October 9, 2024
Ved Reading authority article by Dr Leela Patil
Home » Privacy Policy » काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ॥
मुक्त संवाद

काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ॥

कलियुगात बरेच कवी, पंडित दिसतात जे तोंडाने कोरडीच बडबड करीत असतात. व्यासपीठावरून जोरकस जोश घेऊन शाब्दिक भाष्य करणारेही अनेकजण आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांचे आचरण तसे असत नाही. लोकांनी मान द्यावा, विद्वान म्हणावे म्हणून धडपडणारी दांभिक मंडळीही आजच्या समाजात कमी नाहीत.

डॉ. लीला पाटील कोल्हापूर

पंडित म्हणता थोर सुख । परितो पाहता अवघा मूर्ख ॥ १ ॥
काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ॥२॥
वेदी सांगितले ते न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी || ३ ||
तुका देखे जीवी शिवी । हा तेथीचा अनुभव ॥४ ॥ (१६२२)

पोकळ शब्दज्ञानाच्या जोरावर स्वत:ला पंडित समजणारे लोक आपल्या या पोकळ विद्वत्तेची घमेंड बाळगू लागले. इतरांना हिणवू लागले. आपल्या अवती-भवती चाललेला हा प्रकार म्हणजे खऱ्या ज्ञानाची विटंबना आहे हे तुकारामांनी ओळखले. वेदाच्या अर्थाची उपेक्षा त्यांना सहन होत नाही. वेदांनी काय सांगितले आहे, याचा गंधही नसलेले लोक केवळ घोकंपट्टी करून स्वत: ज्ञानी, पंडित, विद्वान, आत्मज्ञानी वगैरे मानू लागले. अर्थ न जाणता नुसते पाठांतर करणाऱ्या आणि अनुभव न घेता शब्दांची पोकळ बडबड करणाऱ्या तथाकथित पंडितांवर तुकारामांनी ओढलेले कोरडे त्यांच्या मर्मावर जबरदस्त आघात करणारे आहेत.

या पार्श्वभूमीवर तुकारामांनी हा अभंग मांडला. शब्दांना येणारा पोकळपणा, अर्थज्ञानाच्या अनुभवाच्या अभावी तर येतोच हे त्यांनी सांगितले. तसेच शब्दांनी केलेल्या आदेशाला अनुसरून आचरण केले नाही तरी शब्दांना पोकळपणा येतो हा विचार मांडला. तुकारामांचे व्यक्तित्व आचरणाला महत्त्व देणारे होते. आचरणाची कसोटी ते अगोदर स्वतःच्या व्यक्तित्वाला लावत असत. मगच इतरांचे मूल्यमापन करीत. ‘आधी केलेच पाहिजे । मग सांगितले’ अशी त्यांची वर्तन वृत्ती होती.

वैदिक परंपरेत आचरणाला महत्त्व देणारा सिद्धांत होताच. वेदांनी जे जे सांगितले असेल, त्यांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. जो असे पालन करणार नाही, त्याला नास्तिक मानून बहिष्कृत करावे असा नियम होता. तरीही काही वैदिक पंडित स्वतः नियम पाळत नसत. मात्र इतरांनी तो पाळावा असा आग्रह धरीत. उदा. शूद्रांना वेदाचा अधिकार नसतो या नियमाचे त्यांच्या बाबतीत अत्यंत निर्दयपणे पालन करण्यात येत असे. हा दुटप्पीपणा तुकारामांच्या ध्यानात आला. या दुटप्पी नीतीचा त्यांनी निषेध केला. नियम आपल्याला सोयीस्कर असला तर त्यांचे पालन करायचे, पण तसा नसला तर मात्र तो नियम डावलायचा असे या पंडितांचे धोरण तुकारामांनी जाणले. अत्यंत महत्त्वाच्या नियमांचे पालन करीत नाहीत हे समाजाच्या लक्षात आणून देण्याची सद्सद्विवेक वृत्ती त्यांच्याकडे होती. ब्रह्माचे समत्व आणि देहाची अनासक्ती यांचे पालन किती पंडित करतात ? असा प्रश्न उपस्थित केला. त्या विचारांचा ऊहापोह अनेक अभंगांतून केला. त्यापैकी हा एक अभंग होय. या अर्थाने मांडलेला हा अभंग होय.

