July 27, 2024
seed Precautions article by Santosh Godse
Home » शेतकऱ्यांनी बियाण्यांबाबत ही दक्षता घ्यावी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांनी बियाण्यांबाबत ही दक्षता घ्यावी

🛡 बियाण्यांबाबतची दक्षता 🛡

बी- बियाणे आणि खते- औषधे यांची निवड शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते. बियाणे निकृष्ट प्रतीचे लागले, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. गेल्या काही वर्षांपासून या संदर्भातील सुरु असलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी अभ्यासू झाले असले तरी बियाण्यांचा प्रश्न मात्र तसाच कायम आहे. दरवर्षी कुठे ना कुठे निकृष्ट बियाण्यांबाबतच्या तक्रारी होतच राहतात. यासाठी शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे महत्वाचे ठरते.

संतोष गोडसे
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती

पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. बियाण्याची पिशवी हि नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. बियाण्याचा थोडा नमुना पिशवी किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना देता येईल.

वातावरणातील बदलाचा विचार करूनच बियाण्यांची निवड गरजेची –

ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो, त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीप्रमाणे जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल, तर त्यास सदोष बियाणे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने त्याची उगवणक्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल, तर बियाणे सादोष आहे असे समजावे. त्याची भौतिक शुद्धता म्हणजेच त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त असल्यास सदर बियाणे सदोष आहे असे समजावे. सदर बियाण्याची अनुवांशिक शुद्धता नसल्यास म्हणजेच बियाण्याचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा नसल्यास तसेच झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या, फळे यामध्ये विविधता आढळल्यास सदर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या अशुद्ध आहे असे म्हणतात. तसेच शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलाचा विचार करूनच बियाण्याची निवड करावी. कारण जरी बियाणे शुद्ध असले तरी वातावरणातील बदलामुळे देखील काहीवेळा अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतकरी असे बियाणे सदोष असल्याचे समजतात.

घ्यावयाची काळजी –

(१) बियाणे साधारणतः ५ ते ७ दिवसांत उगवते. यासाठी शेतकऱ्याने प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करावे. बियाण्याची उगवण कमी आहे असे आढळल्यास तत्काळ खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची बियाणे निरीक्षणे, पंचायत समिती यांना तपासनी करणेबाबत समक्ष सांगावे.
(२) बियाण्यामध्ये अनुवांशिक किंवा भौतिक शुद्धतेत दोष आढळल्यास प्रथम पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देऊन त्यांच्याकडून पाहणी करून घ्यावी.
(३) तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची सत्यप्रत जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवणक्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच कणसात दाने न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते.
(४) बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता/ उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.
(५) शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुका स्तरावर बियाणे तक्रार समिती गठीत करण्यात आलेली आहे. यामध्ये कृषी विकास अधिकारी, बीज प्रमाणीकरण अधिकारी, बियाणे महामंडळ प्रतिनिधी, कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असतो. हि समिती आगाऊ नोटीसद्वारे बाधित बियाणे क्षेत्रास केव्हा पाहणी करणार याची माहिती देत असते व त्यानुसार पाहणी करत असते.
(६) शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात शुद्ध बियाणे मिळावे, कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, खरीप हंगामाचा तक्रार निवारण कक्ष, भरारी पथक यासारख्या समित्या गठीत करण्यात येतात.
(७) प्रत्येक तालुक्यात गुणनियंत्रण निरीक्षकाच्या नेमणुका करण्यात येतात. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत बियाणे समाविष्ट असल्यामुळे बियाण्याची साठेबाजी करणे, चढ्या भावाने विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. जर शेतकऱ्यास याबाबत तक्रार असेल तर कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे लेखी तक्रार करू शकतात.

तपशील ठेवावा –

शेतकऱ्यांनी पेरणीची तारीख, पेरणीची पद्धत, पेरलेले एकूण क्षेत्र, पेरणीसाठी वापरलेले एकूण बियाणे, पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर पावसाचे काय प्रमाण होते किंवा पिकास किती पाणी दिले, कोणत्या प्रकारे दिले, यापूर्वी कोणते पीक घेतले होते, नांगे भरण्यासाठी बी वापरले असल्यास कोणते बियाणे वापरले, पीक संरक्षण केल्यास रोग, कीड नियंत्रणासाठी कोणते कीडनाशक वापरले या सर्व बारीक-सारीक गोष्टींची माहिती तयार ठेवावी. जेणेकरून चौकशी समितीस त्यांचे निर्णय घेणे सुलभ होते.

बियाणे सदोष किंवा भेसळयुक्त आहे, असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी. यासाठी सातबारा उताऱ्यावर नोंद, गाव पंचनामा, छायाचित्र, बियाणे खरेदीपासून ते काढणीपर्यंतच्या मशागतीचा प्रकार, पीक संरक्षण, रासायनिक खतांचा वापर व खर्चाचा सविस्तर तपशील असणे आवश्यक आहे. बियाणे खरेदी पावती, शेती ज्याच्या नावे आहे त्या शेतकऱ्याच्या नावे घ्यावी. पावतीवर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव असावे.

📚 संकलन- कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

पेणा आणि चिकोटी : पशुपक्ष्यांच्या अधिवासाचे अद्भुत वाचन‘

माणसाला लाजवेल अशी अप्रतिम कादंबरी : कांडा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading