October 4, 2023
Spiritual awaking by Guru article by Rajendra Ghorpade
Home » गुरू शिष्याच्या संवादाची अनुभुती
विश्वाचे आर्त

गुरू शिष्याच्या संवादाची अनुभुती

सद्गुरु शिष्याला त्यांच्या आत्मज्ञानाची अनुभुती देतात. जेणेकरून शिष्य त्या अनुभुतीने आत्मज्ञानी होण्यासाठी प्रेरीत होईल. सद्गुरुंच्या विचाराने जीवपरात्म्याची अनुभुती शिष्यास येते. या अनुभुतीतून शिष्याने प्रगती साधून स्वतः आत्मज्ञानी व्हायचे आहे. ते ऐक्य साधायचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणें काळीं ।। 272 ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा

ओवीचा अर्थ – गुरुशिष्याच्या संवादात येणाऱ्या विचारानें प्राप्त झालेली जीवपरमात्म्याची जी एकता, तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तूं कधी हालूं नकोस.

नाथ परंपरेमध्ये ज्ञान हे गुरूकडून शिष्यास दिले जाते. यामुळे गुरूशिष्याच्या या नात्यास महत्त्व आहे. सद्गुरू हे आत्मज्ञानी असतात. त्याचा उपदेश हा उपयुक्त असतो. त्यांच्या उपदेशामुळेच गुरू-शिष्यांचे नाते दृढ होते.

एक उद्योगपती सद्गुरूंच्याकडे उपदेशासाठी आला. त्याची आई आजारी होती. तिला झटका आला होता. ती कोमात होती. तिला शुद्धीवर आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू होते. पण ती शुद्धीवर येत नव्हती. नेमके कारण डॉक्टरांनाही समजत नव्हते. या समस्येने त्रस्त उद्योगपती अखेर सद्गुरूंच्या चरणी आला. त्याने सद्गुरूंना याबाबत विचारले. सद्गुरूंनी त्याला आईचे दात मोजण्यास सांगितले. ते सर्व व्यवस्थित आहेत का ? याबद्दल पाहण्यास सांगितले. सद्गुरू आत्मज्ञानी होते. त्यांनी नेमके कारण ओळखले होते. उद्योगपती लगेच दवाखान्यात गेला आणि त्याने डॉक्टरांना हा प्रकार सांगितला. डॉक्टर हसले आणि त्यांनी या उद्योगपतींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. उद्योगपतीने मग स्वतःच आईचे सर्व दात आहेत का पाहिले. तर खरंच त्यातील दोन दात नव्हते. त्याने लगेच त्या डॉक्टरांना याबाबत कल्पना दिली. त्यानुसार डॉक्टरांनी आईची तपासणी केली. त्यात तिच्या पोटात दोन दात असल्याचे आढळले. ते काढण्यात आले आणि चमत्कार काय तर काही वेळातच त्या उद्योगपतीची आई शुद्धीवर आली. खरेतर त्या दातांच्या विषामुळेच ती शुद्धीवर येत नव्हती.

सद्गुरूंना आत्मज्ञानाने दातामुळे समस्या असल्याचे समजले. डॉक्टरांना मात्र ते लक्षात आले नाही. आता येथे डॉक्टर श्रेष्ठ की सद्गुरू श्रेष्ठ. दोघेही ज्ञानी आहेत, पण आत्मज्ञानी संत सर्वज्ञानी असतात. त्यांना ती दृष्टी असते. यासाठी ते श्रेष्ठ असतात. यासाठीच आत्मज्ञानी संतांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये. विश्वास नसला तर कमीत कमी काय सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे हे तपासायला तरी काहीच हरकत नाही. यामुळे आपला काही तोटा तर होत नाही.

सद्गुरूचा हा उपदेश उद्योगपतींनी ऐकला. त्याची पडताळणी केली. त्यांनी स्वतः तपासणी केली म्हणूनच त्यांची आई शुद्धीवर आली. विज्ञानाने प्रगती जरूर केली आहे. पण ते ज्ञान योग्य प्रकारे वापरायला हवे. ते वापरण्याचे कौशल्य हवे. ते कौशल्य नसेल, तर सर्व व्यर्थ आहे. काही गोष्टी विज्ञानानेही समजत नाहीत. सुटत नाहीत. त्या आत्मज्ञानाने समजतात. त्या गोष्टी सोडविण्यासाठी यावर विश्वास ठेवायला हवा.

सद्गुरु शिष्याला त्यांच्या आत्मज्ञानाची अनुभुती देतात. जेणेकरून शिष्य त्या अनुभुतीने आत्मज्ञानी होण्यासाठी प्रेरीत होईल. सद्गुरुंच्या विचाराने जीवपरात्म्याची अनुभुती शिष्यास येते. या अनुभुतीतून शिष्याने प्रगती साधून स्वतः आत्मज्ञानी व्हायचे आहे. ते ऐक्य साधायचे आहे. त्याठिकाणी स्थिर व्हायचे आहे. यासाठी सद्गुरुचें प्रयत्न असतात. शिष्य आत्मज्ञानी व्हावा. ती स्थिरता शिष्यास प्राप्त व्हावी. यावरच सद्गुरुंचे नित्य प्रयत्न अनुभुतीतून, संवादातून सुरु असतात.

Related posts

तवं नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझे ।।

म्हणोनि माझां स्वरुपी । मनबुद्धि इये निक्षेपीं ।

मुले भगवंताची रूपे

Leave a Comment