डॉ. व्ही. एन. शिंदे, मोबाईल – 96737 84400मानव नेहमी भितीच्या छायेत वावरतो. असंच उडत्या तबकड्यांचे गुढ अजून उकलेले नाही. त्यांच्या अभ्यासासाठी अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने वैज्ञानिकांचा एक गट या अभ्यासासाठी बनवला आहे. ते यावर अहोरात्र संशोधन करणार आहे. त्यातच आणखी एक बातमी नासाच्या हवाल्याने प्रसिद्ध झाली. आपल्याच सौरमालेत आणखी एका ठिकाणी जीवसृष्टी असावी, असा संशोधकांना सुगावा लागला आहे.
मानवाची शोध घेण्याची क्षमता अफाट आहे. आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. मानवी जीवन सुखकर बनवण्यासाठी नवतंत्रज्ञान शोधू शकतो. कोणत्याही संकटापुढे हार मानत नाही. अचानक उदभवलेल्या संकटावर मात करत अस्तित्व अबाधीत राखू शकतो. याबाबत त्याचा विश्वास विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत वाढत आहे. मागील लेखात डिडिमस ग्रहाच्या डायमॉर्फिस चंद्रावर उपग्रह कसा आदळवला, याची चर्चा केली. त्यामुळे अवकाशातून कोणतेही संकट आले, तर त्याचा सामना करता येऊ शकतो, हे सिद्ध केले. वैज्ञानिकांना आत्मविश्वास मिळाला. तरीही एक प्रश्न उरतो, तो म्हणजे अवकाशातील असंख्य ताऱ्यांभोवती असणाऱ्या ग्रहमालांपैकी एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असेल आणि ती जर आपल्यासारखी प्रगत असेल, त्यांनीही असाच विचार करून एखादे यान पृथ्वीवर धडकवण्यासाठी पाठवले तर… भिण्याचं कारण नाही, आपण अवकाशातच त्याचा नाश करू.
असं जरी असलं, तरी मानव नेहमी भितीच्या छायेत वावरतो. असंच उडत्या तबकड्यांचे गुढ अजून उकलेले नाही. त्यांच्या अभ्यासासाठी अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने वैज्ञानिकांचा एक गट या अभ्यासासाठी बनवला आहे. ते यावर अहोरात्र संशोधन करणार आहे. त्यातच आणखी एक बातमी नासाच्या हवाल्याने प्रसिद्ध झाली. आपल्याच सौरमालेत आणखी एका ठिकाणी जीवसृष्टी असावी, असा संशोधकांना सुगावा लागला आहे. आजवर आपण केवळ सौरमालेतच नाही, तर अखिल विश्वात एकाच ग्रहावर जीवसृष्टी असल्याचे मानत आहोत. तो ग्रह म्हणजे पृथ्वी. मात्र या समजाला तडा देणारी ही बातमी आहे.
अशी जीवसृष्टी सौरमालेतील शनी ग्रहाच्या भोवती फिरणाऱ्या टायटन या उपग्रहावर आहे, असे संकेत मिळाले आहेत. खरं तर शनीभोवती उपग्रहांचे कडे आहे. या कड्यांमध्ये सिलिका, लोहाचे ऑक्साईड आणि बर्फ आहे. कडे बनवणाऱ्या धुळीमध्ये सूक्ष्म कणांपासून दहा किलोमीटर लांबीचे तुकडे आहेत. आपणास पृथ्वीवरून ते सारे धुलीकण भासतात. शनीला एकूण ६३ चंद्र आहेत. त्यापैकी एक उपग्रहकिंवा चंद्र म्हणजे टायटन. शनीचा हा सर्वात लक्षणीय उपग्रह आहे. याच्या मध्यभागी घनता जास्त आहे. टायटन हा पृथ्वीच्या चंद्रापेक्षा आकाराने थोडा लहान आहे. त्याची रूंदी ५०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. टायटन उपग्रहावर पृथ्वीप्रमाणेच नद्या, जलाशय आणि जलस्रोत असल्याचे संशोधकांना आढळून आले. टायटन ग्रहावर पृथ्वीप्रमाणे जलचक्र सुरू असते. टायटनभोवती वातावरणाचा जाड थर आहे. तेथे नेहमी पाऊस पडतो. पृथ्वीप्रमाणे तेथे निसर्गचक्र सुरू आहे. वादळे नेहमी होतात. वाळूची वादळेही निर्माण होतात. टायटन चंद्रावरील खनिजे वेगळी आहेत. येथे गोडे पाणीही असू शकते. नायट्रोजनचे प्रमाणही लक्षणीय असून वारे वाहताना याच वायूचा आधिक प्रभाव असतो. टायटनवर मिथेन वायूचा पाऊस पडत असल्याचे संकेत संशोधकांना मिळाले आहेत.
तरीही संशोधक त्यावर जीवसृष्टी आहे याबाबत साशंक आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शनी हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. तो सौरमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनी ग्रह अजूनही वायुरूपात आहे. शनी ग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा २९ वर्षांत पूर्ण करतो. त्याचे सूर्यापासूनचे अंतर १,४२,६७,२५,४०० किलोमीटर इतके आहे. त्याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. शनीवर सूर्याचा प्रकाश अत्यंत अंधूक पडतो. इतक्या कमी सूर्यप्रकाशात पृथ्वीप्रमाणे समृद्ध जीवसृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही, असे जीवशास्त्रज्ञ म्हणतात. मात्र तेथील तीव्र थंडी आणि मिथेनच्या असणाऱ्या अस्तित्वामुळे टायटनवर काही जीवाणू असू शकतात. आज सूर्याचाही आकार वाढतो, तो प्रसरण पावतो, असाही निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. त्यानुसार सूर्य आणखी प्रसरण पावून त्याचा तीव्र प्रकाश टायटन उपग्रहापर्यंत पोहाचला, तर निश्चितपणे तेथे जीवसृष्टी उत्क्रांत पावेल, असे त्यांचे मत आहे. मात्र यासाठी अब्जावधी वर्षे लागतील. तोपर्यंत आपली कितवी पिढी अस्तित्वात असेल, हे शोधावे लागेल. मात्र मानवाला, आणखी कोठेतरी जीवसृष्टी असल्याचे किंवा ती उत्क्रांत पावू शकते, याचे मिळणारे संकेत अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरतात.
त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे पृथ्वीवरील वातावरण खरोखरच मानवाच्या वास्तव्यासाठी अयोग्य झाले, तर कोठेतरी त्याला उतरायला जागा मिळेल. ज्या शनीला आपण आजवर संकटकारक मानतो, साडेसातीचा ग्रह मानतो, त्रासाचा ग्रह मानतो, तोच ग्रह ही आशा देत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, शनीच्या एखाद्या उपग्रहावर जर ही शक्यता असेल, तर इतर ताऱ्यांभोवती असणाऱ्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आणखी वाढते. संशोधक अनेक वर्षांपासून याचा शोध घेत आहेत. त्याबाबत अजून आशादायक संकेत मिळालेले नाहीत. मात्र या नव्या संशोधनाने संशोधकांच्या मनात आशेची नवी पालवी फुटली आहे.
मानव स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी ही सर्व धडपड करत आहे. त्याच्या मनात सदैव भिती आहे. पृथ्वी जर राहण्यायोग्य राहिली नाही, तर मानवी अस्तित्व कसे टिकवायचे, हा त्याच्यासमोर प्रश्न आहे. मात्र ही परिस्थिती कोणी निर्माण केली, पृथ्वी ग्रह कायम वास्तव्यासाठी चांगला कसा राहील याचा विचार खूप कमी केला जातो. मध्यंतरी आणखी एक जाहीरात वाचनात आली. त्यात म्हटले होते, केवळ ९५ लाख डॉलरमध्ये २४ तासात चौदा वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येणार. हे शक्य होणार कारण एवढे पैसे आकारून यांनातून तुम्हाला अंतराळात अशा उंचीवर नेले जाणार की तेथे २४ तासात सूर्योदय आणि सूर्यास्त चौदावेळा पाहता येईल. मानवांकडे अशा गोष्टीसाठी पैसा आणि वेळ आहे, मात्र ज्या वसुंधरेने मानवाला समृद्ध जीवन दिले, सौंदर्याने भरलेला निसर्ग दिला, तिचे सौंदर्य जपण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्यास माणूस तयार नाही.विचार व्हायला हवा!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.