इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराचे साहित्यकृती पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात प्रशांत असनारे यांच्या वन्स मोर’ या काव्यसंग्रहास इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार व डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या वा !’ म्हणताना… या साहित्यकृतीस उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अकोला येथील कवी प्रशांत असनारे यांच्या वन्स ‘मोर’ हा काव्यसंग्रह वाशिम येथील काव्याग्रह प्रकाशन यांनी प्रकाशित केला आहे. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी ग्रंथालयास दिलेल्या देणगीमध्ये भर घालून ग्रंथालयाच्यावतीने उत्कृष्ट काव्यसंग्रहास इंदिरा संत पुरस्कार देण्यात येतो. सन्मानपत्र व रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट गद्य मराठी साहित्यकृती पुरस्कार २०१९ पुणे येथील डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘वा!’ म्हणताना… या साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. हे पुस्तक पुणे येथील रोहन प्रकाशनने प्रकाशित केले आहे. १९७४ साली महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून शिल्लक राहिलेल्या निधीतून इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृतीस पुरस्कार देण्यात येतो. सन्मानपत्र व रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ग्रंथालयातर्फे डॉ. अशोकराव सौंदत्तीकर यांनी दिलेल्या निधीतून सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार दिला जातो. यंदा डॉ. अनघा केसकर (पुणे) यांच्या वार या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. याचे प्रकाशक पुणे येथील विश्वकर्मा पब्लिकेशन्सने केले आहेत. सन्मानपत्र व रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ग्रंथालयातर्फे वि. मा. शेळके यांचे कुटुंबीयांनी दिलेल्या निधीतून वि. मा. शेळके गुरूजी उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दिला जातो. यंदा तो ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर, बोरगाव (सोलापूर) यांच्या यसन या कादंबरीला जाहीर झाला आहे. याचे प्रकाशक स्वयंदीप प्रकाशन ( पुणे) हे आहेत. सन्मानपत्र व रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारतीय लेखकांच्या अन्य भाषेतील साहित्यकृतीच्या मराठी भाषेतील उत्कृष्ट अनुवादासाठीचा महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृतीस पुरस्कार दिला जातो. बाळासाहेब पाटील, हालेवाडी (आजरा) यांच्या फास व रमा हर्डीकर- सखदेव (पुणे) यांच्या हां ये मुनकिन है या दोन्ही अनुवादास विभागून जाहीर झाला आहे. फास या पुस्तकाचे प्रकाशन भाग्यश्री प्रकाशन व हां ये मुनकिन है या पुस्तकाचे प्रकाशक रोहन प्रकाशनने केले आहे. सन्मानपत्र व रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष वि. प. जगदाळे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार दिला जातो.
ग्रंथालयाच्यावतीने उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कारासाठी डॉ. नंदू मुलमुले, नांदेड यांच्या संभ्रमाचे सांगाती व तनुजा ढेरे, ठाणे यांच्या मंतरलेली उन्हे या दोन साहित्यकृतींची विभागून देण्यात आला आहे. संभ्रमाचे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस प्रकाशन, मुंबई व मंतरलेली उन्हे या पुस्तकाचे प्रकाशक डिंपल पब्लिकेशन हे आहेत.
पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कारासाठी नचिकेत मेकाले , कंधार यांच्या नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे जग’ या साहित्यकृतीस देण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक सृजन प्रकाशन, सांगली यांनी केले आहे. डॉ. श्रीरंग तेलसिंगे यांनी दिलेल्या निधीतून पुरस्कार दिला जातो.
लक्षणीय काव्यसंग्रह म्हणून वावरातल्या रेघोट्या (संदीप धावडे, वर्धा) व पाणी घातल्या झाडांची पानगळ (गणेश गोडसे) -अकलूज यांच्या पुस्तकास देण्यात आला आहे. वावरातल्या रेघोट्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशक जनशक्ति वाचक मंडळ,औरंगाबाद व पाणी घातल्या याडांची पानगळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशक अक्षर मानव प्रकाशन, पुणे हे आहेत.
विशेष लक्षणीय गद्य साहित्यकृतीसाठी महाभारत व्यक्ती आणि संकल्पना डॉ. लिली जोशी (पुणे) व जलतरंग माधव चितळे (इंदौर) यांना देण्यात आला आहे. मराठीतील महाभारत व्यक्ती आणि संकल्पना यांचे प्रकाशक उन्मेष प्रकाश ,पुणे व जलतरंग चे प्रकाशक साकेत प्रकाशन, औरंगाबाद हे आहेत.
स्थानिक साहित्यिक गौरव पुरस्कार विमलपती (दादासाहेब जगदाळे) यांना तर उत्कृष्ट वाचक पुरस्कार माधवी श्रीकृष्ण कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
रविंद्र लाखे (कल्याण ), डॉ. सुप्रिया सहस्रबुध्दे (पुणे), संगीता बर्वे (पुणे), रफिक मुल्ला (इचलकरंजी), करुणा गोखले (पुणे), भारत सासणे (पुणे), सुभाष विभूते (आजरा) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, असे ग्रंथालयाच्या उपाध्यक्ष हर्षदा मराठे यांनी सांगितले. याप्रसंगी कार्यवाह माया कुलकर्णी. सहकार्यवाह डॉ. कुबेर मगदूम, संचालक ॲड. स्वानंद कुलकर्णी, काशिनाथ जगदाळे, प्रा. मोहन पुजारी, प्रा.सुजीत सौंदत्तीकर, राजेंद्र घोडके आणि मीनाक्षी तंगडी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.