नवरात्रौत्सव ३
ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!
नागपूरस्थित अरूणा सबाने यांचेविषयी एका वाक्यात बोलायचे झाले तर- ‘दि ग्रेट मॅन.. अरूणाताई..’ हो, मॅनच…त्या एक लेखक, संपादक, प्रकाशक, समुपदेशक आहेत..पुरूषवाचक शब्द वापरणाऱ्या.. इंदिरा गांधींना पोलादी पुरूष म्हणत. आज अशा काही महिला पुरूषी बाण्याने, धाडसाने काही करत आहेत. ताई त्यांपैकी एक..!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244
विदर्भातील प्रसिध्द लेखक अरुणा सबाने पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत, त्या एक लेखक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून. ताईंचे ‘सूर्य गिळणारी मी’ हे आत्मकथन सध्या गाजते आहे. ते वाचताना ताईंनी किती व कसं सोसलं असेल याची कल्पनाच केलेली बरी..! असं वाटून जातं. एक चळवळीतील सामाजिक कार्यकर्ती, उत्तम लेखक, वक्ता हे का सहन करते ? असा विचारही क्षणभर मनात येतो पण त्याच वेळी अशा चळवळीतील अनेकींची आत्मकथन पहाताना हे लक्षात आले की, ज्यांना विचार आहे, ज्या महापुरूषांचे विचार समजून घेतात, ज्या मुलांचा व कुटुंबाचा विचार करतात त्या आजच्या पिढीसारखा झटपट ‘घटस्फोट’ घेत नाहीत. त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाल्यावर त्या नवरा सोडायचा निर्णय घेतात.
श्रीमंतीत जन्म व बालपण, उत्तम शिक्षण, महाविद्यालयामधे असताना घरच्यांना पसंत नसतानाही झालेला चळवळीतील तरूणाशी प्रेमविवाह, नोकरीची धडपड, श्रीमंतीतून एकदम गरीबीत संसार, त्यातून होणारी चीडचीड, लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपताच पतीची संशयी नजर, त्यातून प्रचंड मानसिक व शारीरिक छळ, त्यातच एक मुलगा.. दोन जुळ्या मुली.. त्यांचे संगोपन, शिक्षण, लग्न.. त्यासाठी अरूणाताईंनी केलेली धडपड, १७ वर्षांनी झालेला घटस्फोट, मुलांचे प्रचंड मानसिक हाल, जगण्यासाठी केलेले छोटे छोटे व्यवसाय, बदललेली घर, मुलींचे वसतिगृह, वृत्तपत्रासाठी केलेले कष्ट, लेखनातून संपादन व प्रकाशन व्यवसाय, आकांक्षा प्रकाशनाचा जन्म, स्त्री प्रश्न व चळवळीला वाहिलेले आकांक्षा मासिकाचे गेल्या २५ वर्षाचे सातत्य, फ्लॅट, बंगला, चारचाकी गाडीचा अनुभव, पहिला विमान प्रवास, पेपर वाचनासाठी परदेशी जायची संधी, माहेर संस्थेचे अवघड काम, वेश्यांचे प्रश्न, अनेक महिलांना अत्यंत अवघड परिस्थितीतून बाहेर काढून एक नवे आयुष्य देतानाची धडपड, त्यासाठी केलेला संघर्ष, जलसाहित्य संमेलनाची नवी ओळख, विविध साहित्यिकांचे संघटन, सामाजिक व साहित्यिक प्रचंड काम.. हा अरूणाताईंचा कामाचा आलेख पाहिला तर आपण चक्रावून जातो.
स्वतः स्वतःच्या प्रश्नात असताना इतरांचे प्रश्न सोडवण्याचे धाडस व मानसिक धैर्य निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही पण या जिद्दी बाईने कुठून एवढं बळ निर्माण केलं असेल ? असं सतत वाटत रहाते. अनेकदा सामान्य महिला रडत कुढतच आयुष्य घालवतात. म्हणूनच काही महिला या असामान्य ठरतात. प्रसंगी त्या दुर्गेचा अवतार घेतात. आयुष्यातील संकटांना खंबीरपणे सामोरे जातात.
आज आयुष्यातील या टप्प्यावर त्या म्हणतात – ‘आयुष्यातून एक माणूस वजा झाला म्हणून आज मी हे सारं करू शकले.’ या वाक्यातच त्यांच्या यशस्वी जीवनाचे सारं दडलंय असं मला वाटतं.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून माणसांशी, परिस्थितीशी झगडा देत, संघर्ष करत आपली वाट आपणच निर्माण करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपलं स्थान कसं निर्माण करता येत हे ताईंकडे पाहून शिकण्याजोगं आहे. आपले स्वत्व, अस्तित्व, आत्मसन्मान राखण्यासाठी ताईंनी केलेला संघर्ष हा चळवळीतील सर्वांसाठीच नव्हे तर सामान्य स्त्रीचे मानसिक बळ वाढवणारा ठरावा.
सत्यकथन सांगणे व लिहिणे ही सोपी गोष्ट नाही पण ते शिवधनुष्य अरुणा सबाने यांनी मोठ्या धैर्याने पेलले आहे. यामुळे महिलांना एक वेगळेच पाठबळ मिळाले आहे. कोणीतरी बोललं पाहिजे या भावनेतून त्यांनी आजवर त्यांचं सारं आयुष्य खुलेपणाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या महिलांना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांतून मार्ग काढायचा आहे त्यांनी अरूणाताईंचे ‘सूर्य गिळणारी मी..’ हे आत्मकथन जरूर वाचायलाच हवं..!
अरूणाताईंचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहाता कथा, कादंबरी, ललित, वैचारिक, संपादन अशी एकूण १९ पुस्तके प्रकाशित आहेत. विमुक्ता, मुन्नी, सूर्य गिळणारी मी या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी आजवर त्या ४० हून अधिक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचार या विषयावर त्यांनी विदर्भात सुमारे ५५ कार्यशाळा घेतल्या आहेत. ३ सेक्स वर्कर्सचे पुनर्वसन करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पेपर व निबंध वाचनासाठी भारतात दिल्ली, कोकण, बंगलोर, हैद्राबाद, भुवनेश्वर अशा अनेक ठिकाणी तर परदेशात जपान, नेपाळ, बॅंकॅाक अशा ठिकाणी जायची त्यांना संधी मिळाली आहे.
एक महिला काय व किती क्षेत्रात समर्थपणे काम करू शकते हे पाहाताना अरूणाताईंचे नाव पुढे येते. अशा सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या या नवदुर्गेला मानाचा मुजरा..!!
संपर्क – अरुणा सबाने मो. 99700 95562
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.