April 30, 2024
Air Pollution article by Vilas Shinde
Home » हवेचे प्रदूषण गांभिर्याने घेण्याचा विषय
विशेष संपादकीय

हवेचे प्रदूषण गांभिर्याने घेण्याचा विषय

एकूणच काय जागतिक पातळीवर हवा प्रदूषणात महासत्ता बनल्याच्या अविर्भावात मिरवणाऱ्या चीनने आघाडी घेतली आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक राष्ट्राला, राष्ट्रातील बहुतांश नागरिकांना स्वार्थाने पछाडलेले आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

अन्न, पाणी आणि हवा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा भागवण्यासाठी निसर्गच मदतीला येतो. मात्र निसर्गाकडून हे घटक घेताना आपण निसर्गाला परत काय देतो, याचा विचार करण्याची गरज आहे. भारतातच नव्हे तर, जगातील बहुतांश देशांना या तिनही घटकांच्या पुरेशा आणि चांगल्या उपलब्धतेच्या चिंतेने ग्रासले आहे. हवा दिसत नाही, मात्र ती जाणवते. हवा आणि त्यातही हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असेल; तर, गुदमरते. सर्वसामान्य मानवाला हवेचा दर्जा पाहून ठरवता येत नाही. त्याचा थेट अनुभवच मिळतो. त्यामुळेच हवेचे प्रदूषण हा गांभिर्याने घेण्याचा विषय आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही.

दरवर्षी पावसाळा संपला की भारतात हवेच्या दर्जाबाबत चर्चा सुरू होते. खरीपाची पिके निघालेली असतात. शेतातील हिरवाई कमी झालेली असते. गवत वाळते किंवा त्याचाही हिरवा रंग गेलेला असतो. दरवर्षी हमखास नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत हवेचा दर्जा घसरतो. याबाबत ओरड व्हायची. हळूहळू इतर शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. जगभरातील विविध शहरात हवा प्रदूषणांने चांगलाच विळखा घालायला सुरुवात केली आहे. त्यातच इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लयामेट चेंजचे अहवाल धक्कादायक धोक्याचे इशारे देत आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय आला.

भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर असलेल्या मानकांनुसार हवेचा दर्जा गुणांक (एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात एक्यूआय) आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम पाहिले की याचे गांभीर्य लक्षात येते. हा गुणांक ० ते ५० असेल तर ती हवा चांगली असते. अशा हवेचे मानवी शरीरावर कमीत कमी अनिष्ट परिणाम होतात किंवा होत नाहीत. ५१ ते १०० पर्यंत गुणांक असल्यास हवा समाधानकारक मानली जाते. अशा हवेत श्वसनाचे किरकोळ त्रास उद्भवू शकतात. विशेषत: दम्याच्या रूग्णांना उंचीवरील मजल्यावर राहावे लागत असल्यास ते जाणवतात. हवेचा गुणांक १०१ ते २०० असल्यास, ती हवा मध्यम दर्जाची मानतात. अशा हवेत श्वसन, दमा, हृदयरोग रूग्णांना, श्वसन सुरळीत न होऊन अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. हाच गुणांक २०१ ते ३०० च्या दरम्यान असल्यास हवा खराब दर्जाची मानली जाते. या हवेमध्ये जास्त काळ राहिल्यास निरोगी माणसालाही श्वसनाचा त्रास सुरू होतो. ३०१ ते ४०० गुणांक असणारी हवा आणखी खराब मानली जाते. अशा हवेमध्ये श्वसनाचे दीर्घकालिक त्रास उद्भवण्याची शक्यता असते. ४०१ ते ५०० गुणांक असणारी हवा अतिशय खराब असते. या हवेमध्ये निरोगी माणसे आजारी पडतात आणि आजारग्रस्त लोकांचा मृत्यू संभवतो. तर त्यापेक्षा जास्त गुणांक असल्यास ती हवा मानवी वस्तीसाठी अयोग्य मानली जाते.

जगातील शहरांचा विचार केला तर हा लेख लिहित असताना चीनमधील शेन्मू गावातील गुणांक सर्वाधिक ७३० आहे. त्याबरोबर इतर चार शहरे फुयांग, बातोव, युलिन्शी व शुओझोव आहेत. या सर्व शहरांचा गुणांक ६०० पेक्षा जास्त आहे. त्यानंतर भारतातील दिल्लीजवळच्या रतलमचा क्रमांक लागतो. या शहरातील हवेचा गुणांक हा ५६३ आहे. ४०० पेक्षा जास्त गुणांक असणारी जगात एकूण चौदा गावे किंवा शहरे आहेत त्यातील तीन भारतातील आणि ११ चीनमधील आहेत. तीनशे ते चारशेच्या टप्प्यात हवेचा गुणांक असलेली २१ शहरे आहेत. त्यातील १३ शहरे चीनमधील आहेत. इतर शहरात फ्रांसमधील कॅमबेरी, थायलंडमधील नान व बन-मयी-खा-तायी, लाओसमधील झयांगबोली, पक्षान, लाउंगफान आणि झांग्जीकाउ, मंगोलियातील झुनहारा या शहरांचा समावेश होतो.

