November 30, 2023
MoU between Shivaji University and The Commish Institute Lisbon Portugal
Home » शिवाजी विद्यापीठ व द कमॉइश इन्स्टिट्यूट, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार
काय चाललयं अवतीभवती

शिवाजी विद्यापीठ व द कमॉइश इन्स्टिट्यूट, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठ व द कमॉइश इन्स्टिट्यूट, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार

कोल्हापूर : विदेशी भाषा विभाग, शिवाजी विद्यापीठ व ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला. हा सामंजस्य करार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या नेतृत्वाखाली  एक प्रतिनिधी मंडळ पणजी, गोवा येथे गेले होते. त्यामध्ये इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक डॉ. एस. बी. सादळे, विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांचा समावेश होता. या प्रतिनिधी मंडळाने पोर्तुगालच्या गोवा येथील कॉन्सुलेट जनरल श्रीमती इसाबेल राइमुन्दो यांची भेट घेतली. या कराराअंतर्गत पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती प्रसार, शिक्षक प्रशिक्षण, तसेच वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य इत्यादी बाबींचा समावेश होतो. या प्रसंगी पोर्तुगीज दूतावास सांस्कृतिक केंद्राचे प्रतिनिधी डॉ. डेल्फीम कोरेइया द सिल्वा, कमॉइश इन्स्टिट्यूट संचालक मंडळाच्या अध्यक्ष आना फर्नांडिस व पोर्तुगीज भाषा शिक्षिका ऐश्वर्या चव्हाण उपस्थित होते.

‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल, ही संस्था पोर्तुगाल राष्ट्राची अधिकृत आंतरराष्ट्रीय संस्था असून ती भारतात पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती अभ्यास व प्रसारासाठी समर्पित कार्य करते. या संस्थेमार्फत पोर्तुगीज भाषेचे विविध अभ्यासक्रम चालतात. या करारानंतर होणाऱ्या भाषा व सांस्कृतिक परस्पर आदानप्रदान याबाबत दोन्ही संस्था अतिशय आशावादी असल्याचे मत श्रीमती इसाबेल राइमुन्दो व डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले.  

या कार्यक्रमात सुरुवातीस डॉ. डेल्फीम कोरेइया द सिल्वा यांनी स्वागत केले व ‘संपर्क भाषा ते बहुकेंद्रित भाषेपर्यंत पोर्तुगीज भाषेचा प्रवास: २१व्या शतकातील आव्हाने आणि संधी’ या विषयावर माहिती दिली. जागतिक, आंतरखंडीय आणि बहुकेंद्री भाषा म्हणून पोर्तुगीज भाषेच्या आर्थिक आणि भौगोलिक सामर्थ्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

श्रीमती इसाबेल राइमुन्दो यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रतिनिधी मंडळाचे आभार मानले. भारत व पोर्तुगाल या देशांतील राजनैतिक संबंध २१ व्या शतकात नव्या पर्वात पोहोचले असून त्यामध्ये सातत्याने परस्पर-सहकार्य सुरु असून शिवाजी विद्यापीठाशी झालेला सामंजस्य करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केली व शिवाजी विद्यापीठातील पोर्तुगीज भाषेच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थी विविध क्षेत्रांत संधी प्राप्त करतील, अशी आशा व्यक्त केली. डॉ. डी. टी. शिर्के यांनी पोर्तुगीज भाषेबरोबरच सांस्कृतिक विनिमय, वैविध्यपूर्ण उपक्रमशीलता व भाषांतर क्षेत्रात योगदान या माध्यमातून दोन्ही संस्था व देशांतील परस्परसंबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात डिजिटल आशय निर्मिती, मिश्र व दूरस्थ अध्ययन, पोर्तुगालमधील विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांशी संशोधन क्षेत्रात सह-प्रकल्प व  भागीदारी विकसित करण्यास प्राधान्य देण्याची मनीषा व्यक्त केली.

भारत आणि पोर्तुगाल या दोन राष्ट्रांत अनेक सामंजस्य करार झाले आहेत. व्यापाराची देवाणघेवाण सुरु आहे. तसेच पोर्तुगीज संस्कृतीचा गोव्यावर मोठा सांस्कृतिक प्रभाव राहिला आहे. संगीत, पाककला, वास्तुकला, धर्म अशा अनेक स्तरांवर हा प्रभाव दिसून येतो. पोर्तुगाल मध्येही मोठ्या संख्येने भारतीय आहेत. त्यामुळे पोर्तुगीज भाषेचे ज्ञान व संवाद कौशल्य युवकांसाठी करिअरच्या अनेक नव्या संधी उपलब्ध करून देते.

पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम सुरु करणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव विद्यापीठ आहे. २०१९ मध्ये शिवाजी विद्यापीठात पोर्तुगीज भाषेचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. परंतु त्यानंतर कोरोना साथीमुळे तो खंडित झाला होता. आता पुन्हा डिसेंबर, २०२३ पासून पोर्तुगीज भाषेचे तास सुरु होणार आहेत.

या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना  पोर्तुगीज भाषा अध्ययनाची संधी प्राप्त होत आहे. या करारामुळे शिवाजी विद्यापीठ व ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल यांच्यात शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी थेट संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील पोर्तुगीज भाषा शिकणाऱ्या विद्यार्थी-शिक्षक यांना जागतिक स्तरावर पोर्तुगीज भाषेशी संबंधित विविध शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या उपक्रमांत सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.   

मध्ययुगीन महाराष्ट्राचे इतिहास संशोधक व अभ्यासकांना पोर्तुगीज संदर्भसाधनांच्या आकलनासाठी पोर्तुगीज भाषा अवगत असणे अनिवार्य आहे. त्यामुळेच पोर्तुगीज भाषेचे ज्ञान मराठी भाषिक इतिहास संशोधक व अनुवादकांसाठी अनेक शैक्षणिक, संशोधन व रोजगाराच्या संधी निर्माण करते.

२१व्या शतकात भारत आणि पोर्तुगाल, तसेच ब्राझीलसह विविध पोर्तुगीज भाषिक देश परस्पर व्यापारी संबंध वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ब्राझील ही सध्या जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पोर्तुगाल, पोर्तुगीज भाषिक राष्ट्रे व भारत यांच्यातील वाढते व्यापारी संबंध लक्षात घेता दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळूरू, हैद्राबाद, चेन्नई अशा महानगरी शहरांत बहुराष्ट्रीय कंपन्यांना पोर्तुगीज भाषातज्ज्ञांची मोठी गरज आहे.

शिवाजी विद्यापीठ व ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल यांच्यामधील सामंजस्य करार महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.  शिवाजी विद्यापीठासाठी ही नव्या संधी उपलब्ध करून देणारी बाब आहे.

Related posts

ग्रामजीवन आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा कथासंग्रह-तारणहार

स्वधर्म आचरण कठीण असले तरी तेच स्विकारणे योग्य

श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More