जामखेड : येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे २०२२ चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष, लेखक प्रा. आ. य. पवार व संस्थेचे सचिव प्रा. डॉ. शत्रुघ्न कदम यांनी जाहीर केले.
प्रतिष्ठानकडून काव्य, कथा, कादंबरी, लेखसंग्रह, साहित्य संशोधन ती ग्रंथ पुरस्कार, छत्रपती राजे संभाजी साहित्य पुरस्कार आणि समीक्षा, चरित्र यासाठी महात्मा फुले साहित्य पुरस्कार या नावाने पुरस्कार दिले जातात. रोख रक्कम, मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात व खजिनदार डॉ. जतीनबोस काजळे यांनी दिली.
साहित्य प्रतिष्ठान तर्फे जाहीर पुरस्कार असे –
वाशिम येथील डॉ. विजय जाधव यांच्या ‘गोरवेणा ‘ कथासंग्रहास, अमरावती येथील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या ‘राशाटेक’ कादंबरीस, पुण्यातील डॉ. संदीप सांगळे यांच्या ‘मध्ययुगीन दलित संत कविता : सामाजिक व वाङमयीन मूल्यमापन हा समीक्षा ग्रंथ, सोलापूरच्या डॉ. स्मिता पाटील यांच्या ‘नाही गिरवता येत कुठलीच लिपी’ व मुंबई येथील अनुराधा नेरुरकर यांच्या ‘हुंकारनाद’ या कविता संग्रहास, लातूर
येथील डॉ. जयदेवी पवार यांच्या आ. य. पवार यांच्या निसर्ग व विज्ञान कविता राष्ट्रीय चर्चासत्र शोधनिबंध संपादनास, गोवा येथील प्रा. चिन्मय घैसास यांच्या ‘कवडसे’ व नगर येथील डॉ. भि. ना. दहातोंडे यांच्या ‘स्त्रीशक्ती’ या ललित लेखास, सांगोला येथील डॉ. किसन माने यांच्या ‘भाई गणपतराव देशमुख’ या चरित्रास व नाशिक येथील संतोष कांबळे यांच्या तुकोबाच्या कुळाचा वंश या गझलसंग्रहास पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार निवड समितीत डॉ. राजाराम सोनटक्के, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. गोपीनाथ बोडके, प्रा. विजया नलवडे यांचा समावेश होता.
राशाटेक कादंबरीस पुरस्कार
राशाटेक नावाची भुईशी संबंधित कादंबरी डाॅ प्रतिमा इंगोले यांची सहावी कादंबरी आहे. प्रतिमा इंगोले यांना मिळालेला हा एकशेपंधरावा पुरस्कार आहे. त्यांना राज्य शासनाचे सात पुरस्कार मिळाले असून, इतरही नामांकित संस्थाचे शंभरावर पुरस्कार मिळाले आहेत.
‘राशाटेक’ही कादंबरी नायिकाप्रधान असून ती आपल्या जीवनभोगातून मार्ग काढत, दुःखावर मात करत राहते. प्रतिमा इंगोले यांच्या बहुतेक कादंबऱ्या ह्या नायिका प्रधान असून त्या सर्व चिवटपणे जीवनाशी झुंज देतात. राशाटेकमध्ये माय मातीत जाते आणि माती माय होते’ हे नवे जगण्याचे सूत्र सांगणारी आहे. माती सर्वांसाठी मोती पिकवते, तरीही तिची काही लेकरं उपाशी राहतात. त्यांना श्रीमंतांकडे असणारी पैशांची रास ही मातीदगडांच्या राशी सारखीच असते. पण अती झाले तर मातीच न्याय करते. निसर्ग अशावेळी चूक दाखवून देतो.