एकूणच काय जागतिक पातळीवर हवा प्रदूषणात महासत्ता बनल्याच्या अविर्भावात मिरवणाऱ्या चीनने आघाडी घेतली आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक राष्ट्राला, राष्ट्रातील बहुतांश नागरिकांना स्वार्थाने पछाडलेले आहे. प्रत्येक राष्ट्र दरडोई सकल उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांचे आज दरडोई उत्पन्न चांगले आहे ते आणखी जास्त करण्याच्या म्हणजेच श्रीमंत होण्याच्या मागे धावत आहेत. ते दरडोई उत्पन्न किती करायचे, माहीत नाही. कारण जास्त हा शब्द सापेक्ष असतो. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादन जास्त करायला हवे. उत्पादन वाढवायचे तर जास्त ऊर्जा मिळवायला हवी. ऊर्जा जास्त मिळवण्यासाठी संसाधने हवीत. त्यातही उत्पादनापासून जास्त नफा हवा असेल, तर खर्च कमी करायला हवा आणि खर्च कमी करायचा तर कमी खर्चाचे इंधन वापरून, पुरेशी ऊर्जा मिळायला हवी. म्हणूनच राष्ट्राच्या प्रगतीचा मापदंड म्हणून दरडोई ऊर्जेचा वापर पाहिला जातो.

ऊर्जा कमी खर्चात मिळवण्यासाठी लाकूड, दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यासाठी जंगलांची कत्तल होते. दगडी कोळसा, खनिज तेल आणि वायूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येतो. यांच्या ज्वलनातून ऊर्जा मिळवतात. वाहने, कारखाने ते घरगुती वापर सर्वत्र यांच्या ज्वलनातून ऊर्जा मिळवली जाते. या संसाधनांना ऊर्जा मिळवण्यासाठी जाळत असताना हवेत पूर्ण ज्वलन झाल्यास कार्बन डायऑक्साईड जातो. खनिज तेल आणि दगडी कोळशामध्ये इतरही घटक असतात. सल्फरसारख्या पदार्थांचे अर्धवट ज्वलन होते आणि सल्फर डायऑक्साईडसारखे वायुही वातावरणात मिसळतात. दगडी कोळशामध्ये पारा, शिसे, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्सईड, जड धातू आणि इतरही घटक असतात. ते सर्व वातावरणात मिसळतात.

खनिज तेलातून अनेक घटक काढून टाकण्याची प्रक्रिया करण्यात येते. त्याहीपेक्षा नैसर्ग‍िक वायू आणखी कमी प्रदूषके वातावरणात सोडतो. मात्र मूळ कार्बन डायऑक्साईड प्रत्येक इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडतोच. कारखान्यांच्या संख्येतील वाढ, घरगुती ऊर्जा वापरातील वाढ आणि वाहनांच्या संख्येतील वाढ यामुळे इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण भयानक वेगाने वाढत आहे. सर्व प्राण्यांच्या श्वसनातून कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत जाते. वातावरणात मिसळणाऱ्या या प्रदूषकांमुळे ऑक्सिजनचे प्रमाण घटते. यामुळे हवा श्वसनास अयोग्य बनते. शेतकरीदेखील शेतातील पिकांचा वापरायोग्य नसलेला भाग उचलून त्याचे खत न बनवता थेट शेतातच जाळतात. काही प्रमाणात हवा प्रदूषणास हा घटकही कारणीभूत ठरते.

निसर्ग, निसर्गातील हिरव्या वनस्पती कार्बन डायऑक्साईडचे परत ऑक्सिजनमध्ये रूपांतर करतात. या झाडांची संख्या घटवून आपण जणूकाही निसर्गाला घातक रिटर्न गिफ्ट देत आहोत. यातून पर्यावरणाचे नाही तर मानवाचे आणि समस्त जीवसृष्टीचे नुकसान करत आहोत. म्हणून ऊर्जेचा वापर कमीत कमी करायला हवा!

Related posts

ईस्राईल अभ्यास दौरा केल्यानंतर…

बिघडलेला बाजार

अश्वगंधा (ओळख औषधी वनस्पतींची )

Leave a Comment