पुणेः महाराष्ट्रातील यशस्वी वाटचालीनंतर कॉम्पीटीटर्स फाउंडेशन आगामी काळात सामाजिक व शैक्षणिक कार्य अधिक व्यापक करून राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भुगोल विभागाच्या सभागृहामध्ये पार पडली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या सभेत नव्या कार्यकारिणीची निवड झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी माजी अप्पर जिल्हाधिकारी शरद जाधव यांची तर प्रा. डॉ. रवींद्र जायभाये यांची उपाध्यक्षपदी, अॅड. विठ्ठल देवखिळे यांची सचिवपदी तर खजिनदारपदी प्रा. मनोज मते यांची निवड करण्यात आली.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून दुर्लक्षित उपेक्षित घटकांसाठी काम करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयातील या माजी विद्यार्थ्यांनी 2016 कॉम्पीटीटर्स फाउंडेशनची पुण्यात स्थापना केली. स्पर्धा परीक्षार्थांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, आर्थिक दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप, डोंगराळ व आदिवासी भागासाठी रुग्णवाहिका संस्थेतर्फे देण्यात आली. अनेक गरीब विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, कोरोना काळात करोनाग्रस्त रुग्णांना आर्थिक व मदतीच्या स्वरुपात मदत, दौंड येथे पोलिस अकादमीच्या सहकार्याने ५००० वृक्षलागवड फुलेनगर, खडकी, बीआरटी, येरवडा झोपडपट्टी मधील मुलांना दररोज एकवेळ नाश्त्याची सोय अशी अनेक कामे फाउंडेशनने अल्पावधीत केली. हेच कार्य आता अधिक व्यापक स्वरूपात केले जाणार आहे.
संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयकुमार भोसले (सह. संचालक सहकार विभाग) यांनी पाच वर्षाच्या कालवधीतील विविध कामांचा इतिवृत्तांत सभेपुढे मांडला. रवींद्र वायाळ यांनी संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला. प्रा. मनोज देवने यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेतील विविध ठराव मांडले. नुतन अध्यक्ष शरद जाधव यांनी संस्थेच्या पुढील पाच वर्षाचा कामाची ब्लू-प्रिंट सभेपुढे मांडली तसेच संस्थेचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे त्यांनी संस्थेच्या सभासदांना आश्वासित केले.
सन 1990 ते 2000 या कालावधीत स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचे पेव फुटण्याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील जयकर ग्रंथालय हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रमुख केंद्र होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या स्तरांतून आलेले विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत असत. उतुंग यश मिळवून बहुसंख्य विद्यार्थी देश पातळीवर आएएस, आपीएस, वकील, न्यायाधीश, प्राध्यापक, उद्योजक, कृषी तसेच इतर विविध प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत.
सभेमध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, झोपडपट्टी पुनर्विकास मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर ( कोल्हापूर ), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा न्यायाधीश चंद्रकांत दातीर, माजी न्यायाधीश शरद मडके, परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने, माजी उपजिल्हा अधिकारी मुकुंद राठी, परिवहन निरिक्षक महेश पवार, डॉ. जयदीप निकम, डॉ. बाळासाहेब केंदळे, संदीप भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. रवींद्र जायभाये यांनी तर आभार प्रा. मनोज मते यांनी मानले.