बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर म्हणजे झाडीपट्टीतील एक ज्ञानतपस्वी आणि अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व ! लेखनमग्नता आणि उपक्रमशीलता अशा दोन्ही अंगांनी त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व बहरले आहे. त्यांच्या एकूण १०५ ग्रंथांमध्ये कथा, कविता, एकांकिका आणि नाटक या ललित प्रकारांसोबतच भाषाशास्त्र, लोकसाहित्य, संशोधन आणि कोशवाङ्मय अशा विविध ललितेतर विषयांचाही समावेश आहे.
मोबाईल – ८६५७०४९५०७
डॉ. तीर्थराज कापगते
जगातील ६७० स्थानिक भाषांपैकी सुमारे ४० टक्के भाषा आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक दोन आठवड्यांनी एक भाषा मरत असताना आपल्या मराठीबद्दलही चिंता वाटणे साहजिक आहे. आज अशी चिंता आपण प्रकर्षाने करतो ; पण सुमारे पंचेवीस- तीस वर्षांपूर्वी या समस्येच्या मुळाशी जाऊन ‘भाषेतील बोलींचे संवर्धन केल्याशिवाय भाषा वाचणार नाही,’ असे सिद्धांतसूत्र डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी मांडले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर बोली आंदोलन सुरू केले ; आता तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील बोलींनाही पूर्ववैभव प्राप्त करुन देण्याचा ध्यास डॉ. बोरकरांनी घेतला आहे. त्यासाठी त्यांची विविध उपक्रमांमधून देशभर भटकंती सुरू असते.
‘साहित्य गोष्टीं’ च्या निमित्ताने राजस्थानातील भिलवाडासह उत्तराखंडातील भीमताल, उत्तरकाशी, अल्मोडा, नैनिताल आदी ठिकाणी ते जाऊन आले. ‘इंटरनॅशनल रायटर्स फेअर’च्या विद्यमाने विविध राज्यांतील संगोष्टींमध्ये ‘बोली वाचवा, भाषा वाचवा’ या घोषणेचा ते साधार प्रचार करीत असतात.
स्थानिकभाषा किंवा मातृभाषा ही नदीच्या पात्राप्रमाणे समृद्ध दिसत असली तरी, त्या लोकमातेला बोलीभाषांचे विविध प्रवाह जीवनरस पुरवत असतात. त्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक संचित, लोकसाहित्य, लोकरंगभूमी, लोककला आणि लोकपरंपराही आपल्यासोबत ते प्रवाह वाहून आणतात. हे प्रदेश विशेषत: ग्रामीण असतात. बोलीतील शब्दासंपदा जिवंत असते कारण त्यां शब्दांमध्ये अस्सल जीवनानुभव अभिव्यक्त झाले असतात. जीवनरीतींचे सत्त्व पिऊन ती निर्माण झालेली असते. त्या शब्दशैलीत बोलीची सारी आंतरिक शक्ती, तिच्यातील संवादक्षमता आणि मोहक सौंदर्य एकवटले असते.
मराठी भाषेला सुंदर करणाऱ्या अनेक बोली आहेत. त्यापैकी विदर्भात अतिपूर्वेला झाडाझुडपांच्या हिरव्याकंच अशा झाडीपट्टीत बोलली जाणारी ‘झाडीबोली’ ही एक बोली. अतिप्राचीन काळापासून हा प्रदेश ‘झाडीमंडळ’ म्हणून ओळखला जातो. नाटककार भवभूतींचे वास्तव्य, आद्यकवी मुकुंदराजांची झाडी शब्दवेचणी आणि सर्वज्ञ चक्रधरांची भटकंती यांचे संचित या भूप्रदेशाला आहे. पण ही बोली दुर्लक्षित होती. साहजिकच बोलीसोबतच ती बोली ज्या प्रदेशात बोलली जाते तो प्रदेशही दुर्लक्षिला जातो.
