त्या आवाजाचा व्यत्यय साधनेत येतो.

सर्वत्र प्रदूषण असल्याने साधनेमध्ये अनेक व्यत्यय, अडथळे अनुभवायला मिळतात. शहरात निवांतपणा नाही प्रदुषण आहे म्हणून खेडेगावात जावे किंवा जंगलात हवेशीर वातावरणात साधनेसाठी जावे असे वाटते. जंगलातील एखाद्या मंदिरात निवांतपणे साधना करावी असे वाटते, पण तेथेही प्रदूषण आहेच. ध्वनी प्रदूषण नाही असे वाटते पण तेथेही आवाजामुळे साधनेत व्यत्यय येतोच. फक्त साधने वेगळी आहेत. येथे पक्ष्यांचे मधूर आवाज साधनेत व्यत्यय आणतात. तर पाण्याचा खळखळाट साधनेला अडथळा ठरू शकतो. मुळात या मंजूळ आवाजात साधना उत्तम व्हायला हवी. पण बऱ्याचदा तसे होत नाही. कारण साधना मनात असायला हवी. तरच आपण साधना उत्तम प्रकारे होऊ शकते.

कोठेही गेला तरी ध्वनीचा व्यत्यय हा साधनेत होतोच. मग हा ध्वनीच आपण मनाने दूर केला तर काय होईल ? मनातूनच हे ध्वनी प्रदूषण दूर करायला हवे. म्हणजे आपण निश्चितच यावर मात करू. मनाने आपण सर्व व्यत्यय दूर करू शकतो. व्यत्यय कोणत्याही आवाजाचा असो मनाने तो आवाज ऐकलाच नाही, तर साधनेत व्यत्यय येण्याचा संभव येतच नाही. यासाठी मनाने साधना करायला शिकले पाहिजे. मनातील विचार प्रवृत्ती बदलून विषयांकडील ओढा कमी करून मन साधनेवर केंद्रित करायला हवे.

साधना करण्यासाठी निवांत जागा आता नव्हे तर पूर्वीही नव्हत्या. हिमालयात गेला तरी तेथेही पाण्याचा खळखळाट, वाऱ्याचा आवाज, झाडाच्या पानांचा आवाज व्यत्यय करतोच. त्यासाठी मन आवाजापासून दूर न्यायला हवे. आवाज होतच राहतात फक्त मन त्यावर केंद्रित न करता साधनेतील स्वरावर केंद्रित करायला हवे. सोहमच्या स्वरावर आपले मन केंद्रित व्हायला हवे. मनात एकदा सोहमचा स्वर उमटला, तर तो स्वर आपोआपच आपल्या अंगात संचारतो. यातून अंगामध्ये एक निवांतपणा येतो. यासाठी मनाची प्रवृत्ती ही खूप गरजेची आहे.

मनाने सर्व क्रियावर मात करता यायला हवी. सर्व विचारांपासून दूर नेण्याची मनाची ही क्रिया समजून घ्यायला हवी. विषयांपासून मन दूर कसे नेता येईल यावर अभ्यास करायला हवा. यासाठी मन साधनेत गुंतवायला, साधनेत मन रमवायला शिकले पाहीजे. मन साधनेत रमले की मग मन इतरत्र भटकत नाही. तेव्हा इतरत्र होणारे आवाज त्या मनाला विचलित करत नाहीत. यासाठी सर्व क्रिया ही मनात साठवायला हवी. मनाने मनापासून सर्व बदल घडवायला हवेत.

प्रदूषणाचे विविध प्रकार आपल्या शरीरावर, देहावर परिणाम करतात. त्याचा परिणाम मनावर होता कामा नये. त्यापासून मनाला दूर ठेवता आले तरच आपण साधनेत यशस्वी होऊ. तरच आपण ब्रह्मसंपन्न होऊ. देह आणि आत्मा हे दोन्ही वेगळे आहेत याची अनुभूती नित्य असल्याने देहातील घटनांचा परिणाम साधनेवर होत नाही. आपण त्यापासून दूर राहतो. यामुळेच मनातूनच आजार बाहेर काढायला हवेत तरच तो आजार देहातून सुद्धा आपोआपच बाहेर पडेल. मनाने दृढनिश्चय केल्यास हे शक्य होऊ शकते. यासाठी मन कणखर बनवायला हवे. साधना मनात साठवायला हवी, साधनेत मन रमवायला हवे मनाला साधनेची गोडी लावायला हवी. तरच आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading