वेशेला तिचा पती कोण असे म्हणून विचारले तर ती प्रत्येकालाच आपला पती मानते असे लक्षात येईल. त्यामुळेच ती अखंड सौभाग्यवती असते. तसे आपण अंधपणे प्रत्येक सणाला वेगवेगळ्या देवांचे पुजन करत आहोत. श्रावण झाला की गणेशचतुर्थी मग दसरा, अन् नंतर दिवाळी अशा विविध सणात विविध देव-देवतांचे पुजन करत राहातो. पण हे सर्व देव एकच आहेत. हा अनुभव आपण कधी घेत नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
ऐसा अखंड भजन करी । उगानसे क्षणभरी ।
आघवेनि गांवद्वारीं । अहेव जैसी ।। 821 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटूंब असल्यामुळे, त्या सर्वांच्या योगानें अखंड सौभाग्यवतीच राहाते, त्याचप्रमाणे जो, असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहात नाही.
सण, धार्मिक समारंभ आपल्या संस्कृतीत नेहमीच मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सण-समारंभातून, या धार्मिक उपक्रमातून उर्जा मिळते. उत्साह वाढतो. वर्षभर प्रत्येक महिन्यात कोणताना कोणता तरी सण असतोच. हा सण झाला की दुसरा. संकष्टी, श्रावणातले सोमवार असे उपवासाचेही विविध उपक्रम असतात. अशाने आपल्या धार्मिक वृत्तीत निश्चितच वाढ होते.
नित्य नियमाने असे हे धार्मिक सण, उपक्रम अनेकजण साजरे करतात. बदलत्या संस्कृतीतही या सणांचे महत्त्व कमी झालेले नाही. फक्त त्याचे स्वरुप मात्र बदलले आहे. उत्साह भरणारे हे सण आपल्या जीवनात निश्चितच आनंद घेऊन येतात. पण या सणांमध्ये साधनेचा, भक्तीचा मुख्य उद्देश कमी होताना पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण यामध्ये साधना, भक्ती नसल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणजे आध्यात्मिक बैठक खऱ्या अर्थाने बदललेली दिसत आहे. याला चंगळवादाची जोड अधिक मिळत आहे. सजावट, भेटवस्तू, सौंदर्य अशा अनावश्यक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. भक्तीचा भाव मात्र लोप पावताना पाहायला मिळत आहे. हे चित्र सर्वसाधारण सर्वच सण-समारंभामध्ये पाहायला मिळत आहेत. अशाने मुळ आध्यात्मिक बैठकच विचलित झाली आहे, असे वाटते.
सबका मालिक एक म्हणजेच सर्व देव एकच आहेत. याची अनुभूती घ्यायला हवी. वेशेला तिचा पती कोण असे म्हणून विचारले तर ती प्रत्येकालाच आपला पती मानते असे लक्षात येईल. त्यामुळेच ती अखंड सौभाग्यवती असते. तसे आपण अंधपणे प्रत्येक सणाला वेगवेगळ्या देवांचे पुजन करत आहोत. श्रावण झाला की गणेशचतुर्थी मग दसरा, अन् नंतर दिवाळी अशा विविध सणात विविध देव-देवतांचे पुजन करत राहातो. पण हे सर्व देव एकच आहेत. हा अनुभव आपण कधी घेत नाही. त्यांच्यातील एकत्व जाणण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही. अंधपणे आपण सर्वच देवांची वेगवेगळी पुजा मांडत बसतो. या सर्वाहून स्वतःमध्ये असलेले देवत्व आपण विसरतो आहोत. हे आपले अज्ञान दूर व्हावे व स्वतःमध्येच देव आहे याची अनुभूती घेण्याचा आपण प्रयत्न केव्हाच करत नाही. म्हणजेच अध्यात्माचा खरा अर्थच आपण विसरलो आहोत.
वेशेप्रमाणे व्यवहार करत राहीलात तर तिच्यासारखेच समाजात आपणास स्थान मिळणार. यासाठी समाजाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे. जीवनात शांती, सुख – समाधान नांदावे यासाठी समाज व्यवस्थेने काही नियम केले आहेत. सध्याही भावी पिढीचा विचार करून हम दो हमारा एक हा कुटूंब नियोजनाचा उपक्रम राबविला जातो. हे कशासाठी हे जाणून घेण्याची गरज आहे. कुटूंब व्यवस्थेचा यासाठी योग्य प्रकारे अभ्यास करायला हवा.
अध्यात्मातही असे काही नियम आहेत. सर्वांमध्ये देव आहे. सर्वांमध्ये आत्मा आहे. तो सर्वांच्या ठिकाणी आहे. हे जाणून घेऊन आपण आत्मज्ञानी व्हायचे आहे. चतुर्थीला वेगळा, पंचमीला दुसराच, अष्टमीला तिसराच असे वेगळेपण बाह्यरुपात आहे. यासाठी अंतरंगात जाऊन त्याचा विचार करायला हवा. यातून निर्माण होणारे द्वैत ओळखायला हवे. हे द्वैत दूर करून एकत्व ओळखण्यासाठी आध्यात्मिक साधना आहे.
साधना कशासाठी आहे ? साधना कशाची करायची आहे ? अध्यात्म म्हणजे काय ? याचे खरे अर्थ समजून घ्यायला हवेत. हे ज्याला समजले तो ज्ञानी. ब्रह्माची अनुभूती येणे म्हणजे आत्म्याचे ज्ञान होणे, म्हणजेच आपण आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी व्हायचे आहे. यासाठीच हा मानव जन्म आहे. हे जाणून घेऊन मानवधर्माचे पालन करायला हवे. स्वःची ओळख हा मानवाचा खरा धर्म आहे. यासाठी या स्वधर्माचे पालन करून आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी होऊन जीवन सार्थकी लावायचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.