विद्यार्थी दशेमध्ये पाहिलेल्या दुष्काळाने स्वामीनाथन यांना भूकबळीच्या समस्येतून देशाला बाहेर काढण्याचे स्वप्न दिले. त्यासाठी सहज प्राप्त झालेली मोठी मानसन्मानाची प्रशासनातील नोकरी सोडली. त्यांनी संपूर्ण आयुष्य कृषी संशोधनासाठी दिले. अन्नधान्याचे उत्पादन इतके वाढवले की दोन वर्ष अन्नधान्याचे उत्पादन नाही झाले तरी, कोणी उपाशी राहणार नाही, इतकी कृषी क्षेत्रात प्रगती घडवून आणली.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या विचाराने प्रभावित झालेले, स्वदेशीचा कट्टर पुरस्कार आणि परदेशी साहित्याची होळी करणारे एक डॉक्टर कुंभकोणम या तामिळनाडूतील शहरात कार्यरत होते. त्यांचे स्वत:चे मोठे हॉस्पिटल होते. हे डॉक्टर म्हणजे एम. के सांबासीवन. ते प्रख्यात सर्जन होते. कुंभकोणम येथील जहागीरदार घराण्याचा वारसा चालवत होते. मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले होते. त्यांच्या द्वितीय पुत्राच्या रुपाने जन्माला आलेले अपत्य म्हणजेच मनकोंबू सांबासीवन स्वामीनाथन अर्थात भारतीय हरित का्रंतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन !
डॉ. स्वामीनाथन यांचे शालेय शिक्षण सुरू असताना १९३६ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र ‘जगात अशक्य काहीही नसते, ते आपल्या मनात असते. मनापासून केलेल्या योग्य प्रयत्नातून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात’, हे वाक्य स्वामीनाथन यांनी आपल्या वडिलांकडून शिकून घेतले होते. वडिलांचा दवाखाना चालवण्यासाठी मुलाने डॉक्टरच व्हावे, असा स्वामीनाथन यांच्या आई पार्वतींचा आग्रह होता. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी १५व्या वर्षी महाराजा महाविद्यालय, त्रिवेंद्रम येथे प्रवेश घेतला. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावयाचे हे ठरवून बी.एस्सी. पदवी प्राणीशास्त्र विषयातून पूर्ण केली.
याच कालावधीत बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली. या भीषण दुष्काळात तीन लाखापेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. या घटनांनी स्वामीनाथन यांनी डॉक्टर व्हायचा निर्णय बदलला. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. देशसेवाच करायची तर, भविष्यातील भूकबळी टाळण्यासाठी कृषी संशोधन करून अन्नधान्याचे मुबलक उत्पादन वाढवण्याचा त्यांनी निर्धार केला. पुढे त्यांनी तामिळनाडू कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि कृषी क्षेत्रातील पदवी घेतली. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या बिहारमधील पुसा केंद्रामध्ये आले.
पुसा येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रशासकीय प्रमुख स्वामीनाथन यांच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी स्वामीनाथन यांना कृषी क्षेत्रात राहण्याऐवजी भारतीय प्रशासकीय सेवेत यावे, असा आग्रह धरला. त्यांनीच स्वामीनाथन यांचा अर्ज भरला आणि स्वामीनाथन यांना परीक्षा देण्यास सांगितले. केवळ महिनाभर अभ्यास करण्यास वेळ मिळाला. त्यांनी मनापासून अभ्यास करून परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांची भारतीय पोलिस दलामध्ये निवड झाली. मात्र त्यांच्या मनात कृषी क्षेत्रात संशोधन करायचे निश्चित होते. त्याचवेळी त्यांना युनेस्कोची हॉलंडमध्ये संशोधनासाठी अध्ययनवृत्ती मिळाली. स्वामीनाथन यांनी माउंट अबू येथे प्रशिक्षणासाठी जाण्याऐवजी हॉलंडला कृषी संशोधनासाठी जाणे पसंत केले.
हॉलंडमध्ये त्यांनी बटाट्यावर वर्षभर संशोधन केले. मात्र हॉलंडमध्ये पीएच.डी.ची प्रक्रिया फारच क्लिष्ट होती. त्यामुळे त्यांनी हॉलंडऐवजी, इंग्लंडमध्ये जाऊन संशोधन करायचे ठरवले. केंब्रिज येथे बटाट्याचे असंख्य वाण होते. बटाट्यांच्या जनुकांचा अभ्यास करण्यास मोठा वाव मिळाला. हॉलंड येथीलच संशोधन त्यांनी पुढे सुरू ठेवले व बटाट्यांच्या नव्या वाणांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोनच वर्षात त्यांनी पीएच.डी.साठी आवश्यक संशोधन पूर्ण केले. १९५२ मध्ये पीएच.डी पूर्ण होताच त्यांना विस्कोन्सीन विद्यापीठामध्ये रिसर्च असोसिएट पदावर नोकरी देण्यात आली. त्यांचे संशोधन एवढे उच्च दर्जाचे होते की, नियमाला अपवाद करून त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली होती. मात्र मूळ उद्देश न विसरलेल्या स्वामीनाथन यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
त्या काळातही विदेशातून येणाऱ्या संशोधकांना केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे अर्ज करून नियुक्तीची वाट पहावी लागत असे. या प्रतिक्षा कालावधीत विस्कोन्सीन विद्यापीठाने पुन्हा स्वामीनाथन यांना इंग्लंडला बोलावले. मात्र त्यांचा भारतातच संशोधन करण्याचा निर्धार कायम होता. लवकरच त्यांना कटक येथील भात संशोधन केंद्रात हंगामी नियुक्ती मिळाली. दोन वर्षातच त्यांना गव्हावर संशोधन करण्यासाठी कायमस्वरूपी पुसा येथील केंद्रात नेमण्यात आले. भातावरील संशोधन थांबवून त्यांनी गव्हावर संशोधन सुरू केले. भातावरील संशोधनातून त्यांनी एडिटी-२७ आणि म्हसूरी यासारखे लोकप्रिय वाण तयार केले होते.
त्या काळी साधारण प्रतीहेक्टर ८०० किलोग्रॅम गव्हाचे उत्पादन निघत असे. गव्हामध्ये जनुकीय बदल करून नवे वाण तयार केले नाहीत तर, उत्पादन असेच कमी राहणार होते. त्याच काळात ‘अमेरिकन जर्नल ऑफ ॲग्रोनॉमी’मध्ये जपानमधील संशोधक डॉ. वोगेल यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. स्वामीनाथन यांच्या मनातही याबाबत विचार सुरू झाले. वोगेल यांनी जपानमधील वाणांचे हिवाळी गव्हाबरोबर संकर घडवून गेन्स नावाचा बुटका वाण तयार केला. स्वामीनाथन यांनी वोगेल यांच्याकडे नव्या वाणांची मागणी केली. वोगेल यांनी जपानमधील वाणांपेक्षा नॉर्मन बोरलॉग यांच्या मेक्सिकोमधील वाणांचा संकर भारतात घडवावा, असे सूचवले. भारतीय हवामानासाठी ते अधिक योग्य् होते.
स्वामीनाथन यांनी बोरलॉग यांना बियाणे पाठवण्यासंदर्भात पत्र पाठवले. बोरलॉग यांनी बियाणे तर पाठवलेच, पण या पिकांची भारतीय उपखंडात कशी वाढ होते, हे स्वत: पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पुसा येथील केंद्राचे संचालक बी.पी. पाल यांच्यामार्फत बोरलॉग यांना परवानगी देण्यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयास पत्र पाठवले. मात्र सरकारी बाबूनी यामध्ये खोडा घातला. स्वामीनाथन यांनी वैयक्तीक लक्ष घालून बोरलॉग यांना भारतात येण्यासाठी परवानगी मिळवली. १९६२ मध्ये अखेर भारतातून अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले. स्वामीनाथन यांचा सर्व खर्च रॉकफेलर इन्स्टिट्युटने केला. मार्च १९६३ पासून स्वामीनाथन आणि बोरलॉग यांनी संयुक्तपणे हे प्रयोग केले. अन्नटंचाईने ग्रस्त अनेक देश या प्रयोगांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असताना भारतातील स्वामीनाथन यांचे सुरू असलेले प्रामाणीक प्रयत्न पाहून बोरलॉग भारावून गेले होते. त्यांनी स्वामीनाथन यांना सर्वतोपरी सहकार्य दिले.
स्वामीनाथन यांनी गव्हाचे संकरीत वाण तयार केले. नवे गव्हाचे वाण उंचीने बुटके होते. मात्र या वाणच्या ओंब्या खूपच लांब होत्या. या वाणांमुळे उत्पादनात भरीव वाढ अपेक्षीत होती. या पिकावर दिल्ली, लुधियाना, पुसा, पंतनगर आणि कानूपर केंद्रात सतत पाच वर्ष प्रयोग करण्यात आले. त्यामूळे १९६८ पर्यंत भरीव उत्पादन वाढ अपेक्षीत होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वंयपूर्ण बनवायचा होता. त्यांनाही बंगालच्या दुष्काळाची पुनरावृत्ती नको होती. त्यांनी स्वामीनाथन यांच्या प्रयोगांना विशेष सहकार्य दिले. परिणामी या वाणांचा प्रसार मोठ्या प्रमाणात शासकीय पातळीवरूनही झाला. परिणामी गव्हाचे उत्पादन १५ ते १६ पटीने वाढले. भारतातील धान्य कोठारात गहू शिल्लक राहू लागला. त्यामुळेच स्वामीनाथन यांची ‘भारतीय हरित क्रांतीचे जनक’ अशी ओळख निर्माण झाली.
त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून भारत सरकारने त्यांना तीनही पद्म पुरस्कारांनी सन्मानीत केले. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९७१), अल्बर्ट आईनस्टाईन ॲवॉर्ड फॉर सायन्स (१९८६), हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कृषी क्षेत्रातील कार्यासाठी नोबेल पुरस्कार देण्यात येत नाही. मात्र नॉर्मन बोरलॉग यांना शांततेचे नोबेल प्रदान करण्यात आले. त्या पैशातून त्यांनी अन्नधान्याच्या क्षेत्रात नोबेल मानले जाणारे वर्ल्ड फूड प्राईज सुरू केले. नॉर्मन बोरलॉग यांनी पहिला पुरस्कार स्वामीनाथन यांना प्रदान जाहीर केला. स्वामीनाथन यांनीही पुरस्कारांच्या रक्कमातून ‘एम.एस्. स्वामीनाथन फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. ते राज्यसभेचे सदस्य होते. चेन्नई येथील युनेस्कोच्या इकोटेक्नॉलॉजी सेंटरसाठीही ते कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांना सत्तरपेक्षा जास्त विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. त्यांनी शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य हमीभाव देण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
अशा थोर कृषी संशोधकांने वयाच्या अठ्ठ्याणवव्या वर्षी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिनांक २८ सप्टेबर २०२३ रोजी अखेरचा श्वास घेतला. विद्यार्थी दशेमध्ये पाहिलेल्या दुष्काळाने स्वामीनाथन यांना भूकबळीच्या समस्येतून देशाला बाहेर काढण्याचे स्वप्न दिले. त्यासाठी सहज प्राप्त झालेली मोठी मानसन्मानाची प्रशासनातील नोकरी सोडली. त्यांनी संपूर्ण आयुष्य कृषी संशोधनासाठी दिले. अन्नधान्याचे उत्पादन इतके वाढवले की दोन वर्ष अन्नधान्याचे उत्पादन नाही झाले तरी, कोणी उपाशी राहणार नाही, इतकी कृषी क्षेत्रात प्रगती घडवून आणली. त्यांचे ऋण भारतियांना कधीही फेडता येणार नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.