December 9, 2024
Traditional study and remedies To Control Flood article by Mahadev Pandit
Home » महापुर नियंत्रणासाठी पारंपारिक अभ्यास अन् शास्रीय उपाय
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महापुर नियंत्रणासाठी पारंपारिक अभ्यास अन् शास्रीय उपाय

लोकनायकांचा पुराचा अभ्यास खूप मोठा व पारंपारिक पद्धतीवर असायचा. नदी आपले पात्र सोडून थोडीशी जरी पात्राबाहेर आली तर नदीच्या तीरावर गाळ साठतो आणि त्याला गावरान भाषेत कातोर म्हणतात. ह्या कोतोऱ्याच्या अभ्यासावर गावाचे स्थलांतर किंवा वस्तीकरण होत असे.

महादेव पंडीत

स्थापत्य अभियंता
९८२००२९६४६

आपल्या नियमित ऋतुमानाप्रमाणे जून ते सप्टेंबर हा सर्वसाधारण पावसाळ्याचा पारंपारिक कालाखंड आहे. ह्या नियमित पावसाळ्यात सुरुवातीला तसेच पावसाळा संपल्यावर सुध्दा काहीवेळा काही भागात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतो. जोरदार वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामध्ये बरेच नुकसान होते. परतीचा हा पाऊस सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये पडतो. यामुळे चार महिन्याच्या पावसाळ्या व्यतिरिक्त पाच महिन्याचा कालावधी पकडूनच आपत्ती निवारणाचे काम हाती घेतले तरच गोरगरिबांचे आजचे होणारे हाल टाळता येईल.

आज निसर्गसुध्दा आपल्या राजकारण्यासारखेच वागू लागला आहे. जसे काही राजकारणी लोक कोणालाही काहीही पत्ता लागू न देता एका रात्रीत पक्ष बदलतात त्याचप्रमाणे अगदी निसर्ग सुध्दा काही भागात अगदी अचानक ढगफूटी करून महाप्रलयांचा भयंकर अवतार घेतो. खरेतर आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ढगफूटी सारख्या घटनांचा सुध्दा अंदाज बांधता आला पाहिजेत आणि यासाठी वातावरणाचा अचूक व तंतोतंत अभ्यास करणारी प्रयोग शाळा व त्यांची कार्यप्रणाली अगदी त्वरीत आंमलात आणली पाहिजे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती खुप महत्वाची आहे.

आज पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अगदी छोट्या छोट्या संस्थांपासून ते सर्व राजकीय पक्ष आपली फक्त आणि फक्त प्रतिष्ठा वाढविण्यासाठी खूप धावाधाव करतात पण त्यावर कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्यासाठी अगदी बॅकफूटवर जातात. फक्त धान्य, कपडे, बिस्कीटे, वॉटर बॉटल व पैसे देऊन झालेले नुकसान व जीवीतहानी कधीही भरून काढता येत नाही. तसेच अगदी प्रेमाने बाळगलेली असंख्य मुकी जनावरे या महापुरात वाहून जातात. त्यांच्या हानीमुळे बळीराजावर झालेले मानसिक नुकसान कधीही भरून काढता येत नाही.

त्याचप्रमाणे जीवापाड मेहनतीने वाढविलेले भाजीपाला, अन्न – धान्ये तसेच काही अनमोल भेटवस्तू इत्यादींचे नुकसान कधीही व कोणीही भरून काढू शकत नाही, हे सर्व सर्वांना माहीत असूनही अगदी माकडाच्या घराप्रमाणे दरवर्षी पुराच्या पंधरवड्यात नद्यांचे सर्वेक्षण करू, अनेक ठिकाणी भिंती बांधू, मार्गदर्शक बोर्ड लावू अशा नानाविध घोषणा करायच्या आणि नंतर येरे माझ्या मागल्या प्रमाणे वागायचे याला काय म्हणायचे ?

गेल्या पंधरा वर्षात 26 जुलै 2005, 7 व 8 ऑगस्ट 2019 व 22 ते 25 जुलै 2021 असे तीन वेळा कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, चिपळूण, महाड, कल्याण, बदलापूर, उल्हासनगर इत्यादी शहरांना महापूराचा खूपच तडाखा बसला आहे. या तीन मधील पहिल्या दोन्ही वेळेला असंख्य घोषणा होऊन सुध्दा आज 2021 ला खूपच महाभयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे, मग सरकारचे नियोजन अपयशी झाले का ? कि सरकारी घोषणा फक्त कागदावरच विरल्या ? आदी शंकाकुशंका मनात घर करून बसतात. मग या नुकसानीला जबाबदार कोण ? निसर्गाचा कोप, बेजबाबदार नागरिक की दिशाहीन व कर्तव्यशून्य सरकार ? खरे पाहिलेत तर वरील तीनही घटक 33 टक्क्याचे मानकरी आहेत असेच आज संबोधने सार्थ ठरते.

महापूरानंतर मोठ्या नद्यांचे सर्वेक्षण होते आणि त्यानंतर धोक्याची अशी रेड लाईन मार्क होते, पण आपले आजचे सुशिक्षित नागरीक रिव्हर व्ह्यु ह्या गोंडस शब्दाच्या आहारी जाऊन पूर नियंत्रण रेषेच्या आतील बाजूस उभ्या राहाणाऱ्या मनमोहक अपार्टमेंटमध्ये घर घेतात किंवा तेथील प्लॅाटवर बंगला बांधतात. मग ह्याची जबाबदारी सरकारवर टाकणार का ? खरंच नाही. मग अशा पूर नियंत्रण रेषेचे काम नदीवर निश्चित झालेले असताना सुध्दा आपली महानगरपालिका तसेच नगरपरिषद किंवा जिल्हा परिषद पूर नियंत्रण रेषेच्या आतील बांधकामाच्या प्रस्तावांना मंजुरी देते त्याचप्रमाणे पूर नियंत्रण रेषेच्या आत झालेल्या बांधकामांना अभय देते. मग आता चूक कोणाची ? सरकारची, पण ही बाब आज सरकार मान्य करते का ? नाही.

आता मुद्दा राहीला निसर्गाचा कोप. निसर्ग नेहमीच समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. तो आज त्याचप्रमाणे जूलै २००५ व २०१९ ला फक्त सांगली, कोल्हापूर, सातारा, चिपळूण व महाडवर रागावला होता असे होत नाही. निसर्ग नेहमीच सर्वांवर प्रेम करतो. पंधरा दिवसापूर्वी जर्मनीमध्ये सुध्दा अचानक पाऊस झाल्यामुळे खूपच जीवहानी व नुकसान झालेले आहे. नवनवीन तंत्रज्ञानासाठी व प्रगतीसाठी आज मानवाला काही जीवनाश्यक प्रकल्प साकारावे लागतात. त्यामध्ये सागरी सेतू किंवा भुयारी मार्ग, तळघरे, वीज निर्मितीसाठी डोंगरावर पवन चक्क्या, पाण्यासाठी मोठ मोठाली धरणे, कालवे ह्यांचा समावेश होतो. ह्या सर्व प्रकल्पामध्ये निसर्गाचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कदाचित समतोल बिघडत असेल पण आज मानवाच्या प्रगतीसाठी असे प्रकल्प करणे अत्यंत गरजेचे आहे आणि भविष्यात थोडीफार निसर्गहानी होणारच हे प्रत्येकाने गृहीत धरले पाहिजेत, म्हणजेच आपणाला निसर्गाला जबाबदार धरता येणार नाही. निसर्गाचा व हवामानाचा अचूक अभ्यास करूनच त्यावर तोडगा काढणे हेच अत्यावश्यक आहे.

साधारण पावसाळ्याच्या कालावधीत पहिली पाच ते सहा नक्षत्रे शेतकऱ्यांसाठी लाभदायक असतात म्हणजेच पावसाळ्यातील पहिले 90 दिवस आपत्ती निवारणाची अत्यंत निकड भासते. सर्वात पहिले रोहीणी नक्षत्र त्यानंतर मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य व आश्लेषा. अगदी अनादी कालापासून पहाल तर आपणास कळेल की या सर्व नक्षत्रांची नावे ही पंचागीय पद्धतीप्रमाणेच पण पारंपारिक नावे कशी आलेत ते पहा.

