ज्ञानाच्या दिव्याचा प्रकाश अनेकांना मार्गदर्शन करतो. यातून अनेक दिवे निर्माण होऊ शकतात. हे सर्व दिवे प्रकाशमान झाले तर आपले जीवनही प्रकाशमान होईल. यासाठी दिव्याशी न खेळता त्याच्या प्रकाशातून स्वतः प्रकाशमान व्हायचे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
दीपाचिया झगमगा । जाळील हे पतंगा ।
नेणवेचि पैं गा । जयापरी ।। 740।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील, हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही.
शालेय जीवनात आम्ही शिकलो दर दहा किलोमीटरवर भाषेत फरक पाहायला मिळतो. भारतात अनेक बोली भाषा पूर्वीच्या काळी बोलल्या जात होत्या. पण त्यातील अनेक भाषा आज लुप्त झाल्या आहेत. भाषेची अशी ही अवस्था कशामुळे झाली आहे ? त्याचा विचार केला तर असे लक्षात येईल की या भाषांनी काळानुसार बदल स्वीकारलेला नाही. आज दर दहा दिवसांनी नवे तंत्रज्ञान बाजारात आलेले पाहायला मिळते. तंत्रज्ञान विकासाचा वेग अफाट आहे. पूर्वी सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयाकडे चकरा माराव्या लागत होत्या. आता आपल्या मोबाईलवरही सातबारा मिळू लागला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात रोज काही-ना-काही नवीन तंत्रज्ञान येत आहे. या तंत्रज्ञानात आपण गुरफटून गेलो आहोत.
तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. पण या तंत्रज्ञानाचा वेग या भाषांना पकडता आला नाही. यामुळे त्या भाषा आता लुप्त होताना पाहायला मिळत आहेत. सांगण्याचा उद्देश हा की तंत्रज्ञान आपणाला खायला लागले आहे. आपण तंत्रज्ञानानुसार आपल्यामध्ये बदल करायला हवेत. हा बदल स्वीकारायला शिकले पाहीजे. तंत्रज्ञानाच्या प्रकाशात आपण चालायला शिकले पाहीजे. तंत्रज्ञानाचा दिवा आपणाला घालवता येणे शक्य नाही. तो दिवा घालवण्याचा प्रयत्न केला तर आपणालाच तो दिवा जाळून टाकणार हे लक्षात घ्यायला हवे. दिवा घालवण्याचा प्रयत्न करायचा नाही तर तो दिवा आपणच होण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा.
या तंत्रज्ञानाच्या युगात टिकायचे असेल तर आपण ते तंत्रज्ञान स्वीकारायला हवे. या तंत्रज्ञानाने भाषेचा विकास कसा होईल हे पाहायला हवे. ते तंत्रज्ञान आपण आपल्या भाषेत आणण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आपली भाषा टिकणार आहे. अन्यथा आपली भाषा लुप्त होईल हे निश्चित. ज्या भाषेत आपण बोलतो त्या भाषेत तंत्रज्ञानाचा विकास कसा होईल हे पाहायला हवे. यातूनच भाषेचे संवर्धन होणार आहे.
ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले तत्त्वज्ञान हे अमर आहे. चिरकाळ टिकणारे आहे. गीतेप्रमाणे ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी नित्यनुतन तत्त्वज्ञान मांडते आहे. बदलत्या काळातही ती नित्यनुतन वाटते. आपलीशी वाटते. त्यामुळे ती अमर आहे. तिच्या जीवंतपणामुळे मराठी भाषेलाही अमरत्व प्राप्त झाले आहे. तंत्रज्ञान जसे रोज नित्य नुतन आहे. तशी ओवीही नित्य नुतन वाटते. ज्ञानेश्वरी हे बोधामृत आहे. त्यातून बोध घ्यायचा आहे. काळ बदलला, जग बदलले तरी त्यातील तत्त्वज्ञान तेच आहे पण ते नित्यनुतन आहे. बदलत्या काळातही ते लागू पडणारे आहे. म्हणूनच ते शाश्वत आहे.
यासाठी या ज्ञानाचा दिवा आपण होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यावर फुंकर मारून तो घालवण्याचा प्रयत्न केला तर तोच आपणाला जाळून टाकण्याचा धोका आहे. हे ओळखायला हवे. त्याचाशी खेळण्या ऐवजी त्याच्या प्रकाशात चालण्याचा प्रयत्न करायला हवा. ज्ञानाच्या दिव्याचा प्रकाश अनेकांना मार्गदर्शन करतो. यातून अनेक दिवे निर्माण होऊ शकतात. हे सर्व दिवे प्रकाशमान झाले तर आपले जीवनही प्रकाशमान होईल. यासाठी दिव्याशी न खेळता त्याच्या प्रकाशातून स्वतः प्रकाशमान व्हायचे आहे.
सूर्य आपण गिळायला गेलो तर आपण भाजून मरून जाऊ. यासाठी तो गिळण्या ऐवजी आपणच तो सूर्य व्हायचे आहे. म्हणजेच आपण आत्मज्ञानी व्हायचे आहे. हा सूर्य, हा प्रकाश प्रत्येकामध्ये आहे. तो प्रकाश ते चैतन्य ओळखून आपण स्वतः सूर्यासारखे प्रकाशमान व्हायचे आहे. म्हणजेच आत्मज्ञानी व्हायचे आहे आणि त्यातून इतरांनाही आत्मज्ञानी करायचे आहे.