October 4, 2023
Book Review of Madhav Jadhav book Vartmanache Facebook
Home » अंतर्मुख करायला लावणारा कथासंग्रह
काय चाललयं अवतीभवती

अंतर्मुख करायला लावणारा कथासंग्रह

चालता बोलता दैनंदिन जीवनात जगण्यातील घंट्या अर्ध्या घंट्यातील बारीक-सारीक किस्यांच्या किती सुंदर कथा होऊ शकतात हे माधव जाधव यांनी सिद्ध केले आहे. छोट्या छोट्या किस्यातून किती सुंदर उपदेश करता येऊ शकतो हे या कथा वाचून सहज कळते. एकंदरीत ताकत असणारे हे वर्तमानाचे फेसबूक आहे.

डॉ. भीमराव वाघचौरे

वर्तमानाचे फेसबुक हा लघुकथा संग्रह नेमकाच हातात पडला. सहज चाळावा म्हटलं आणि त्याच्या प्रेमात पडलो. एका बैठकीत वाचून पूर्ण केला. या संग्रहातून माधव जाधव यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीचं भावोत्कट मनोगत, वाट्याला आलेल्या व्यवसायात जीव ओतून कष्ट करून आलेल्या मोबदल्यात समाधान मानणारी भाजीवाली बाई, पुरुष प्रधान संस्कृतीत आईला वार्‍यावर सोडून सासूला जपणारा मुलगा, मुलांना दत्तक घेणारी समजदार माणसं, सोनबा मामाच्या गावात जपला गेला जीव्हाळा, कुछ कम नही साब म्हणत वयाच्या पंचाहत्तरीतही बेलफुलाचा व्यापार करणारी दादी, जमीन विकून डामडोलात लग्न करणारा घाट्यातला पाटील, हे भेटी गाठीचं केंद्र व्हय मधील कौशल्याने लाखो रुपये कमावणारा सलूनवाला, जेईई आणि नीट परीक्षेत दमछाक होत असलेला पालक वर्ग, एवढं खूप झालं साहेब म्हणत आनंदानं जगणारा ड्रायव्हर मामा, कोरोनाकाळात गरीबीत जगणाऱ्या भांडेवाली मावशीचे मनोविश्व, कोरोना काळातील हतबलता आणि मानसिक दडपण, मतदान प्रक्रियेच्या मतदान निमित्ताने हाताळलेले विविध प्रश्न या साऱ्याच बाबी अगदी सहजपणे वाचकांच्या समोर ठेवून वाचकाला अंतर्मुख केले आहे.

एकूणच अत्यंत छोटेखानी उत्सुकता वाढणाऱ्या एकदा वाचाव्या अशाच या कथा आहेत. अत्यंत छोट्या छोट्या आणि आजवर साहित्यात न आलेल्या अगदी नव्या विषयावर अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या या कथा आहेत. त्याच बरोबर पाल्हाळीकपणाला बगल देत नेमकेपणा आणि नेटकेपणा जपलेल्या नेमक्या शब्दातील सकस कथांचे हे फेसबुक होय.

चालता बोलता दैनंदिन जीवनात जगण्यातील घंट्या अर्ध्या घंट्यातील बारीक-सारीक किस्यांच्या किती सुंदर कथा होऊ शकतात हे माधव जाधव यांनी सिद्ध केले आहे. छोट्या छोट्या किस्यातून किती सुंदर उपदेश करता येऊ शकतो हे या कथा वाचून सहज कळते. एकंदरीत ताकत असणारे हे वर्तमानाचे फेसबूक आहे.

पुस्तकाचे नाव – वर्तमानाचे फेसबुक
लेखक – माधव जाधव (९४२३४३९९९१)
प्रकाशक – संस्कृती प्रकाशन पुणे
मूल्य 120 रुपये

माधव जाधव हे प्रखर समाजभान असलेले लेखक आहेत. कारणपरत्वे दैनंदिन जीवनात भेटणाऱ्या माणसांचे ते सजगपणे वाचन करतात, त्यांच्या अंतरंगात प्रवेश करतात. वर्तमानातील अनेक जटिल प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधणारे छोटे छोटे प्रसंग या लेखनातून मांडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांची बेकारी, कोरोना काळातील लग्ने, स्वतःच्या जीवावर उदार होऊन जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उभे राहणारे पोलीस, वार्धक्यात आई-वडिलांना न विचारणारी मुले, स्वतःची जमीन नसतानाही खंडाने जमीन कसणारे शेतकरी, कष्टाळू जोडपे, स्वयंरोजगार शोधणारे तरुण, इज्जतीचा डामडौल दाखवून कर्जात झिडकणारे शेतकरी, आजही स्त्रिया-वृद्ध व महिला यांना निवडणुकीत मत देता न येणे. लॉकडाऊनच्या काळात होणारी उपासमार आणि निर्माण झालेले अनेक प्रश्न, वैध काय आणि अवैध काय हे न कळणारी जगण्याच्या धडपडीत निर्माण होणारी अवस्था इत्यादी. या लेखनात लक्षणीय आहे. ती लेखकाची सकारात्मकदृष्टी. वाचलेच पाहीजे असे हे वर्तमानाचे फेसबुक लेखकाचे आकलन, चिंतन, निरीक्षण यांना दाद द्यावी असेच आहे.

डॉ. वासुदेव मुलाटे

Related posts

झाडीबोलीची चळवळीचे आम्ही भोई…

हरिश्चंद्राची फॅक्टरीः झाडीबोली साहित्य चळवळ समृद्ध करणाऱ्या जीवनयोध्याचा प्रवास

Neettu Talks : राग घालवायचा आहे, मग हे करून पाहा…

Leave a Comment