June 7, 2023
Kriya Palate Tatkal Story on Dasbodh by Avinash Halbe
Home » क्रिया पालटे तात्काळ…(भाग ३ रा)
मुक्त संवाद

क्रिया पालटे तात्काळ…(भाग ३ रा)

नमस्कार मित्रांनो- मी अविनाश हळबे.

आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकत आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ – मागच्या भागात आपण मी विनयला दासबोध भेट दिल्यावर त्याची प्रतिक्रिया आणि त्यावर झालेला आमचा वादविवाद बघितला. आज ऐकुया तिसरा भाग.

क्रिया पालटे तात्काळ भाग – ३

यापूर्वीचे भाग ऐकण्यासाठी क्लिक करा

क्रिया पालटे तात्काळ – भाग २

क्रिया पालटे तात्काळ भाग १
   असेच दिवस पुढे जाऊ लागले. माझा विज्ञानाला विरोध कधीच नव्हता. विनयने दिलेली पुस्तके छानच होती. त्यांच्या वाचनाने माझ्या ज्ञानात खूपच भर पडत होती. इतकेच नव्हे तर त्यातल्या काही गोष्टी मी मधून मधून विद्यार्थ्यांना सांगायला सुरूवात केली. त्यांना त्या आवडताहेत हे बघताच एक अनोखी कल्पना माझ्या मनाला चाटून गेली. या विद्याालयात मुलांसाठी ‘सायन्स क्लब’ का काढू नये ? आणि मी तो सुरू केलाही - त्याचे सभासदत्व मुलांसाठी विनामूल्य आणि ऐच्छिक होते. दर शनिवारी दुपारी मी त्यांना एका वर्गात जमा करी आणि विज्ञानाबाबत मी वाचलेली नवी माहीती – त्यातली क्लिष्टता टाळून – सांगे. नंतर मुलांनाही अशी माहीती गोळा करून सांगण्याचे आवाहन केलेे. मग मुलेही सरसावली .. कुठुन कुठुन नवीनवी माहीती गोळा करून या व्यासपिठावर येऊन सांगू लागली. पहाता पहाता एका वर्गात भरणारा आमचा सायन्स क्लब सहा महिन्यातच विद्यालयाच्या आॅडिटोरियममध्ये हलवावा लागला. शाळेचे मुख्याध्यापकही खूश झाले. त्यामुळे एक दिवस तर त्यांनी आम्हाला पुणे विद्यापीठातल्या ‘आयुका’ ला भेट देण्यची संधीही उपलब्ध करून दिली-

   विनयकडे माझे येणेजाणे चालूच होते. पण विनय दासबोध वाचत होता की नाही हे कळायला मला काहीच मार्ग नव्हता. एकदा वाटलेय त्याला विचारावे. पण दुसऱ्याक्षणी मनात विचार आला. उगीचच त्याला कशाला टोचायचे ? स्वारी भडकली तर पंचार्इत व्हायची. जे होर्इल ते होर्इल - अर्थातच त्यामुळे मी त्याने दिलेल्या ‘एनसायक्लोपिडिया ब्रिटानिका’य किंवा त्याच्या वाचनाने प्रभावित होऊन सुरू केलेल्या ‘सायन्स क्लब’ या बद्दलही चकार शब्द काढला नाही.
 Ω Ω Ω

   होता होता जवळजवळ दीड वर्ष झाले. आता मात्र मला राहवेना. मी एके संध्याकाळी विद्यालयातून जो निघालो तो थेट त्याचे घर गाठले. काही वेळात स्वारी आली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी न रहावून विचारले.   
     
 ‘विनयय दीड वर्षांपूर्वी मी तुला दासबोध दिला होता. आपण एक करारही केला होता .. त्यानुसार तू दासबोध वाचलास का ?’ 
 विनय फक्त हसला. 

 ‘अरे हसतोस काय? काय विचारतो आहे मीऽऽऽ ? तू दासबोध वाचलास की नाही ?’ मी काहीसे चिडून विचारले. 
   विनयने माझ्याकडे रोखून पाहिले आणि एकेका शब्दावर जोर देत म्हणाला   
 ‘अविय तू मला दासबोध वाचतो का असे विचारतोयस ? अरे मित्राऽऽऽऽ आता मी दासबोध नुसताच वाचत नाही तर इतरांना सांगतोय ---’

 ‘क .. क .. काय ?’ मी आश्र्चर्यचकित होऊन चक्क ओरडलोच. 
 ‘हो- हो- हो- .. नीट ऐक .. आता मी दासबोध सांगतो’ -- विनय प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. 
 ‘काय ? तू ? आणि दासबोध सांगतोस ?’ मी अविश्र्वासाने म्हणालो. 
 ‘हो हो. मी दासबोध सांगतो- पण थांब. मला तुझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि प्रश्र्न वाचता येताहेत. सगळेच सांगतो.’ विनयने सुरूवात केली. 

 ‘तू मला माझ्या एकसष्टीला दासबोध भेट दिला होता आणि मी तो चिडून नाकारला होता हे खरेच आहे. पण आपले बोलणे झाल्यावर मी तो एक वर्षभर वाचून जर निरर्थक वाटला तर परत करण्याच्या बोलीवर घेतला. त्या बदल्यात मीच न वाचलेला एनसायक्लोपिडियाही तुझ्या माथी मारला. मी बराच विचित्र वागलोे. पण अवि मी शब्दाचा पक्का आहे. मी ज्यावेळी तुला वचन दिले की मी रोज एक समास वाचीनय त्या दिवसापासून मी रोज वाचन सुरू केले. खरेतर पहिल्याने माझा या ग्रंथाकडे बघण्याचा दॄष्टीकोन फारच उपहासात्मक होता. साडेतीनशे वर्षांपूर्वीचे … आपल्या भाषेतले ‘आऊटडेटेड’ तत्त्वज्ञान वाचून काय फायदा? असेही विचार माझ्या मनात येत होते.’ 

   पण खरं सांगतो अवि. पाचदहा समासातच मला धक्क्यांमागून धक्के बसू लागले. प्रत्येक समास मला काहीतरी नवीन ज्ञान देऊ लागला. साध्यासाध्या गोष्टींचाही समर्थांनी किती चपखलपणे विचार केला आहेय इतकेच नव्हे तर त्यांनी सांंगितलेली प्रत्येक बाब आजच्याही जीवनशैलीला लागू पडते हे बघून मला आश्र्चर्य वाटू लागले. मूर्खलक्षणे आणि पढतमूर्खलक्षणे तर वादातीतच आहेत .. मीच काय पण प्रत्येकाला ती लागू पडतात. पण अगदी साधी ‘साहेबासी लोटांगणी जावे । नीचासारखे व्हावे । अन देवासी न मानावे । हे कोण ज्ञान ।।’ ही ओवी बघ. अरे मीसुद्धा आजवर असेच वागत होतो. पण या वाचनाने माझे डोळे उघडू लागले. मग मी झपाटल्यासारखा दासबोध वाचू लागलो. 

   पूर्वी मी मला कोणी वेडेवाकडे वागणारा माणूस भेटला तर त्याच्यावर चिडायचो .. वेळप्रसंगी त्याची निर्भत्सनाही करायचो .. पण समर्थांची ‘दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्व देऊनी ।।’ ही ओवी वाचल्यावर मी माझा राग आवरता घेऊन समयोचित वागू लागलो. कंपनीत मिटिंग्जमध्ये एखाद्या समस्येवर बरीच मंडळी अगदी अव्यवहार्य उपाय सुचवत आणि तोच कसा बरोबर आहे याबाबत माझ्याशी वाद घालत. 

एकेकाळी मी हिरिरीने त्यांना आडवा उभा घेत असे. त्यांचे म्हणणे खोडून काढत असे. पण आता समर्थांची ‘उदंडांचे उदंड ऐकावे । परी ते प्रत्ययो पहावे । खरेखोटे निवडावे । अंतर्यामी ।।’ ही ओवी आठवतोय आणि सगळयांचे म्हणणे न चिडता ऐकून घेऊनय योग्य निर्णय माझा मीच घेतो. कधीकधी ‘बहुत भ्रमिष्ट मिळाले । त्यात उमजल्याचे काय चाले ।’ अशा प्रसंगालाही सामोरे जावे लागते. ‘अति  सर्वत्र वर्जावे । प्रसंग पाहोन चालावे ।’ अथवा ‘उत्कट भव्य तेचि घ्यावे । मळमळीत अवघेचि टाकावे ।’ या ओव्या तर सततच मार्गदर्शन करतात. वरिष्ठांशी वागताना तर ‘दुसऱ्याचे अंतर जाणावे । तदनुसारचि वर्तावे ।’ ही मात्रा चपखल लागू पडते. 

    इतकेच काय तर प्रत्येक मोठया मिटिंग्जला जाताना मी ‘अभ्यासे प्रगट व्हावे । नाहीतरी झाकोन असावे । प्रगट होऊनी नासावे । हे बरे नव्हे ।।’ हे आठवूनय त्याप्रमाणे तयारी करूनय मगच बोलायचे का नाही ते ठरवितो. 

   किती सांगू अन काय सांगू ? दासबोध वर्षभरात वाचण्याचे मी तुला वचन दिले होते. अवि तुला खोटे वाटेल .. आजपर्यंत माझे एकदाच नव्हे तर चक्क सात वेळा वाचन झाले आहेय आणि तरीही प्रत्येक वेळेला काही ओव्यांचे नवेनवे अर्थ उमजू लागले आहेत. अरे आम्ही यंत्रांच्या जगात वावरणारी माणसे सतत सुधारणा उर्फ ‘कायझेन’ चा पुरस्कार करतो आणि कायझेन इज एंडलेस असेही म्हणतो. त्याच धर्तीवर मी असे म्हणू शकतो की दासबोध हा जीवनाच्या कायझेनचा ग्रंथ आहे आणि दासबोधाचा अभ्यासही एंडलेस आहे हेच खरे- 

- अविनाश हळबे पुणे.
मोबाईल नंबर –  9 0 1 1 0 6 8 4 7 2 

 जयजय रघुवीर समर्थ ।

Related posts

पान मुखवास कसे तयार करायचे ?

आई आपली म्हणायची…पण आता त्याचा अर्थ कळतो…

‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण

Leave a Comment