महिलांचे हक्काचे व्यासपीठ चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय
सांस्कृतिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांना मिळाली प्रेरणा आणि ऊर्जा
कोल्हापूर – नृत्य, गायन, आणि अभिनयासह आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करणारा सांस्कृतिक उपक्रम संस्मरणीय ठरला. श्रीमती चंद्रप्रभा शंकरराव पाटील महिला वाचनालयाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महिलांसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरला. या कार्यक्रमाला लहान मुलींपासून वयोवृद्धांपर्यंत अशा सर्व स्तरातल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग घेतला.
वडणगे (ता.करवीर) येथील श्रीमती चंद्रप्रभा शंकरराव पाटील महिला वाचनालय महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. महिलांच्या विचारांना आणि कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशातून महिलांसाठी नाट्यस्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सौ ज्योती निकम, सौ वर्षा पाटील आणि चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन, श्रीमती चंद्रप्रभा पाटील आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, महिलांना निखळ आनंद मिळावा, त्यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि आत्मविश्वास वाढावा, अशा उद्देशातून हा कार्यक्रम आयोजित केला असून, महिलांनी संघटित होऊन असे उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. अपर्णा पाटील यांनी केले.
गणेश वंदना नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी छत्रपती शिवराय आणि संभाजीराजेंवर सादर केलेल्या पोवाड्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यानंतर कोरोना, वाढतीमहागाई, ऑनलाईन अभ्यास यांसह विविध विषयांवर नाट्यछटा सादर करून महिला कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रसिकांचे निखळ मनोरंजन करत असतानाच त्यांना अंतर्मुख होऊन विचारही करायला लावलं. या स्पर्धेमध्ये वाढती महागाई या नाटकाने प्रथम क्रमांक, वृद्धाश्रम या नाटकाने द्वितीय क्रमांक आणि ऑनलाइन या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला. अभिनयासाठी रिया सुभाष मोरे यांना प्रथम क्रमांकाने, तर लता कचरे, अमिता साळुंखे, उज्वला बिरंजे यांना विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले. सहभागी सर्व कलाकारांना बक्षिसे देण्यात आली. इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सुवर्णा पाटील, सेक्रेटरी मनीषा चव्हाण आणि अपर्णा पाटील यांच्या हस्ते कलाकारांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण तेजस्विनी देसाई आणि प्रणोती कुमठेकर यांनी केले. यावेळी लकी ड्रॉ मधून अनेक महिलांना बक्षिसे मिळाली.
स्वागत सारिका पाटील, प्रास्ताविक मंगल नाईक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय साक्षी पाटील केला. सूत्रसंचालन योगिता पाटील यांनी केले. राजश्री आळवेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुषमा देवणे, सुजाता साखळकर, शुभांगी येरुडकर, रजनी दुधाने, पूजा पाटील, ज्योती पाटील, अनिता साळुंखे, वैशाली पाटील, लता कचरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.