September 9, 2024
Work without expecting anyone's help Kings characters
Home » कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता राहावे कार्यरत
विश्वाचे आर्त

कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता राहावे कार्यरत

वन मॅन आर्मी प्रमाणे त्याचे व्यक्तिमत्त्व असते. एकट्यानेच सर्व आक्रमणे थोपवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते. सिंह जसा एकटाच सर्वांशी मुकाबला करू शकतो अन् अन्य वन्यप्राण्याचे रक्षण करत असतो. म्हणूनच सिंहाला जंगलचा राजा म्हटले आहे. अगदी तसेच व्यक्तिमत्त्व हे राजाचे असते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तरी भानू हा तेजें । नापेक्षी जेवीं विरजें ।
कां सिंहें न पाहिजे । जावळिया ।। ८५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – तर सूर्य हा प्रकाशाच्या बाबतीत जशी साहाय्याची अपेक्षा करत नाही, अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करत नाही.

क्षत्रियाचे स्वभावज कर्म, लक्षणे ज्ञानेश्वरांनी सांगितली आहेत. त्यातील हे पहिले कर्म, लक्षण आहे. क्षत्रियाला कोणत्याही, कोणाच्याही साहाय्याची अपेक्षा नसते. कर्म करताना कोणाची मदत मिळेल या आशेवर तो कधीही जगत नाही. कोणाची मदत मिळो न मिळो आपण आपल्या कर्माने, स्वकर्तृत्वाने समोरच्या परिस्थितीशी धैर्याने सामना करण्याची तयारी तो ठेवतो.

राजा हा सर्वसामान्य मनुष्याप्रमाणेच असतो, पण तो त्याच्यातील क्षत्रिय लक्षणांनी त्याचे वेगळेपण स्पष्ट होते. त्याचा स्वभाव, विचारसरणी, वागणे इतरांपेक्षा वेगळे असते. एका अष्टपैलु योद्धाची लक्षणे त्याच्यात पहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभु होते असे उल्लेख आत्मज्ञानी संतांनी केले आहेत. त्यांच्या कार्यामध्ये हे स्वयंभु लक्षण अफजलखानाच्या भेटीच्या प्रसंगात पाहायला मिळते. अफलजखान हा आपणाला बाहुंनी चिरडून मारण्याचा प्रयत्न करणार हे राजांनी आधिच ओळखले होते. यासाठीच त्यांनी आपल्या स्वरक्षणासाठी वाघनख्याचे शस्त्र लपवून ठेवले होते. दगाबाजी करणाऱ्यांचा कोतळा फाडण्याचे सामर्थ्य राजांच्याजवळ होते. या प्रसंगात राजे हे स्वयंभु होते हे स्पष्ट होते. यावरूनच समर्थ रामदास स्वामी यांनी राजांना जाणता राजा असे संबोधले आहे.

शत्रूशी दोन हात करण्याची तयारी सदैव ठेवावी लागते. कोणाचे सहकार्य मिळेल याची अपेक्षा न ठेवता नियोजन करण्याचे, धैर्याने परिस्थितीशी सामना करण्याचे सामर्थ्य असायला हवे. भारतीय संस्कृतीमध्ये राजा ही संकल्पना कशी अस्तित्वात आली याबाबत काही दंतकथा सांगितल्या जातात. पूर्वी देव आणि दानवांमध्ये वारंवार युद्ध होत असे. यात देवांचा विजय होत असे तर कधी दानवांचा विजय होत असे. एकदा दानवांनी देवांचा पराभव केल्यानंतर वारंवार होत असलेली पिछेहाट थांबवण्यासाठी देवांनी राजा या स्वतंत्र पदाची निर्मिती केली. देवांनी त्यांच्या रक्षणासाठी राजाची निर्मिती केली. प्राचीन ग्रंथामध्ये असे उल्लेख सापडतात. म्हणजेच दानवांशी युद्ध करण्यासाठी राजाची निर्मिती झाली. धर्म रक्षण, देवांचे रक्षण हे त्याचे प्रथम कर्तव्य होते.

जेंव्हा जेंव्हा पृथ्वीवर दानवांचा संचार वाढतो, तेंव्हा तेंव्हा धर्मरक्षणासाठी हा राजा प्रगट होतो. तज्ज्ञांच्या, अभ्यासकांच्या मते सातव्या शतकात बी. सी. या कालावधीत राजा या संकल्पनेचा उदय झाला. तेंव्हापासून सुरु असलेली ही संकल्पना भारतीय संस्कृतीत आजही पाहायला मिळते. सम्राट, छत्रपती. बाहुबली, महावीर हे यातूनच निर्माण झाले. त्यांनी केलेल्या कार्याची महती आजही गायिली जाते. त्यांच्या किर्तीचे पोवाडे आजही प्रजेला स्पूर्ती देत राहातात. एक विश्वास निर्माण करतात.

असा हा राजा कसा असायला हवा. सूर्याजवळ सदैव प्रकाश असतो. तो स्वयंप्रकाशित आहे. इतरांकडून प्रकाश मिळण्याची अपेक्षा तो ठेवत नाही. याप्रमाणे राजा हा सुद्धा सदैव कार्य तत्पर असतो. कोणत्याही कठीण परिस्थितीशी सामना करण्याचे सामर्थ्य तो ठेवतो. स्वयंभु लक्षणे त्याच्याजवळ असतात. स्वतः भक्कम असेल तरच तो इतरांचे संरक्षण करू शकेल. अन्यथा तो तसे करू शकणार नाही. वन मॅन आर्मी प्रमाणे त्याचे व्यक्तिमत्त्व असते. एकट्यानेच सर्व आक्रमणे थोपवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते. सिंह जसा एकटाच सर्वांशी मुकाबला करू शकतो अन् अन्य वन्यप्राण्याचे रक्षण करत असतो. म्हणूनच सिंहाला जंगलचा राजा म्हटले आहे. अगदी तसेच व्यक्तिमत्त्व हे राजाचे असते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

Saloni Art : चित्रातून लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी मधमाशी मित्रांची तुकडी तयार – राहुल रेखावार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading