भाषेला लोकाश्रय निर्माण केला तरच मायबोली तरणार आहे असा सूर मायबोली परिसंवादात वऱ्हाडी कवींनी व्यक्त केला. दानापूर येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये बोली भाषांचे प्रमाण मराठीला या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते.
बातमी सौजन्य – सुनिलकुमार धुरडे
भाषा जगविण्यासाठी भाषेला लोकाश्रय निर्माण करा तर भाषा तरणार अन्यथा मरणार असा सूर मराठी मायबोली संमेलनाच्या दुसऱ्या परिसंवादात उमटला. यावेळी परिसंवादामध्ये वऱ्हाडी कवी रावसाहेब काळे, डॉ. श्रीकृष्ण काकडे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर उपस्थित होते. तर परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण लळीत हे होते.
८ वे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनात माझ्या बोलीचे प्रमाण मराठीला या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहभागी कवींनी मायबोली जगविण्यासाठी व वाढविण्यासाठी काय गरजेचे आहे. याबाबत मते व्यक्त केली. तसेच मायबोली खऱ्या अर्थाने कुठल्याही भाषेचा सन्मान वाढवीत असते. त्यामुळे मायबोली प्रत्येकाने जगवावी व त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करावा असे मत परिसंवादाचे अध्यक्ष बाळकृष्ण लळीत यांनी व्यक्त केले. तसेच ३५० शब्द बोलीमधील मराठी कोशामध्ये समाविष्ट झाल्याची बाब त्यांनी यावेळी स्पष्ट केली. व्यासपीठावर अध्यक्ष बाळकृष्ण लळीत, प्रतिमा इंगोले, कसबे गव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे उपस्थित होते. परिसंवादाचे सुत्रसंचालन पंडित लोंढे (चंद्रपूर) यांनी केले.
बोलीभाषेमुळे प्रमाण भाषेला महत्व – रावसाहेब काळे
वऱ्हाडी खऱ्या अर्थाने प्रत्येकाने जगविली पाहिजे त्यासाठी विविध साहित्यांच्या माध्यमातून भाषा वृद्धिंगत कशी होईल हे सर्वांचे कर्तव्य आहे. मायबोलीमुळे प्रमाण भाषेला महत्त्व असल्याचे वऱ्हाडी कवी रावसाहेब काळे या परिसंवादामध्ये म्हणाले.
साहित्य संघाचे प्रयत्न महत्त्वाचे – प्रा. श्रीकृष्ण काकडे
भाषा वाढावी व जगवावी यासाठी विविध संस्था संघ कार्यरत असून त्यामधून भाषा वृद्धिंगत होते त्यामुळे साहित्य संघाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. भाषेला लोकाश्रय निर्माण केला तर भाषा मरणार नाही असे मत काकडे यांनी व्यक्त केले.
झाडी बोली मायबोलीचे वैशिष्ट्य – बंडोपंत बोढेकर
झाडी बोली भाषेचे महत्त्व सांगताना ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले की, इतर मायबोली प्रमाणे झाडी बोली भाषा खऱ्या अर्थाने मायबोलीचे सौंदर्य वाढवीत असते. त्यामुळे वऱ्हाडी, अहिराणी सोबतच या भाषा मराठी भाषेचे एक अंग असल्याचे ते म्हणाले.