February 1, 2023
Spiritual progress comes from a scientific point of view
Home » वैज्ञानिक नजरेतूनच होते अध्यात्मिक प्रगती 
विश्वाचे आर्त

वैज्ञानिक नजरेतूनच होते अध्यात्मिक प्रगती 

वैज्ञानिकदृष्टिने या चमत्कारांकडे पाहायला हवे. तरच त्यातील सत्याचे शोधन होईल. सूर्यकिरण आणि मृगजळापासून सूर्यमंडळ हे फार वेगळे आहे हे विज्ञानाने समजून घ्यायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

कां रश्मी हन मृगजळा । पासूनि अर्कमंडळा ।
अफाटु तेवी वेगळा । उत्तमु गा ।। ५३० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – अथवा अर्जुना, सुर्यकिरणें व मृगजळ यांहून सूर्यमंडळ जसे फारच फार वेगळें आहे.

सूर्यकिरणे जितकी दाहक असतात तितकेच त्याचे सौंदर्यही आल्हादायक असते. सूर्यास्त पाहाण्यासाठी यासाठीच समुद्रकिनारी गर्दी होते. उन्हाळ्यातील दुपारच्या सूर्यकिरणाच्या झळा नको-नकोशा वाटतात. पण हिवाळ्यात सकाळच्या कडाक्याच्या थंडीत सूर्यकिरणात बसणे तितकेच हवे-हवेसे वाटते. सूर्याजवळ सतत होणाऱ्या स्फोटातून ही किरणे बाहेर पडतात. पण आपल्यापर्यंत पोहोचण्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच त्यांची दाहकताही आपणास सहन व्हावी यासाठी निसर्गाने तशी उपाययोजना केली आहे. वातावरणातील विविध वायू ही किरणे शोषून घेतात त्यामुळे त्याची दाहकता कमी होते. अन्यथा पृथ्वीवरील सजिवसृष्टी जीवंत राहू शकली नसती इतकी त्याची दाहकता आहे.

या सूर्यकिरणांचा भासही आपणास होतो. यातूनच मृगजळ तयार होते. उष्ण अन् थंड हवामानाच्या फरकातून हा भास निर्माण होतो. पृष्ठभागावर किरणे पोहोचल्यानंतर या किरणांमुळे पृष्ठभाग तापतो. साहजिकच पृष्ठभागालगतच्या हवेचे तापमानही वाढते. पण त्यावर असणारी हवा पटकण तापत नाही. त्यामुळे त्याचे तापमान हे कमी राहाते. हवेच्या तापमानातील या फरकामुळे प्रकाशकिरणांचे परिवर्तन घडते. थंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते. कमी हवेच्या घनतेतून जास्त घनतेकडे जाणारे किरण वक्रीभूत होतात. यातून पाण्याचा भास होणारी प्रतिमा तयार होते. या प्रतिमेलाच मृगजळ म्हटले जाते. हा डोळ्यांना होणारा भास असतो. प्रत्यक्षात तेथे पाणी नसते. निसर्गात अशा अनेक चमत्कारीत गोष्टी पाहायला मिळतात. यातून आपली फसगत होते. यासाठीच यामागील विज्ञान जाणून घेण्याची गरज आहे.

वैज्ञानिकदृष्टिने या चमत्कारांकडे पाहायला हवे. तरच त्यातील सत्याचे शोधन होईल. सूर्यकिरण आणि मृगजळापासून सूर्यमंडळ हे फार वेगळे आहे हे विज्ञानाने समजून घ्यायला हवे. पृथ्वीच्या बाहेर आपण जाऊ शकतो. याचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने आता सूर्यमंडळात काय काय आहे यावर शोध सुरु आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने या गोष्टी आता अधिक सोप्या झाल्या आहेत. सूर्यावरील पोकळीचाही अभ्यास आता सहजपणे केला जात आहे. तेथेही सू्र्यकिरणांमुळे मृगजळ आहे. सूर्यमंडळापासून ते वेगळे आहे हे विचारात घेऊन संशोधन करायला हवे.

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही सुप्त गुण असतात. वेगळेपण असते. पण ते काही कारणांनी जाणवत नाही. दिसत नाही. हे सूप्त गुण प्रकट होण्यासाठी योग्यवेळ व योग्य परिस्थिती यावी लागते तरच ते सुप्त गुण प्रकट होतात. हे सुप्त गुण चांगलेही असू शकतात अन् वाईटही असू शकतात. हे प्रकट होण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण व्हावी लागते. जमिन उन्हाळात ओसाड दिसते. पण पावसाळा सुरु होताच पहिल्या पावसानंतर अवघ्या एक दोन दिवसातच ओसाड दिसणारी ती भूमी हिरवीगार दिसते. म्हणजे त्या मातीतही सुप्तावस्थेतील बिजे होती. ती कोणी पेरली होती का ? नाही. पण ती बिजे पावसाळी हवा सुरु होताच उगवली. म्हणजेच योग्य परिस्थितीतच ते गुण बाहेर पडतात. प्रकट होतात. मृगजळही योग्य परिस्थितीतच दिसते.

प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मज्ञानाचे बिज आहे. पण आत्मज्ञानाचे हे सुप्त बिज उगवण्यासाठीही योग्य परिस्थिती उत्पन्न व्हावी लागते. तरच ते प्रकट होईल. अन्यथा तेही सुप्तावस्थेतच पडून राहाते. पावसाळा उशीराने आला, पाऊसच झाला नाही, तर ती जमिनीतील बिजे उगवणारच नाहीत. कारण योग्य परिस्थितीची, वातावरणाची गरज असते. आत्मज्ञान होण्यासाठीही योग्य वेळ, योग्य परिस्थिती, योग्य वातावरण निर्माण व्हावे लागते. मनाची योग्य स्थिती निर्माण व्हावी लागते. तरच साधनेचा सुर गवसतो. श्वासाची स्थितीही योग्य व्हावी लागते. समपातळीत असावी लागते. हा समतोल साधल्यानंतरच ज्ञान प्रकट होते. हा समतोलपणा साधनेने साधता येतो. यासाठीच नित्य साधना ही आवश्यक आहे.

Related posts

कशाने येते मनास स्थिरता ?

देवाच्या भजनास तोच योग्य

आचरणात अहिंसा, विचारात अनेकान्तवाद हेच आर्जव

Leave a Comment