डॉ. बोरकरांनी या प्रदेशाची आणि बोलीची अस्मिता पहिल्यांदा जागृत केली. सुमारे पस्तीस वर्षे झाडीबोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास करुन पी.एचडी. पदवी संपादन केली. झाडीबोली साहित्य चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. त्या चळवळीच्या माध्यमातून झाडीबोलीतील दडपलेले सौंदर्य आणि सामर्थ्याचे हुंकार पहिल्यांदाच अभिव्यक्त होऊ लागले. ‘मराठी बोली साहित्य संघ’ आणि ‘ झाडीबोली साहित्य मंडळ’ या दोन्ही संस्थांचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. बोरकरांच्या कुशल नेतृत्त्वात आजपर्यंत सहा राज्यस्तरीय ‘ मराठी बोली साहित्य संमेलने’ आणि सव्वीस ‘झाडीबोली संमेलने’ यशस्वीरीत्या पार पडली.
डॉ. हरिश्चंद्र बोरकर म्हणजे झाडीपट्टीतील एक ज्ञानतपस्वी आणि अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व ! लेखनमग्नता आणि उपक्रमशीलता अशा दोन्ही अंगांनी त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व बहरले आहे. त्यांच्या एकूण १०५ ग्रंथांमध्ये कथा, कविता, एकांकिका आणि नाटक या ललित प्रकारांसोबतच भाषाशास्त्र, लोकसाहित्य, संशोधन आणि कोशवाङ्मय अशा विविध ललितेतर विषयांचाही समावेश आहे. १६७ पुस्तकांना प्रस्तावना लिहिणाऱ्या बोरकरांच्या प्रकाशित लेखांचा आकडाही पाचशेच्यावर आहे.
दंडार, खडीगंमत आणि डहाका या विदर्भातील उपेक्षित लोककलांवर संशोधन करून त्यांनी मराठी आणि हिंदीतही प्रथमच ग्रंथ प्रकाशित केले. आणि उदयपूर आणि अलाहाबाद येथे दंडार आणि खडीगंमत ही लोकनाट्ये सादर केली. मुंबईतील ९८ व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनात दंडार सादर करुन लोकसाहित्याच्या इतिहासात त्यांनी नवीन विक्रम नोंदविला. ‘डहाका’ या गायन प्रकाराला नवीन रूप देऊन त्यांनी निर्मिलेला ‘खडा डहाका’ लोककलावंतांना आर्थिक बळ देणारा ठरला. ‘खडीगंमत’ या कलाप्रकालाही त्यांनी तमाशाच्या जोखडातून मुक्त केले व तिला शासकीय अनुदानाचा मार्ग मोकळा करुन दिला ; आजपर्यंत १२० च्यावर खडीगंमत सादर करणाऱ्या मंडळांना त्या योजनेचा आर्थिक लाभ घेता आला. अखिल भारतीय लोककला महासंघाचे उपाध्यक्ष या नात्याने लोकनाट्यांसाठी गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये नित्य भ्रमंती करणारे ते एक अवलिया लोककलावंत आहेत.
ते स्वत: उत्कृष्ट नाट्यकलावंत असून नाट्यक्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार असे विविधांगी आहे. त्यासाठी त्यांना स्मिता पाटील नाट्यपुरस्काराने गौरविण्यात आले. फिरत्या रंगमंचाचा पर्याय असलेल्या ‘जुळ्या रंगमंचा’चे ते जनक आहेत. शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांनी चारवेळा सन्मानित झालेल्या डॉ. बोरकरांना अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. विदर्भ संशोधन मंडळाने त्यांना ‘संशोधन महर्षी’ या मानद पदवीने सन्मानित केले. ‘अटल सन्मान’ पुरस्कारही त्यांना मिळाला.
महाराष्ट्र शासनाने संशोधन व बोली संवर्धनाच्या कार्यासाठी अतिशय मानाचा ‘मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार’देऊन डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा गौरव केला. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्थानिकभाषा वर्ष म्हणून घोषित केले होते. भाषा आणि बोलींची आयुष्यभर उपासना करणाऱ्या या बोलीमहर्षींचा आंतरराष्ट्रीय स्थानिकभाषा वर्षात ‘अमृतमहोत्सव’ साजरा झाला. हा किती वैशिष्ट्यपूर्ण योगायोग होता.