साधनेने मनाची प्रसन्नता वाढते. मन आनंदी राहाते. मनातील राग-द्वेषाची भावना कमी होते. साहजिकच मनाच्या या स्थितीने आरोग्यास लाभ होतो. चेहरा तजेलदार होतो. शरीराच्या कातडीसही तेज येते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
परी तें मनाचां कानी ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावे ।
हे साटोवाटीं घ्यावे । चित्ताचिया ।। 494 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 6 वा
ओवीचा अर्थ – पण ते मनाच्या कानाने ऐकले पाहीजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हें माझे शब्द चित्त देऊन त्याच्या मोबदला घेतले पाहिजेत.
साधनेसाठी सद्गुरू मंत्र देतात. त्या मंत्राचा जप करायचा असतो. हा मंत्र आपण केव्हाही उच्चारू शकतो. केव्हाही त्याची साधना करु शकतो. त्याला काही बंधन नाही. कारण साधना आपली सुरुच असते. साधनेमध्ये कधीच खंड पडत नाही. आपण झोपेत असलो तरीही सोऽहम, सोऽहम चा जप सुरुच असतो. श्वास ही आपली साधना आहे. त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याचा हा सोऽहम चा स्वर आपण आपल्या कानांनी ऐकायचा आहे. मन त्या आवाजावर केंद्रित करायचे असते. मन त्यामध्ये गुंतवायचे असते. मनाने या शब्दांचा स्पर्श अनुभवायला हवा. हे शब्द पाहायचे सुद्धा असतात. बुद्धीच्या डोळ्यांनी ते पाहताही येतात.
एकंदरीत सोऽहमचा स्वर आपल्या मनात, कानात, बुद्धीत, श्वासात, चित्तात साठवायला हवा. त्यावर एकाग्रता वाढवायला हवी. मनात, श्वासात, बुद्धीत, कानात, चित्तात जेव्हा सोऽहम एकाच वेळी असेल तेव्हा ती खरी साधना होय. साधनेची ही स्थिती आपण आत्मसात करायची असते. सद्गुरुंच्या कृपार्शिवादाने ती साध्य होते. ही स्थिती आपण गाठू शकलो, तर आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग आपणासाठी सहज शक्य होऊ शकले. आत्मज्ञानाचा आपणास लाभ होऊ शकेल. यासाठी अभ्यासात सातत्य हवे.
अभ्यास आणि एकाग्रतेने हे शक्य आहे. यावर विश्वासही तितकाच हवा. हे मिळू शकते का नाही याची शाश्वती अनेकांना नसते. पण असे नाही की ध्येय गाठता आले नाही म्हणून ते ध्येय सोडून द्यायचे. ध्येय जरी गाठता आले नाही तरी त्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपणाला लाभ होतो आहे हे लक्षात घ्यायला हवे. काही काळ जरी आपण एकाग्रता करू शकलो तरी त्याचे अन्य फायदेही आहेत. आरोग्याच्या दृष्टीने त्याचे लाभ आहेत.
साधनेने मनाची प्रसन्नता वाढते. मन आनंदी राहाते. मनातील राग-द्वेषाची भावना कमी होते. साहजिकच मनाच्या या स्थितीने आरोग्यास लाभ होतो. चेहरा तजेलदार होतो. शरीराच्या कातडीसही तेज येते. या लाभाबरोबरच ही एकाग्रता आपल्याला अन्य कामातही उपयोगी ठरते. एकाग्रतेने काम केल्याने कामाचा ताण जाणवत नाही. काम सहज साध्य होते. साधनेचे असे अनेक फायदे आहेत. यासाठी अंतिम ध्येय गाठता आले नाही म्हणजे साधना सोडायची हा विचार योग्य नाही.
साधनेचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असे अनेक फायदे मिळत राहतात. यासाठी साधनेचा मार्ग आपण सोडायचा नाही. कधी ना कधी तरी साधनेची ती अवस्था आपणास प्राप्त होऊ शकते यावर विश्वास असायला हवा. ती प्राप्त का होत नाही, हे आपणच आपणास विचारायला हवे. तसे केल्यास आपल्याच चुका आपणास लक्षात येतील. त्या चुका सुधारत आपण मार्ग काढायचा आहे.