December 26, 2024
Method of Meditation article by Rajendra Ghorpade
Home » जप, साधना कशी असावी ?
विश्वाचे आर्त

जप, साधना कशी असावी ?

सोऽ हमचे स्वर मनाच्या कानांनी ऐकायला हवेत. म्हणजे मन त्यात रमवायला हवे. सोऽहमचे बोल बुद्धीच्या डोळ्याने पाहायला हवेत. अशी साधना करायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

परी तें मनाच्या कानीं ऐकावें । बोल बुद्धीच्या डोळां देखावें।
हे सांटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ।। 494 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ – पण ते मनाच्या कानांनी ऐकले पाहिजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याचा मोबदला घेतले पाहिजेत.

साधना म्हणजे काय ? जप जपायचा म्हणजे काय ? त्याने काय होते ? साधना कशी करायची ? हजारो माळा जप केला तरी फळ मिळत नाही. जपामध्ये दिवस रात्र स्वतःला गुंतवले पण तरीही काहीही लाभले नाही. मग जप का करायचा ? जप करणे म्हणजे वेळ फुकट घालवण्याचा प्रकार आहे. हे व असे अनेक प्रश्न साधकांना पडतात. अशाची उत्तरे मिळत नाहीत. पण आपण श्रद्धेपोटी साधना करत राहातो. जप जपत राहातो. देवधर्म करत राहातो. तीन-चार तास रांगेत राहून देव दर्शनाचा लाभ मिळावा अशी आशा करत राहातो.

गाभाऱ्यात जाऊन देव दर्शन मिळावे अशी आशा धरतो. यावर आंदोलनेही करतो. पण तरीही आपणास देव भेटल्याचे समाधान मिळत नाही. अशी अवस्था आपली होते. नुसते तोंडात जप म्हणायचे आणि मन मात्र इतरत्र गुंतवायचे म्हणजे साधना नाही. मनातील विचार थांबायला हवेत. जपावर ध्यान केंद्रित व्हायला हवे. लाभ मिळेल की नाही याचा विचार येथे करायचा नसतो. लोभाने मनाचे समाधान ढळते. हे लक्षात घ्यायला हवे.

भक्तीमध्ये जे मिळेल त्यावर तृप्त व्हायचे असते, समाधानी व्हायचे असते. तरच भक्तीची गोडी वाढते. देवाचे दर्शन झाले नाही. शिखराचे दर्शन तरी घेऊन समाधानी व्हायचे असते. आपल्याकडे तशी परंपरा आहे. गर्दीमुळे देवळात जाता आले नाही तर शिखराचे दर्शन घेऊन घरी गेले तरी समाधान मिळते. साधनेत तृप्त व्हायला शिकायला हवे. जे मिळाले त्यात समाधान मानायला हवे. तृप्त मन, समाधानी मनच आपला आध्यात्मिक विकास साधू शकते.

साधनेत अनेक प्रश्न पडतात. त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर साधनेतून मन उठते. पुन्हा साधना करण्याची इच्छाही होत नाही. असे होत असेल तर नेमके कोठे चुकते याचा अभ्यास करायला हवा. साधना कशी करायची ? हे समजून घ्यायला हवे. सद्गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप म्हणजे साधना. पण हा जप कसा करायचा हे समजून घ्यायला हवे.

सोऽ हमचे स्वर मनाच्या कानांनी ऐकायला हवेत. म्हणजे मन त्यात रमवायला हवे. सोऽहमचे बोल बुद्धीच्या डोळ्याने पाहायला हवेत. अशी साधना करायला हवी. सद्गुरुंनी दिलेल्या मंत्राचा चित्त देऊन आस्वाद घ्यायला हवा. असा जप केला तर साधनेचे फळ निश्चितच मिळेल. साधना सफल होईल. आत्मज्ञानाची दारे उघडली जातील. चित्त देऊन याचा मोबदला आपण घ्यायचा असतो. आस्वाद घ्यायचा असतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading