विकसीत भारत संकल्प यात्रा मोहीम
शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – भारत सरकारचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे
रत्नागिरी : शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. यासाठी शहरी भागाबरोबर ग्रामीणस्तरावर अधिक काम करा. ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना यासाठी प्रेरित करा, अशा सूचना भारत सरकारचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे यांनी दिल्या.
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसीत भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा १५ नोव्हेंबर ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने भारत सरकारचे संयुक्त सचिव श्री. भोंडवे (भा.प्र.से) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी एम. बी. बोरकर, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास इनुजा शेख, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या योजनच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजना व त्याअनुषंगाने माहिती दिली.
श्री. भोंडवे म्हणाले, या योजनांमध्ये जिल्हा चांगले काम करीत आहे. या योजना ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यासाठी, त्यांचा लाभ येथील लाभार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीने ग्रामीण स्तरावर यामध्ये अधिक काम वाढवा. गावामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यासाठी प्रेरणा द्या. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करा. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांची मदत घ्या. या योजना तळगाळातील प्रत्येकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी काम करा.
श्री. भोंडवे यांनी यावेळी स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रधानमंत्री आवास योजना, नरेगा योजना, आयुष्यमान कार्ड, बाल संगोपन योजना, माझी कन्या भाग्यश्री, पीएम किसान योजना, पीएम प्रणाम योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, पीएम विश्वकर्मा योजना, किसान क्रेडीट कार्ड आदी योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.