March 25, 2023
Spiritual knowlege light in everyones heart rajendra ghorpade article
Home » आत्मज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या हृदयात प्रकट व्हावा
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या हृदयात प्रकट व्हावा

आत्मा हा अमर आहे. त्याला मरण नाही. फक्त तो या देहात अडकला आहे. हे जाणून घेऊन आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवेत. आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गाचा अभ्यास करायला हवा. आत्मज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या हृदयात प्रकट व्हावा यासाठी प्रथम तो दिवा स्वतःच्या हृदयात प्रकट व्हावा यासाठी साधना करायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406

दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी ।
आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटें तेंहि नेणें ।। १२८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा

ओवीचा अर्थ – घरांत ठेवलेला दिवा, कोणाला तूं अमूक एक काम कर, असा नियम घालून देत नाही, अथवा कोणी कांही काम करत असले. तर त्यांचे निवारण करीत नाही आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे तेंहि जाणत नाही.

दिवा स्वतः जळतो व इतरांना प्रकाश देतो. इतरांचे जीवन प्रकाशमान करतो. प्रत्येकाला वाटते आपले आयुष्यही दिव्यासारखे प्रकाशमान असावे. आपले जगणे इतरांसाठी आदर्श ठरावे. आपले चांगले गुण इतरांना प्रोत्साहित करणारे असावेत. दिवा इतरांचे जीवन प्रकाशमान करतो. तो असेल तर तेथे व्यवहार सुरू राहतात. पण तो कोणालाही आदेश देत नाही. हेच काम तू कर. हे काम करू नकोस. हे वाईट आहे. हे चांगले आहे. असेही सांगत नाही. दिवा प्रकाश देताना कोणतीही अट घालत नाही. हा नियम आहे, तो तू पाळ असेही सांगत नाही. मात्र घरात घडणाऱ्या सर्व व्यवहाराशी त्याचा संबंध असतो. सर्व व्यवहाराच्या प्रवृत्तीला तो कारणीभूतही असतो. पण स्वतः तो या गोष्टीपासून अलिप्त असतो. स्वतंत्र असतो. तसा हा आत्मा आहे.

देहात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तो कारणीभूत आहे. पण तो ही गोष्टी कर, ही करू नको असा कोणताही नियम तो सांगत नाही. देहाकडून सर्व गोष्टी घडत असतात. सर्व कार्ये सुरू असतात. या कार्यास तो कारण आहे. पण तो या कार्यापासून अलिप्त आहे. त्यात तो अडकलेला नाही. कारण देह आणि आत्मा वेगळा आहे. आपणास तो एकच वाटत असला तरी या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तो या देहात आला आहे. तो देहात आल्याने देहामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. तो देहातून गेल्यानंतर देह निष्क्रिय आहे. देहातील हे चैतन्य ओळखायला हवे. हे जो जाणतो त्याची सर्व गोष्टीकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. त्याचे जीवन प्रकाशमान होते. तो आत्मज्ञानी होतो. सर्वज्ञानी होतो.

अंतर्ज्ञानाने त्याला या विश्वातील सर्व गोष्टींचे आकलन होते. आता सध्याच्या युगात अशा गोष्टी मनाला न पटणाऱ्या आहेत. इतका वेळही याकडे द्यायला नव्या पिढीला वेळ नाही. नव्या पिढीला त्वरित सुख देणारी गोष्ट पटते. वर्षानुवर्षे साधना करण्याचे सामर्थ्य आता या पिढीत नाही. पूर्वी एक दिवसीय क्रिकेट सामने 60 षटकांचे असायचे. त्यानंतर ते 50 षटकावर आले. आता तर 20-20 चे युग आहे. कसोटी सामने आता फारसे होतच नाहीत. पाच-पाच दिवस खेळत राहणे आता या पिढीला जमेनासे झाले आहे. विचारसरणी बदलली आहे. मग ही पिढी वर्षानुवर्षे साधना कशी करणार. त्यांना हे विचार पटणार तरी कसे? पण हे सत्य आहे. शाश्वत आहे. हा ठेवा आपल्या पूर्वजांनी आपणासाठी ठेवला आहे. आदिनाथांपासूनची ही परंपरा आहे. ही खंडित होता कामा नये. यासाठी आत्मज्ञानाचे हे बीज या पिढीत रुजवायला हवे. पण हे रुजणार कसे? त्यांना आता नव्या पद्धतीने हे शास्त्र पटवून देण्याची गरज आहे.