ते अभंगात म्हणतात – स्वत:ला पंडित म्हणवून घेताना त्या पंडिताला मोठे सुख वाटते. खरे पाहिले तर तो मूर्खच म्हटला पाहिजे. फक्त घोकंपट्टीचा काय उपयोग ? केवळ घोकणं निरर्थकच आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्याचे तसे वेदपठण निरर्थकच म्हणावे लागेल. त्याचे वेदपठण तर वायाच गेले असे म्हटले पाहिजे. कारण वेदांनी सांगितले तसे त्याचे वर्तन नाही. जसे वेदांनी कथन केले तसे करीत नाही. हा दुराचारी मनुष्य समब्रह्म म्हणजे काय जाणत नाही.

तुकाराम मात्र वेदांचे अभ्यासक तर होतेच; पण त्यानुसार जीवात शिव पाहणारे, वेदाचा अनुभव घेणारे होते. अर्थ न जाणता केलेले वेदपठण वाया जाते, तसेच आचरणाशी न जोडलेले वेदपठण म्हणजे कुचकामी वाच्यता होय असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. पाठांतराच्या जोरावर स्वतःला पंडित समजणाऱ्यांच्या वृत्तीवर अत्यंत जहाल भाष्य करणारे तुकाराम, समतेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे याची त्यांनी जोरकसपणे मांडणी केली. समता पाळत नसलेल्या पंडितांना दुराचारी म्हणून संबोधले.

यापुढे जाऊन तुकाराम म्हणतात, ज्याचा नाश होणार नाही, असे तुम्ही का बरे करीत नाही ? सर्व प्राण्यांना वंदन करून विश्वंभराला शरण जावे. हे सारे मूळ जाणून तुम्ही वेदांचे फळ का बरी घेत नाही. तुमच्यापुढे याखेरीज दुसरी काहीही वाट नाही, असा उपदेश करायलाही तुकाराम विसरले नाहीत.

कलियुगात बरेच कवी, पंडित दिसतात जे तोंडाने कोरडीच बडबड करीत असतात. व्यासपीठावरून जोरकस जोश घेऊन शाब्दिक भाष्य करणारेही अनेकजण आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांचे आचरण तसे असत नाही. लोकांनी मान द्यावा, विद्वान म्हणावे म्हणून धडपडणारी दांभिक मंडळीही आजच्या समाजात कमी नाहीत. सभोवती स्तुतीपाठक (आधुनिक भाषेत चमचे) गोळा करायचे आणि त्यांच्यामार्फत स्वत:च्या विद्वत्तेचे, पांडित्याचे स्तोम माजवायचे. एवढेच नव्हे तर ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करवून पुरस्कार मिळवायचे. पारितोषिकांच्या लोभाने झपाटलेल्यांना पाहून तुकाराम किती व्यथित झाले असते याची कल्पना केलेलीच बरी !

साहित्य संमेलने गाजविणारे, वादविवाद चर्चेत हिरीरीने सहभागी झालेले, गाढे तत्त्वज्ञान जड व सहजी न समजेल अशा भाषेत सांगणारे शब्दांचेच कारंजे उडविणारे पोकळ पांडित्य तुकारामांना मान्य नाही. तरीही आज त्यांचाच गाजावाजा होत आहे. ही नीती तुकारामांनी त्या काळात त्याज्य ठरवली होती.

तुकारामांनी या लोकांना उद्देशून ‘दुराचारी’ हे झणझणीत विशेषण वापरले आहे. तुकारामांना वेदातील सर्व भाग मान्य होता असे नाही. पण वेदातील समतेचा भाग प्रत्यक्षात आणला जात असेल तर तो मान्य होता. मात्र आज वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रातही समतेचे आचरण न करणारे, समता न मानणारे अशांची संख्या वाढत आहे. मग ती मंडळी दुराचारी, दुटप्पी, दुवर्तनीय म्हणावी लागतील.

डॉ. लीला पाटील कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading