November 30, 2023
Selfies with buffalos ravi rajmane article
Home » सेल्फी वूईथ म्हस !!!
मुक्त संवाद

सेल्फी वूईथ म्हस !!!

कोल्हापूर तसं सांस्कृतिक ठेवा असलेले भन्नाट शहर. गेल्या वर्षी मी पहिल्यांदा म्हस पळायची शर्यत पाहिली. यंदाचा उत्साह ही ओसंडून वाहणारा होता. प्रचंड गर्दी पुंगळ्या काढलेल्या यामाह तराट… पळवणारी पोरं. हातात लाल कापड आणि धूमरपाट म्हस…. वरडणारी पोर. (अलीकड क्रिकेट सामन्यात चिअर्स करणाऱ्या पोरी मेकअप करून तोंडाचा चंबू करून नाजूक चिअर्स करतात. क्रिकेटर पेक्षा बायकांना जास्त महत्त्व आलय.)

चीअरिंग काय असावं हे कोल्हापुरात म्हशीबरोबर पोरं वरडायला लागली की इथ कळतं. म्हस पण फताड्या शिंगाची पाच फूट रस्त्याची रुंदी एकटीच कव्हर करणारी. सफाचट्ट बोडून, तेल लावलेली. शिंग रंगवून त्यावर रंगबेरंगी गोंड लावलेली. नवरीला नटवत्यात तसं नटवत्यात. गालाला ब्रशर लावल्यागत लाल भडक रंग लावत्यात. लिपस्टिक लावल्यागत हॉट, पायात तोड, गळ्यात माळा.कोल्हापूरकरांचा खरंच नाद नाही करायचा. पळायला लागली म्हणजे तिची झेप बघावी. उडी मारली तर घोड्यापेक्षा सरस.मग नंबर आल्यावर तर ताल बघूच नका. म्हशीची मालकीण तिला ववाळती. मालक तिच्या गळ्यात पडतो. एक दोघं आनंदानं तिचं पाय बी धरत्यात. मग आपल्या म्हशीचा नंबर आल्यावर रुबाबच वेगळा.

म्हशीबरोबर फुटू काढायला अशी गर्दी की विचारूच नका. म्हस बी बिचारी सेल्फी काढून घ्यायला तयार. (लय मोठं नाव झालं म्हणून टपली न्हाय मारत.) म्हसरांची शर्यत, नटवणं, तिला सजवण, तिची मिरवणूक काढण, तिचं राऊंडला पैलवान आल्या गत येन. तिचं अप्रूप बघून मन भरून येतय.

खरंच कोल्हापूरच्या म्हशी भाग्यवान. न्हाय तर आमच्या म्हसरासनी एवढा मान कोण देतय. कोण कौतुक करतोय. कोण गॉड-धोड खायला घालतय. गप उभ रहा म्हणलं की उभ राहतंय. पाणीव घालतय, कुणाच्या आडव बी येत न्हाय. तिनं लय जीव लावलाय पर आम्ही न्हाय कवा लावला. आम्ही तिला कवा किंमतच दिली न्हाय. आम्हाला फक्त आठ दहा लिटर दूध, नऊ दहा फॅट, एका म्हशीच्या महिन्याच्या दुधाचे बिल 20000. पाच सहा म्हैसाना झाल्या आण अर्धा एकर हत्तीघास झाला की गडी बुलटवरुनच डाग -डाग करतुय.आईला, म्हशीच्या दुधावरचं आमच्या शाळचा पास निघत हूता.म्हशीवर बसूनच आम्ही प्रश्न उत्तर पाठ कीली. मायला म्हशीच आठ दहा ट्रॉल्या शाणखात घातल की शंभर टनाव जातय. मग दिवाळी नीट घोल.

शेतकऱ्याची पोर बी ब्रँडेड कापड घालायला लागलीती.चार-पाचशे टन ऊस आन पाच सहा म्हैसाना झाल्या की कुणाची हिंमत न्हाय होत, माग सर म्हणायची. पर कवा तिला सणासुदीला पोळी चारायची आम्हाला आठवण येत न्हाय. आता तर अलीकडच्या पोरांना शान -मुताचा वास बी याय लागलाय.

म्हशीच्या दुधावर शाळा शिकलेल्या गड्याची बायको लाडीक पोर, नंबर आलेल्या म्हशीकड बघून म्हणत होती. “ममा एक सेल्फी घेऊया वियुथ बफेलो”. बाबा, म्हणतो “बेटा जपून ह!! शिंग खूप ब्रॉड आहेत”. म्हस मात्र भरल्या डोळ्यान बघतीया ईसरलास हूई र लेका??माझ्या पाठीवर बसूनच इथ वर आलायस. अन हुंदाड दीऊन ती झोकात निघून गेली..

Related posts

एक पणती उजेडासाठी ही एका राष्ट्रशिक्षकाची प्रेरणादायी कहाणी

Video : राऊतवाडी धबधब्याचे मनमोहक सौंदर्य

शेतकऱ्यांचे नवे रुप – अॅग्रीप्रिन्युअर

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More