April 25, 2024
Adyal Tekadi Laxmandada Narkhede memory
Home » अड्याळ टेकडीचे लक्ष्मणदादा नारखेडे : काही स्मृतीपुष्प
गप्पा-टप्पा

अड्याळ टेकडीचे लक्ष्मणदादा नारखेडे : काही स्मृतीपुष्प

अड्याळ टेकडीचे लक्ष्मणदादा नारखेडे : काही स्मृतीपुष्प

श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे कार्यानुभवी आचार्य ब्र. लक्ष्मणदादा नारखेडे यांचा सहवास मला झाडीपट्टीत असतांना अनेकदा लाभला.कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या पश्चात ते अड्याळ टेकडीवर ग्रामगीता तत्वज्ञानाचे धडे तेथे भेट देणाऱ्या मंडळींना देत असत. स्वतः ग्रामगीतेचे आचरण करणे आणि त्यानुरूप प्रचार प्रसार करणे हे त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय बनले होते. त्यांच्या सहवासातील काही स्मृतीपुष्प…

बंडोपंत बोढेकर ,
शिवाजीनगर चंद्रपूर ,
भ्रम. 9975321682

प्रसंग १-

ते ब्रम्हलिन होण्याच्या अगोदर ठीक चार दिवसापुर्वी म्हणजे ४ एप्रिल २०१८ रोजी गडचिरोलीचे डाॕ. शिवनाथ कुंभारे यांचे सोबत मी सांयकाळी ६ वाजता अड्याळ टेकडीवर त्यांना भेटण्यासाठी पोहचलो होतो. दादा आजारी होते, वय वर्षे ९१ सुरू असल्याने अशक्तपणाही खूप आलेला होता. अन्नपाणी त्यांनी वर्ज्य केलेले होते. त्यामुळे आम्हाला पाहताच ते कसेबसे उठून बसायला लागले पण त्यांना उठता येईना. डोक्याच्या बाजुला ग्रामगीता, चष्मा आणि काही कागद ठेवलेले होते. दादांनी मजकडे पाहिले अन् मुखातून एक शब्द निघाला ,’ बंडोपंत हो का? ‘ ….मी “जी..हो” म्हणत जयगुरू केला आणि बाजुला असलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. त्यांची मोठी मुलगी उषाताई किनगे ह्या काही दिवसांपूर्वीच बंगलुरूवरून तिथे आलेल्या होत्या. त्या दादांची काळजी घेत होत्या.

डाॕ. कुंभारेजी म्हणाले , ” दादा, तुम्ही जवळपास महिनाभरापासून अन्नपाणी सोडल्याने शरीरातील रक्त , पाणी कमी झाले आहे, मी काही इंजेक्शन आणि सलाईन बाॕटल्स सोबत आणलेले आहे. ग्लुकोज पावडरही आणलेले आहे. मी डाॕक्टर असल्याने उपचार तर करणारच आहे.’ …..असे म्हणताच डाॕक्टरांनी सलाईन लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शरीरातील रक्तच कमी झाल्याने त्यांच्या हाताची रक्तवाहिनी डाॕक्टरांना सापडत नव्हती . मला तर केवळ त्यांच्या शरीराचा आचार्य विनोबाप्रमाणेच सापळाच भासत होता. श्वास तेवढा सुरू होता. दादा त्याही अवस्थेत खूप समाधानी दिसत होते . शेवटी ते डाॕ. शिवनाथजींना म्हणाले , ‘ आता शेवटी मला नका सुया टोचू . सलाईनचे औषध उरलेल्या हाडांवर नुसतेच पसरेल , आता काय उतरत्या वयात नवे रक्तमांस येणार आहे…..शांतपणे पडून राहू द्या…. ‘ असे म्हणत किंचितसे ते हसले आणि त्यांनी पुन्हा डोळे लावून घेतले. डाॕ. कुंभारे काहीसे थांबले आणि डाॕक्टरी कर्तव्य समजून शेवटी त्यांनी सलाईन लावलीच. हे दृश्य मी जवळ बसून पहातच होतो. माझ्या मनात दादांच्या कार्यसंबंधाच्या अनेक आठवणी घर करू लागल्या होत्या.

