April 1, 2023
Nitin Varankar Poem Board Exam
Home » बोर्डाची परीक्षा
कविता

बोर्डाची परीक्षा

😂बोर्डाची परीक्षा😂

आमच्या लहानपनी भाऊ
मस्त बोर्डाची परीक्षा होये
तिले बोर्डाची काहून म्हनत
हे आमच्या ध्यानात नाई ये ।।

जवा भाईरगावले गेलो मी
चौथीची परीक्षा द्यायले
तवा माल्या ध्यानात आलं
बोर्डाची काहून म्हनत तिले ।।

कंडक्टरची देखभाल निरा
जवायावानी केल्या जाये
मंग तं तो दिवसभर
वर्गात फिरूनबी ना पाये ।।

कंडक्टरचं म्हननं एकच होतं
बोर्डाचा वापर पासिंग पुरता ठेवा
पुरा पेपर लिहून देसान तं
माल्या घरावर गोटे येतिन बावा ।।

पेपर हाती येताच पोरं इचारत
गुरुजी पेपरात नाव कुठी लिवू
पयल्या वळीवरच लिवा गळेहो
आज मालं डोक्सं नका खावू ।।

पयल्या प्रश्नाचं उत्तर गुरुजी
मस्त फळ्यावर लिवून देत
अरधे उबार पोरं सारे
दुसऱ्या प्रश्नाखाली लिहून घेत ।।

हा ताल पाहून गुरुजी कसे
भळकून आमच्यावर जात
थांबा म्हनत भामट्याहो
माला दाखोतो तुमाले हात ।।

आमच्या खालीवर लिवन्यानं मंग
गुरुजीचं गनित बिघळून जाये
सालभऱ्याच्या मेहनतवर
सारं पानी फिरुन जाये ।।

दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जवा
फळ्यावर लिवनं सुरु होये
लटलट कापो आमी अन
फळ्यावर तानो आमचे डोये ।।

रिकाम्या जागा जोळ्या जुळवा
यासाठी बोर्ड होता हुकमी एक्का
बस त्याच्याच सहाऱ्यानं आमाले
पुळच्या वर्गात भेटत होता धक्का ।।

जो आंगचा हुशार राये
तो बाकीचा पेपर लिवे
त्याचाच पयला ये नंबर
पुळे त्याचेच लागत दिवे

परीक्षा ना विद्यार्थ्यांची होती
ना कोन्या गुरुजीची होती
सगळा ताल पाहून वाटे
परीक्षा बोर्डाचीच होती ।।

पयल्यासारखी मजा आता
मले कुठीच दिसत नाई
बोर्डाच्या परीक्षेची सर
आता आॕनलाईनले येत नाई ।।

✍🏼 नितिन वरणकार,
राजेश्वर काॕलनी, शेगाव, जि. बुलडाणा
9763247494

Related posts

कोजागिरीचं चादणं..

अनुभुतीचा विस्तार करणारी आजची कविता

पाऊस

Leave a Comment