रोहीणी नक्षत्र व मृग नक्षत्रात नैसर्गिक पध्दतीने पेरणी होते. नंतर आर्द्रा नक्षत्रामध्ये त्या पिकांची योग्य अशी मशागत, भांगलण व कोळपणी नंतर त्या पिकांना पुनर्वसू नक्षत्रात तारूण्य लाभते व नंतर ती पुष्य नक्षत्रात परिपक्व होतात आणि याच पिकांच्या आयुर्मानाप्रमाणे प्रत्येक पावसाळी नक्षत्रांना सुध्दा पारंपारिक नावे प्रचलित आहेत. पुनर्वसू व पुष्य ही दोनच नक्षत्रे खूपच उपयुक्त पाऊस देतात आणि बळीराजाचे पिकांचे स्वप्न साकारतात. पण काही वेळा मानवनिर्मित कार्यामुळे तर काही भागात पूरांमुळे त्या भागातील शेतकऱ्यांची स्वप्ने उध्दवस्त होतात.

पुनर्वसू नक्षत्रात पिकांचे तारुण्य बहरात येते. त्यामुळे पारंपारिक भाषेत पुनर्वसूला तरणा पाऊस म्हणतात आणि पिके पुष्य नक्षत्रात परिपक्व होतात म्हणून त्या पावसाला शेतकरी म्हातारा पाऊस म्हणतो. तरणा म्हातारा पाऊस बरोबर जुलैमध्ये बरसतो आणि त्याचा कालखंड 30 दिवस असतो. पूर्वी सर्वेक्षण ही कार्यप्रणाली अस्तित्वात नव्हती तरीसुद्धा काही गावे अगदी नदीच्या काठावर व्यवस्थित वसलेली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज ह्याच्या कालावधीत पुरात अतोनात नुकसान झाल्याचे ऐकीवात नाही तसेच इतिहासात तसा उल्लेख दिसत नाही, मग ते महापूर कसे रोकायचे ? शिवाजी महाराजांनी तर हाय फ्लड लेवलच्या कितीतरी पट वर आपले वास्तव्य ठेवले होते. कोल्हापूर संस्थानमधील शॉलिनी पॅलेस, जुना राजवाडा इत्यादी वास्तू पुराचा योग्य व अचूक अभ्यास करूनच बांधल्या आहेत. आज सुध्दा त्यांना पुराचा तडाखा बसलेला नाही. पण ह्या लोकनायकांचा पुराचा अभ्यास खूप मोठा व पारंपारिक पद्धतीवर असायचा. नदी आपले पात्र सोडून थोडीशी जरी पात्राबाहेर आली तर नदीच्या तीरावर गाळ साठतो आणि त्याला गावरान भाषेत कातोर म्हणतात. ह्या कोतोऱ्याच्या अभ्यासावर गावाचे स्थलांतर किंवा वस्तीकरण होत असे.

पारंपारिक शेतकरी भाषेमध्ये तरणा व म्हातारा पावसामध्ये एक प्रेमळ अनुभवी चढाओढ असते अशी पारंपारिक म्हण आहे. वृद्धांकडून आपल्याला जशी अनुभवाची शिदोरी मिळते अगदी त्याच धर्तीवर तरण्याकडून म्हाताऱ्या पावसाला व म्हाताऱ्या पावसाकडून पुढील वर्षी तरण्या पावसाला शिकवण मिळते. पुनर्वसू नक्षत्रांत नदी पात्रा बाहेर आल्यानंतर त्यापेक्षा जास्त नदी पुष्य नक्षत्रात पात्राबाहेर येते. तरण्याच्या कातोर म्हातारा उचलतो असे पूर्वीचे लोक म्हणतात म्हणजेच पारंपारिक पध्दतीमध्ये पुनर्वसू पेक्षा पुष्य नक्षत्रात पाऊस जास्त पडतो हे लक्षात ठेवले पाहिजे. आज बेटा बाप से सवाई, तर निसर्गात मुलापेक्षा आजोबा सरस अशी परिस्थिती होत होती याचा विसर पडलेला आहे.

नव्या दमाच्या तरण्या पावसापेक्षा परिपक्व व दमदार म्हातारा पाऊसच शेतकऱ्याला उपयोगी पडतो पण आज मानवनिर्मित अडथळ्यामुळे पुष्य नक्षत्रातील पाऊस अति नुकसानीचा वाटतो. नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी काही नैसर्गिक प्रक्रिया आज सुध्दा चालू ठेवल्या पाहिजेत. पूर्वी बांधकामांना लागणारी वाळू नदीतून काढली जात असे. डोंगर दऱ्यांमध्ये, टेकड्यांवर पाऊस पडतो. नाले, ओढे वाहतात. मऊ दगडांची तापमानामुळे झीज होते आणि या झीज ह्या नैसर्गिक कार्यप्रणालीमुळे दगडापासून नैसर्गिक वाळू तयार होते आणि ही वाळू पावसाच्या लोंढ्यासोबत नदीमध्ये तसेच सखल भागात जमा होते. ही वाळू बांधकामास खूपच उपयोगी ठरते. पण आज सरकारने नदीमधील वाळू उपसा पूर्णपणे बंद केलेला आहे. त्यामुळे आज नदी पात्रे वाळूच्या साठवणुकीमुळे भरत आहेत आणि नदी पात्र दरवर्षी १ टक्के भरले तर पुढील १०० वर्षात महापूर शहरे व गावे गिळंकृत करतील आणि म्हणूनच वाळू उपसा व वापर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया बंद न ठेवता नियोजित पध्दती प्रमाणे चालू ठेवणे महापूर रोकण्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल. नदीपात्रातून वाळू उपसा कसा करायचा व कधी करायचा व किती प्रमाणात करायचा याचे योग्य नियोजन व मार्गदर्शन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे काही प्रमाणात महापूर रोकणे शक्य होईल व नागरिकांची महापुराच्या कालावधीतील ससेहोलपट काही प्रमाणात थांबेल.

खरेतर आज धरणामुळे अनेक महापूरांची तिव्रता रोकता येणे शक्य झाले आहे. धरण हे शेतकऱ्याला मिळालेले मानव निर्मित वरदानच आहे. धरणामुळे शेतकऱ्याला तसेच मानवाला, पक्षांना व प्राणी मात्रांना बारमाही पाणी मिळू लागले आणि त्यामुळे त्यांचे जीवन आजपर्यंत टिकून आहे व नैसर्गिक समतोल टिकून आहे. धरणे ही मानवासाठी वरदान तर आहेच पण आज निसर्गासाठी शापच आहे याचे कारण म्हणजे धरणामुळे शेकडो एकर जमीन व वनस्पती पाण्याखाली येतात तसेच कित्येक शेतकऱ्यांची, आदीवासींची मुळ गावे व जमीन बुडीत क्षेत्रात जाते, पण मग धरणे बांधायची की नाही ? असा प्रश्न सरकारला पडतो आणि आज सुध्दा कित्येक धरणे लोक विरोधामुळे बंद पडलेली आहेत. नवीन धरणे तर होत नाहीत पण आज नदी नाल्यांच्या प्रवाहाबरोबर येणारी माती, वाळू व गाळ धरणात वर्षानुवर्षे साठून रहातो आणि त्यामुळे धरणाची नियोजनाच्या वेळीची क्षमता आणि 25 वर्षानंतरची क्षमता यामध्ये बराच फरक पडतो आणि त्यामुळे सुध्दा कदाचित धरण सप्टेंबर ऐवजी जुलैच्या मध्यावरच किंवा ॲागस्टच्या सुरवातीलाच पुर्ण भरतात आणि धरणाचे दरवाजे उघडून पाणी धरणांमधून विसर्जित करावे लागते. मग जुलै मधील पाण्याचा विसर्ग व जूलै मधील नैसर्गिकरीत्या जास्त पडणारा तरणा म्हातारा पाऊस ह्या दोन कारणांमुळे सुध्दा महापूर जास्त येऊ शकतो आणि म्हणूनच यावर त्वरीत योग्य अभ्यासाअंती उपाय शोधला पाहिजेत.

धरण बांधण्यापूर्वी धरणाच्या साठवणुकीचा सर्व्हेद्वारे खुप अभ्यास केलेला असतो. धरण मुख्य नदीवर बांधले जाते. पण ह्या नदीला अनेक नाले, ओढे व ओहोळ मिळालेले असतात. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील छोट्या नद्या तसेच त्याची पूररेषा व लांबीचा अभ्यास करून त्या उपस्तोत्रावर ठराविक अंतरावर छोटे छोटे बंधारे बांधणे अगदी अत्यावश्यक आहे. ह्या बंधाऱ्यामध्ये मुख्यत्वे वाळू व माती साठून राहील याचा प्रामुख्याने विचार केला तर नियोजित धरण क्षमता धरणाच्या पुर्ण क्षमतेसाठी नेहमीच बांधील राहील व या बंधाऱ्यामुळे महापूर नक्कीच रोकता येईल.

महापूर रोकण्यासाठी…

1) पूर्वीच्या पारंपारिक अंदाजाचा सखोल अभ्यास करून नदी लगतच्या गावांचे स्थलांतर व पुनर्वसन करणे.
2) नदीतून अचूक अभ्यासाअंती नैसर्गिक बांधकाम प्रणाली चालू ठेवण्यासाठी पद्धतशीर वाळू उपसा कार्य चालू ठेवणे.
3) धरणाच्या साठवणूक क्षेत्रातील नाले व ओढ्यांचा अचूक अभ्यास करून त्यावर चेक डॅम बांधून वाळू व माती बांधकामास पुरविणे व शासनाला त्यामार्फत रेव्हेन्यू प्राप्त होईल आणि ते उत्पन्न दरवर्षी महापूर नियंत्रणास वापरण्यात मदत होईल.
4) नदीच्या दोन्ही तिरांची समुद्र सपाटी पासूनची उंची मोजून नदीच्या लांबीनुसार प्रत्येक किलोमीटरसाठी दोन्ही तिराची उंची समतोलात ठेवण्यासाठी काही ठिकाणी सखल भागात त्या सम पातळीची Plum Concrete संरक्षित भिंत बांधणे.
5) महापूर आल्यानंतर सर्वच गावांचा संपर्क तुटतो व वीजपुरवठा खंडित होतो यासाठी विद्युत बोर्डाने आपली सर्व सबस्टेशन कमीत कमी HFL च्या वर बांधावीत असा सरकारने आदेश देणे अत्यंत गरजेचे आहे.
6) महामार्गाचे चौपदरीकरण करताना रिव्हर ब्रीज खालून जाणाऱ्या पाण्याचा अभ्यास करून नदी पात्राच्या बाहेरून सुध्दा महापुराचे वाढीव पाणी जाण्यासाठी मोऱ्या बांधणे अत्यंत गरजेचे आहे. भराव घालून नदीच्या दोन्ही बाजूस रस्ते बांधल्यामुळे महापुराचे पाणी आडून रहाते व पुराचा फुगवटा वाढतो.
7) आज गावचे लोक घरातील जिर्ण कपडे,अंथरूणे, जूने मोडके फर्निचर, आरासांची थर्मेाकोल, निर्माल्य, औषधांच्या बाटल्या, जेवनाच्या प्लेट इत्यादी अनेक ड्रेब्रीस नदीच्या पात्रात तसेच नदीतीरावर टाकतात व महापुराच्या वेळी त्याचे गाळात रुपांतर हेाते व तो नदीत व धरणांत साठूण रहातो यासाठी प्रशासनाने गावच्या सरपंचाना लिखीत पत्रामार्फत कचरा नदीत टाकू नये यासाठी सक्त मनाई करणे गरजेचे आहे.

नेहमीप्रमाणे या पर्यायांचा सर्व खर्च काढला जातो आणि प्रस्ताव मंजुरीसाठी सरकार दरबारी पाठविला जातो आणि महापूराच्या पंधरवड्यानंतर राजकीय इच्छाशक्ती खूपच कमी झालेली असते आणि त्यामुळे प्रस्ताव पुढील मान्सून पर्यंत धूळखात शासन दरबारी पडतात. पुन्हा नेमेची येतो मग पावसाळा याप्रमाणेच पुन्हा महापुर, पुन्हा नुकसान, पुन्हा जिवितहानी आणि पुन्हा घोषणाबाजी व पूरग्रस्ताना मदत हे चक्र चालूच राहाते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

Adv. Sarita Patil August 11, 2021 at 6:30 PM

👆छान लेख आहे. निसर्ग अतिक्रमणाला आळा बसला तरच नैसर्गिक संकटे दूर होऊन मानवी हानी थांबेल. 👍👍

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading