नकारात्मक विचारांनी आपल्यातील कमकुवतपणा जगासमोर येतो. तसा कमकुवतपणाचा विस्तार होतो. त्यामुळे विचाराचेही खच्चीकरण होते. यासाठी सकारात्मक विचाराची कास धरायला हवी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजासीं जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मिळवीन ।। १४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा
ओवीचा अर्थ – माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे हे खरे परंतु लीलेने अमृतालाही प्रतिज्ञापुर्वक जिंकील, अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन.
मराठी भाषा फार काळ टिकणार नाही. आता तिला उतरती कळा लागली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासात इंग्रजी आणि इतर पाश्चात्य भाषांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या वाढत्या आक्रमणामुळे मराठी माणूसच मराठीपासून दूर गेला आहे. अशाने या भाषेचे भवितव्य कसे टिकेल. अशी भीती सध्या व्यक्त होत आहे. पण भाषेचा विस्तार हा त्यामध्ये निर्माण झालेल्या साहित्यकृतीवर अवलंबून असतो. त्या भाषेत चांगले, लोकोपयोगी, ज्ञानभांडार संपन्न साहित्य वारंवार येत राहिल्यास त्या भाषेचा विस्तार हा निश्चितच होत राहतो.
इंग्रजीचा विस्तार हा तंत्रज्ञानाच्या विकासाने झाला आहे. तसे साहित्य त्या भाषेत आल्याने ज्ञान विस्तारासाठी ती भाषा विकसित झाली. मराठीमध्ये तसे झाले नाही. मुळात आपल्याकडे असणारे ज्ञान मुळी इतरांना वाटलेच नाही. मग आपल्या भाषेचा विस्तार होणार तरी कसा ? यासाठी तसे साहित्य या भाषेत यायला हवे. भाषेचे सौंदर्य हे त्यामध्ये निर्माण झालेल्या सुंदर साहित्यावर अवलंबून आहे. अजरामर असे साहित्य मराठी भाषेत निर्माण झाले आहे. त्यामुळे मराठी भाषा ही अमर आहे. या साहित्यासाठी मराठीचा विस्तार हा होतच राहणार. पण अजरामर साहित्यामध्ये विकास केला नाही तर मग मात्र ते साहित्य तसेच पडून राहील. बदलत्या काळानुसार त्यामध्ये योग्य तो विकास करायला हवा.
विविध तंत्रज्ञानाचे प्रकार यामध्ये यायला हवेत. ई बुक, मोबाईल बुक असा प्रकार मराठीमध्येही उपयोगात यायला हवा. उलट मराठी भाषा आता इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे. तिचा विकास होत आहे. यासाठी सुंदर साहित्य निर्मितीने तिचे अमरत्व शाश्वत होत आहे. हा विश्वास जागृत ठेवायला हवा व तसा सकारात्मक विचार विकसित करायला हवा. नकारात्मक विचारांनी विकास होत नाही. तर उलट अधोगतीच होते.
नकारात्मक विचारांनी आपल्यातील कमकुवतपणा जगासमोर येतो. तसा कमकुवतपणाचा विस्तार होतो. त्यामुळे विचाराचेही खच्चीकरण होते. यासाठी सकारात्मक विचाराची कास धरायला हवी. नकारात्मक विचार हे विकासास बाधक ठरतात. यासाठी मराठीमध्ये नवे काय आले ? नवे काय येऊ शकते ? नव्या पण उत्तम कल्पनांना कसा वाव देता येईल ? भाषेची समृद्धी टिकविण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. साहित्य खपविण्यासाठी काही वादग्रस्त विधाने आज केली जात आहेत. अशाने साहित्याचा खप वाढतो जरूर पण वादग्रस्ततेमुळे ते साहित्य फार काळ टिकत नाही. याचाही विचार करायला हवा.
मराठी भाषेची सक्ती करून भाषेचा विकास कदापी होणार नाही. मराठी पाट्यांची सक्ती करून मराठीचे संवर्धन शक्य नाही. भाषा टिकायची असेल तर ती बोली शब्दरचनांनी इतरांची मने जेव्हा जिकेल तेव्हाच ती भाषा इतरांनाही पसंत पडेल. आपोआपच भाषेची गोडी लागून त्या भाषेबद्दल आदर निर्माण होईल. यातून भाषेचे संवर्धन होऊ शकते. यासाठी सुंदर साहित्याची, शाश्वत साहित्याची, लोकोपयोगी साहित्याची निर्मिती व्हायला हवी. माहिती स्त्रोत भाषेतून झाल्यास भाषा विकास होईल. रसयुक्त शब्दरचनेतून मराठी भाषेचे संवर्धन गरजेचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.