प्रसंग-२

नारखेडेदादांनी आपले गाव – घरदार सोडून कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या सूचनेप्रमाणे ते या निर्जन वनातील भूवैकुंठ प्रयोगात सामील झाले होते. त्यांचे मुळ गाव नांदूरा जि. बुलढाणा. येथे त्यांचा ८ जुलै १९२७ रोजी जन्म झाला. मारोतराव नारखेडे हे त्यांचे वडील. व्यवसायाने शेतकरी. त्यांचा परिवार आधीपासूनच राष्ट्रसंताच्या विचारांनी भारलेला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ते गीताचार्य दादांच्या प्रेरणेने भूवैकुंठ प्रयोगात सामील झाले. ब्रम्हपुरी तालुक्यातील किरमिटी अड्याळ गावाची जंगल सदृश्य रेव्हेन्यु लँन्ड वनमंत्री मधुकरराव चौधरी यांनी ग्रामगीतेच्या प्रयोगासाठी आणि तेथील साधकांच्या उपजिविकेसाठी दिली होती.वं. महाराजांच्या आशीर्वादाने आणि कर्मयोगी गीताचार्य श्रीतुकारामदादाच्या अथक प्रयत्नांनी या भूमीस तपोभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. सभोवतालच्या जनतेसाठी आकर्षणाचे केंद्र बनले . ग्रामगीताप्रणित ग्रामसंरक्षण दल , ग्रामसभा सक्षमीकरण , व्यसनमुक्ती, निसर्गोपचार, कुटीर उद्योग, खादी ग्रामोद्योग, लघु उद्योगाचे प्रशिक्षण येथे देण्यात येऊ लागले. ब्रम्हपुरी शहरापासून हे स्थळ १५ किलोमीटरवर असल्याने अनेक अडचणी तेथे होत्या.

दळणवळण , जनसंपर्क, विज आदीं प्रश्न ह्या प्रयोगासमोर होते. श्रमदान आणि स्वावलंबन ह्या तत्त्वविचारांचे धडे येथे देण्यात येत होते. गावोगावचे सेवाभावी मंडळी, साधक ,कार्यकर्ते येथे जमत होते. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम गीताचार्य श्रीतुकारामदादाच्या पश्चात लक्ष्मणदादा नारखेडेजी यांनी सक्षमपणे केले. तपोभूमी अड्याळ टेकडी येथील साधक कुट्या, सत्संग भवन ,गुरूपद गुंफा, संतकुटी हे अध्यात्मप्रेमींना आपल्याकडे ओढून घेते. लक्ष्मणदादांनी अशा परिस्थितीत अड्याळ टेकडी चा “ग्रामकुटूंबाचा” मोठा व्याप संयमाने सांभाळला. “श्रीगुरूदेव ” तत्त्वविचार टिकवून ठेवला. ते गावोगावी जाऊन ग्रामगीता सांगू लागले, त्यातील ग्रामविकासाचे सूत्र लोकांत रूजवू लागले . उर्जानगर (चंद्रपूर ) येथे भरलेल्या राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे त्यांनी सह्दयतेनी अध्यक्षपद भूषवले होते. या संमेलनाचे नियोजन अशोक धम्माने, शंकर दरेकर, मुर्लिधर गोहणे, विलासराव उगे, देवराव कोंडेकर आदी सदस्यांनी केले होते. राजगडचे शिल्पकार चंदू पाटील मारकवार ,ॲड. एकनाथ साळवे, डॉ . हरिश्चंद्र बोरकर, पुण्याचे कवी राजेंद्र सोनवणे, सुरेंद्र बुराडे, गोंडवाना विद्यापीठाचे डाॕ. नामदेव कोकोडे आदी मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी लाभली होती. यावेळी त्यांंनी राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींना यथोचित मार्गदर्शन केले होते.

प्रसंग ३-

मी एकदा नोव्हेंबर २०१६ मध्ये अड्याळ टेकडीवर मुक्कामाला होतो .सकाळी ब्रम्हमुहूर्तावर तयारी करून ध्यानपाठास जायचे होते. डाॕ. मुळे आणि मी सकाळी चार वाजताच टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीकडे चाललो होतो. विज नसल्यामुळे सर्वत्र अंधार पडला होता. त्या अंधारात टेकडीच्या पायऱ्या उतरताना भीती वाटत होती. कारण यापूर्वी अनेकदा मी त्या पायऱ्यावर नागासारखे सर्प फिरताना पाहिले होते . एकदा बिबट्या, वाघ सुध्दा झाडावर चढलेला दिसला होता. अश्या ठिकाणाचे पायथ्याशी असलेल्या अंधाऱ्या वहिरीकडे जात असताना मात्र डाॕ. नवलाजी मुळे निर्भयपणे चालत होते. त्यांच्यामागे मी चाललो होतो. वहिरीजवळ येताच आवाज आला. कुणीतरी अंधारात बादलीने विहिरीतून पाणी काढत असल्याचे भासले. डाॕ. मुळेंना मी म्हणालो , “मुळेजी , इतक्या अंधारात चार वाजता विहिरीतून पाणी काढणारे कोण आहेत ?”.

यावर डाॕ. मुळे म्हणाले , ” ते लक्ष्मणदादा आहेत, स्नान करण्यासाठी पाणी काढताहेत.” आम्हाला पाहुन दादा म्हणाले , ” ” “तुमच्याकरीताही पाणी काढून ठेवलेच आहे, तुम्ही स्नान करून घ्या,आणि ध्यानाला या.”

नोव्हेंबर महिना असल्याने थंडी खूप होती. पण थंड पाण्याच्या स्नानाने उष्ण उर्जा मिळाली. आम्ही ध्यान करण्यासाठी सत्संग भवनात पोहचत नाही तोच दादा तिथे आपली तयारी करून पोहचले होते. यावरून ते व्रतस्थ जीवन जगणारे दिसले. नेमून दिलेले कार्य स्वावलंबनाने जगत रहावे, या तत्त्वाचे ते होते. सन २०१५ मध्ये त्यांना किडनी कँन्सर झाला होता. तेव्हा ते पंचगव्य चिकित्सक डाॕ. निरंजन स्वामी वर्मा ( चेन्नई ) यांच्या आश्रमात चार दिवस मुक्कामाला होते . त्यांनी पंचगव्य चिकित्सा समजून घेत पथ्यपाणी पाळत वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी या असाध्य आजारावर विजय मिळवला होता. सुमारे वर्षभर ते गोड वस्तू , मीठ, तेल यापासून दूर राहिले. कठोर नियमांचे पालन केले. ” श्रीगुरूदेव तत्त्वप्रणाली आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पध्दती ” कशी फायदेशीर आहे, याबाबतचे स्वतःच्याचे उदाहरण समाजापुढे प्रस्तुत केले.

प्रसंग -४

लक्ष्मणदादा खूप शिकलेले नव्हते. पण सन १९३२ साली त्यांंनी हायर मॕट्रिकची परीक्षा चांदूरबाजार जि. अमरावती येथून उत्तीर्ण केलेली होती. राष्ट्रसंताच्या विचारांचे ते पाईक होते. अर्थात ग्रामगीतेचे ते नियमित वाचक होते. त्यांची उपजत चिकित्सक वृत्ती असल्याने ते ग्रामआरोग्य मासिकात वैचारिक लेख लिहायचे. त्यांनी आजवर ९ पुस्तके लिहिली. शेतकऱ्यांचे रक्त पिणारे ढेकून, भारत महान पर पूंजीपतीयोंको गहान, नाणे एक बाजू दोन, आपले आरोग्य आपल्या हातात, ग्रामगीता प्रणित आधुनिक महाभारत आदी पुस्तकाचा त्यात समावेश आहे. ह्या पुस्तकातून त्यांंनी देशात चाललेल्या भौतिक साधनांचा अतिरेक, समाजातील वाढत्या अंधश्रध्दा, देवभोळेपणा, शेतकऱ्यांच्या दुरावस्था यावर त्यांनी कठोर भाष्य केलेले आहे. त्यामुळे त्यांची पुस्तके मोठ्या प्रमाणात मोझरी आणि अड्याळ टेकडीवर विकली जायची. तसेच त्यांंनी साप्ताहिक सत्संग, मासिक ग्रामआरोग्य आणि व्हाईस आॕफ तुकडोजी महाराज ह्या नियतकालिकांस योग्य दिशा दिली. जाहिरातीविना हे चालवणे फार कठीण काम असायचे. डाॕ.नवलाजी मुळे आणि डाॕ. रत्नाकर भेलकर ( नागपूर ) यांनी यासाठी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. वाचकसंख्या वाढविण्यासाठी या साऱ्या मंडळीनी बरेच प्रयत्न केले. तसेच पंढरपूर येथील ग्रामगीता सक्रीय दर्शन मंदीर, मोझरी येथील ग्रामगीता गुरूकुल आणि जामधरी टेकडी (जि. नांदेड ) येथील बांधकाम लोकसहभागातून, श्रमदानातून पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांंनी अथक परिश्रम घेतले.

प्रसंग -५

सिंदेवाही जवळच्या पेंढरी कोकेवाडा येथे २३ वे झाडीबोली साहित्य संमेलन भरले होते. गीताचार्य श्रीतुकारामदादा यांच्या स्मृतीस हे संमेलन समर्पित केले होते. याबाबत आयोजन समितीच्या वतीने मी लक्ष्मणदादा सोबत संपर्क साधला होता. त्यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले होते. सांयकालीन सत्रात सामुदायिक प्रार्थनेनंतर त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. याप्रसंगी कोकेवाडा,पेंढरी मुरपार ची संपूर्ण ग्रामस्थ मंडळी हजर होती. त्यावेळी तेथे झालेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी साऱ्यांनाच ग्रामगीता आचरण्यात आणावी, ग्रामसभा सक्षम करावी, गावोगावी स्वच्छतेचा ध्यास धरा, नाहीतर पुढे अनेक आजार बळावतील हे ध्यानात ठेवा असे आवाहन केले होते. त्यांचे ते शब्द आज खरे ठरत आहे, अस्वच्छतेमुळे वाढलेल्या रोगांच्या साथी आपण आज अनुभवत आहोतच. लक्ष्मणदादांच्या मार्गदर्शनात २०१४ साली कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांची जन्मशताब्दी महोत्सव अड्याळ टेकडीच्या पायथ्याशी घेण्यात आला होता.

याप्रसंगी समाजसेवक अण्णा हजारे ( राळेगणसिध्दी ) आणि अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी हजेरी लावली होती. तसेच २०१७ मध्ये अड्याळ टेकडीचा सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात आला होता, हे विशेष. लक्ष्मणदादांच्या कार्याची दखल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेने घेऊन त्यांना गीताचार्य श्रीतुकारामदादा यांच्या हस्ते सन १९९५ मध्ये अड्याळ टेकडीवर गीताजयंती दिनी समर्पित जीवन पुरस्कार देण्यात आला होता, तर सांगडी बेला (तेलगांना) येथे २८ मार्च २०१२ रोजी भरलेल्या दहाव्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात तेलगांना चे तत्कालीन वनमंत्री जोगू रामण्णा यांच्या हस्ते “राष्ट्रसंत साहित्य विचारकृती पुरस्कार ” प्रदान करण्यात आला होता. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष क्रिष्टा रेड्डी, सर्वाधिकारी बबनराव वानखेडे, हरिभाऊ वेरूळकर, सप्तखंजेरीवादक भाऊ थुटे उपस्थित होते.

शेवटचा प्रसंग –

असा हा कृतीशील आचार्य शेवटच्या श्वासापर्यंंत गीताचार्य श्रीतुकारामदादा यांचा आदर्श पुढे ठेवत ग्रामगीता जगत आणि सांगत राहिला. पद, पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धीपासून कायमच दूर होता. ४ एप्रिल २०१८ च्या त्यांचेशी झालेल्या शेवटच्या भेटीत मला थोडाफार संवाद साधता आला.
‘परात्पर स्थिती विश्वची नाही !
सर्व स्वानंद कोंदला पाही !
त्याची राहणीच सहजी ब्रम्हमयी ! सहज बोलही वेदोत्तम !!ग्रा. अ.३२!!’

ग्रामगीतेत सांगीतल्या प्रमाणे ते मला याप्रसंगी परमोच्च अवस्थेत असल्याचे भासत होते. आपल्या आजारपणाची चर्चा मुखी येऊ न देता श्रीगुरूदेवाला अभिप्रेत ” ग्रामगीतेच्या तत्वानुसार गाव घडविण्याचे कार्य सुरू ठेवा” असा मौलिक संदेश त्यांनी दिला. आम्ही दोघेही दर्शन घेऊन गडचिरोली कडे निघालो . पुढील चार दिवसांनी ८ एप्रिल २०१८ रोजी नारखेडे दादा ब्रम्हलिन झाले.

ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे भजन दिंडी श्रीगुरूदेव सेवकांनी काढली. अड्याळ टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गोपचार केंद्राच्या लगत शेतात त्यांच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चितेला त्यांची मोठी मुलगी उषाताई किनगे यांनी अग्नी दिला. अंत्यसंस्काराच्या रक्षा तेथील काही वृक्षाच्या मुळाशी आणि शेतजमीनीत पसरविण्यात आली. नारखेडे दादांच्या इच्छेप्रमाणे कुठलेही कर्मकांड न करता, समाधी वगैरे न बांधता त्या परिसरात तेथील साधकवर्गांनी ५० फळझाडांचे वृक्षारोपण केले. लक्ष्मणदादा गेल्याची वार्ता माझेकडे आली. माझा विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता आणि तिथूनच त्यांना हात जोडले. कार्यालयीन व्यस्ततेमुळे तेव्हा मी जाऊ शकलो नव्हतो. मन दुःखी झाले.नारखेडेदादा स्मृतीपुष्पांनी कायमच आमच्या जवळ आहे.
सेवेचे कंकन ! जाणिवेचे मंत्र !
समर्पण तंत्र ! दावी जना !!
डोंगरी गुहेचे ! वैकुंठी जीवन !
होते तपोवन ! त्यांचेसाठी !!
असा हा सेवक!कार्ये झाला थोर !
कर्तव्य कठोर ! लक्ष्मणदादा !!

Related posts

कामेश्वरी साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

श्वासाच्या अनुभूतीतूनच दूर होतो मीपणाचा अहंकार

दूधराज…

Leave a Comment