पृथ्वी गोल आहे याचा शोध आता लागला आहे. या आकाशगंगेत किती गृह, तारे आहेत. याचाही शोध लागला आहे. यापुढेही शोध सुरू आहे. पण ज्ञानेश्वरांच्या काळात किंवा त्यापूर्वीच्या काळातही या गोष्टी ज्ञात होत्या. त्या कशा? तेव्हा तर अंतराळात यान पाठवून याचा शोध लावण्यात आलेला नव्हता. या अंतराळात कोणीही गेलेले नव्हते. मग या अंतराळातील या गोष्टी जाणल्या कशा? साधुसंतांनी आत्मज्ञानाने या गोष्टी मांडल्या. विश्वाचे हे आर्त त्यांनी सांगितले. यासाठी आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा अभ्यास नव्या पिढीने करणे आवश्यक आहे. तो ठेवा जपण्यासाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे.

संतांनी या गोष्टीचा उलगडा केला आहे. पण काही स्वार्थी व्यक्तींनी स्वतःच्या फायद्यासाठी चुकीचे तत्त्वज्ञान मांडून अंधश्रद्धा पसरवली. अणूचा शोध लागला. आता या अणूपासून ऊर्जाही मिळवली जात आहे. विजेची निर्मिती केली जात आहे. जग प्रकाशमान केले जात आहे. पण काही स्वार्थी व्यक्ती अणूंचा वापर विध्वंसक कृत्ये करण्यासाठी करत आहेत. जगात सगळे सारखे नाहीत. अनेक विचारांच्या व्यक्ती आहेत. काही चांगले कार्य करतात. तर काही वाईट कृत्ये करतात. त्याचा समाजास त्रास होत आहे. यासाठीच कायदे केले गेले. गुन्हेगारांना शिक्षा केली जाते, पण गुन्हे हे घडतच राहतात. पूर्वीच्या काळीही हे गुन्हे घडत होते. अंधश्रद्धेतून अनेकांचे बळी घेतले जात होते. तेव्हाही त्या त्या काळातील राजांनी कायदे केले होते. पण हा प्रश्न तेव्हाही कायम होता आजही तो कायम आहे. याचे कारण जगात सर्व व्यक्ती समान विचारांच्या नाहीत. सर्वच ज्ञानी आहेत असे नाही. संतांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाजाचे प्रबोधन केले.

कायदा व्हावा जादूटोणा, चेटूक करून जनतेला फसविणाऱ्यांना शासन व्हावे यासाठी कायदा करावा असे राजासमोर मांडताना कधी पाहण्यात आले नाही. त्यांनी समाजाला ज्ञानी केले. समाजात त्यांनी ज्ञानाचा दिवा लावला. आत्मज्ञानाचा प्रसार केला. लोक शहाणे झाले तर या समाजात जादूटोणा करणाऱ्यांच्या जादूला कोणी बळी पडणार नाही. संतांनी वेगळ्या पद्धतीने या समस्येवर उपाय सुचविला. पण सध्या समाजात असे संत आहेतच कोठे? असे संत सापडणे कठीण झाले आहे. सध्याच्या नव्या पिढीतील काही आत्मज्ञानी व्यक्ती मठ, मंदिर उभारण्यासाठी मोठमोठ्या देणग्या मागण्यात मग्न आहेत. या देणग्यांतून ते समाजातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या जाळ्यात सापडत आहेत. याचे भानही आता त्यांना नाही. काहीजण राजकारण्यांच्या कपटाला बळी पडत आहेत. मठ, मंदिरासाठी देणग्या गोळा करून या व्यक्ती स्वतःच स्वतःचे अस्तित्व धोक्यात घालत आहेत.

पूर्वीच्या संतांच्या समाध्या, मंदिरे कोणी बांधली? त्यांच्या मृत्यूनंतर जनतेने त्यांची मंदिरे उभारली. जनतेने उत्स्फुर्तपणे संतांची मंदिरे उभारली, पण आताचे आत्मज्ञानी जिवंतपणीच स्वतःची मंदिरे उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जनतेने उत्स्फुर्तपणे मंदिर उभारावे असे त्यांना वाटतही नाही. कारण यासाठी समाजात तसे कार्य करायला हवे, आत्मज्ञानाची पताका त्यांनी उभ्या करायला हव्यात. या मराठी नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा, अशी परंपरा पुढे चालविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मंदिरे अनेक उभी आहेत. तेथे आता काय चालते. याचाही विचार व्हायला हवा. गावागावात मंदिरे उभारली गेली आहेत. पण आता या मंदिरामध्ये जायला लोकांना वेळ नाही. अनेक मंदिरे ओस पडली आहेत. केर कचराही कोणी काढत नाहीत. काही मंदिरावर झाडे उगवली आहेत. मंदिरांची स्वच्छताही केली जात नाही. पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर फक्त काही मंडळी समाजकार्य म्हणून मंदिराची स्वच्छता करतात. पण प्रत्यक्षात अनेक मंदिरे ओस पडत आहेत. सध्या लोकांना मंदिरात जाण्यासाठीही वेळ नाही. इतका काळ बदलला आहे. ग्रामीण भागात नव्हेतर शहरातही अनेक मंदिरात वेगळेच धंदे चालतात. त्यांचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अशा मंदिरांमध्ये जादूटोणा, मांत्रिकांचे फावते. या मंदिरांचा आधार घेऊनच ते समाजात अंधश्रद्धा पसरवत आहेत. काही सुशिक्षित मंडळीही या अशा प्रकारांना बळी पडत आहेत. यासाठी समाजात आता आत्मज्ञानाच्या प्रबोधनाची खऱ्या अर्थाने गरज आहे.

ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या ज्ञानाचा प्रसार समाजात करण्याची गरज आहे. या ज्ञानाचा दिवा समाजात लावला जावा. या आत्मज्ञानाच्या उजेडात समाजातील अंधार दूर व्हावा, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. त्याची अनुभूती येण्यासाठी त्याचे वाचन-पारायण समाजात व्हायला हवे. प्रबोधनाचा तो एक उत्तम मार्ग आहे. समाज प्रबोधन हे स्वतःपासून करायला हवे. स्वतःच प्रथम स्वतःचे प्रबोधन करायला हवे. मी कोण आहे. याचा विचार स्वतः करायला हवा. मी या समाजात कशासाठी जन्मलो. माझ्या या जन्माचा उपयोग काय? आपला जन्म कशासाठी आहे? आपण कोण आहोत? आपले कार्य काय? याचा विचार करायला हवा. मी आत्मा आहे. याचा बोध घ्यायला हवा. माझ्यामध्ये जो आत्मा आहे, तो सर्वांच्या ठायी आहे. सर्वांच्या ठायी असणारा आत्मा हा एकसारखाच आहे. देह नाशवंत आहे. आत्मा हा अमर आहे. त्याला मरण नाही. फक्त तो या देहात अडकला आहे. हे जाणून घेऊन आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवेत. आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गाचा अभ्यास करायला हवा. आत्मज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या हृदयात प्रकट व्हावा यासाठी प्रथम तो दिवा स्वतःच्या हृदयात प्रकट व्हावा यासाठी साधना करायला हवी.

Related posts

प्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर  

विश्वरुपाचे मर्म

सद्गुरु अवधान पाहून मार्गदर्शन करतात

Leave a Comment