October 22, 2024
The auspicious tradition of Mangalgaon Palkhi which awakens the people of Grama Gita
Home » Privacy Policy » ग्रामगीतेचे जनजागरण करणारी मांगलगावच्या पालखीची मंगलमय परंपरा
काय चाललयं अवतीभवती

ग्रामगीतेचे जनजागरण करणारी मांगलगावच्या पालखीची मंगलमय परंपरा

ग्रामगीतेचे जनजागरण करणारी मांगलगावच्या पालखीची मंगलमय परंपरा

श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांची गेल्या ५६ वर्षांपासूनची परंपरा निश्चितच प्रेरणादायी आहे. या भागात ग्रामगीतेतील जीवनमूल्यांचा विचार जगणारी अनेक माणसे पाहून समाधान वाटते. मांगलगाव ते मोझरी या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गावात राष्ट्रसंतांच्या विचारांचे जनजागरण दरवर्षी या पालखी पदयात्रातून केले जात आहे. त्यामुळे नव्या पिढीत राष्ट्रसंताचा परिवर्तनवादी, ग्रामसुधारणेचा विचार रूजवण्यासाठी निश्चित मदत होते आहे. हे लोककल्याणकारी कार्य सुरू ठेवावे, राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे, ही काळाची गरज आहे.

✍🏻 ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,
शिवाजी नगर , तुकूम चंद्रपूर
Mo. 942218676
brb.rastra@gmail.com

१९४२ सालच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात चमकला तो एकमेव चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका. या तालुक्यातल्या अनेक गावांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पवित्र पदस्पर्श झाला आणि त्यांच्या विचारांनी शेकडो गावे पावन झाली, घडलीत. या गावांपैकीच चिमूर पासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर असलेले कान्पाटेम्पा मार्गावर असलेले मांगलगाव येथे जाण्याचा योग गेल्या विजयादशमी च्या दिवशी आला. तेथे श्री गुरुदेव पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सतराशे लोकवस्तीचे गाव स्वच्छ होते. रंगबेरंगी रांगोळ्यांनी रस्ते सजले होते.

  • The auspicious tradition of Mangalgaon Palkhi which awakens the people of Grama Gita
  • The auspicious tradition of Mangalgaon Palkhi which awakens the people of Grama Gita
  • The auspicious tradition of Mangalgaon Palkhi which awakens the people of Grama Gita

राष्ट्रसंतांचा मांगलगावाच्या भेटीचा इतिहास

हा झाडीचा प्रदेश स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित आहे. राष्ट्रसंताचे शेकडो कार्यक्रम येथील लोकांनी पाहिले आहे, अनुभवले आहे. मांगलगाव येथे वं. महाराज प्रथमतः १० मार्च १९२६ रोजी आले होते. पुढे दहा वर्षांनी दि.२ फेब्रुवारी १९३७ रोजी विठोबा पाटील पाचभाई यांच्या वाड्यात आले होते. ५ एप्रिल १९५० रोजी ते व्यायाम वर्गाचा समारोप करण्यासाठी आले तर ९ नोव्हेंबर १९५३ रोजी भूदान दौऱ्यात येथे धावती भेट दिली. २५ ऑक्टोंबर १९६५ रोजी ते भजन भाषणांच्या निमित्ताने आले होते. ८ एप्रिल १९६८ रोजी ते ग्राम जयंती निमित्ताने त्यांनी या गावात भजनाचा कार्यक्रम केला, ही त्यांची भेट शेवटची ठरली होती.

येथील लोकांनी मात्र राष्ट्रसंतांच्या महानिर्वाणानंतर अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पहिले सर्वाधिकारी कर्मयोगी श्रीतुकाराम दादा गीताचार्य यांच्या मार्गदर्शनात पालखी पदयात्रा मांगलगाव ते मोझरी अशी सुरू केली. या पालखी पदयात्रेस यंदा ५६ वर्ष झालेले आहेत.

यावर्षी ही श्रीगुरुदेव पालखी पदयात्रा गुरूकुंज आश्रमात होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकरिता १२ ऑक्टोंबर २४ रोजी रवाना झाली आणि १९ ऑक्टोंबर २४ रोजी गुरूकुंजात सुखरूप पोहचली. या पालखीच्या प्रस्थान समारंभाचा मला साक्षिदार होता आले.
या पालखी पदयात्रा प्रस्थान समारंभाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केले होते.

गाव परिसरातील भजनी मंडळे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक आणि समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन गावातून सामुहिक रामधुन काढली जाते. या पालखी पदयात्राचे गावातील प्रमुख चार चौकात मोठ्या श्रद्धेने स्वागत करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदन केले जाते. गावातील प्रमुख मार्गावरून जात असताना पालखीचे स्वागत ठाकरेवाडा, रंदये चौक, युवा शेतकरी ग्रुप, ढोणे वाडा या चार ठिकाणी केले जाते. शेवटच्या पालखी पूजन प्रसंगी मान्यवरांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.‌ पालखी पदयात्रा मार्गावर दिवंगत ज्येष्ठ प्रचारक केशवराव म्हैसकर यांचे घर दिसले.

राष्ट्रसंतांनी त्यांचा विवाह दि. ८ एप्रिल १९६८ रोजी येथे सामुहिक विवाह मेळाव्यात लावून दिला होता. ते उत्तम गायक होते. खंजिरी वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. केशवराव म्हैसकर आणि त्यांच्या पत्नी यांचे दिड वर्षांपूर्वी वृध्दापकाळाने निधन झाले. केशवराव यांचे झोपडीवजा घर जणू त्यांच्या सेवाकार्याची गाथा सांगत होते. अनेकदा या घरी प्रचारकार्याच्या निमित्ताने ज्येष्ठ श्री गुरुदेव सेवक अर्जुन आर्य भारतीय मुक्कामी असत.

पालखीची ५६ वर्षांची परंपरा

श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांची गेल्या ५६ वर्षांपासूनची परंपरा निश्चितच प्रेरणादायी आहे. या भागात ग्रामगीतेतील जीवनमूल्यांचा विचार जगणारी अनेक माणसे पाहून समाधान वाटते. मांगलगाव ते मोझरी या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गावात राष्ट्रसंतांच्या विचारांचे जनजागरण दरवर्षी या पालखी पदयात्रातून केले जात आहे. त्यामुळे नव्या पिढीत राष्ट्रसंताचा परिवर्तनवादी, ग्रामसुधारणेचा विचार रूजवण्यासाठी निश्चित मदत होते आहे. हे लोककल्याणकारी कार्य सुरू ठेवावे, राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे, ही काळाची गरज आहे. सरपंच प्रफुल कोलते, पालखी प्रमुख भानुदास रदंये आदी युवकांनी या पालखी पदयात्रेचे सुक्ष्म नियोजन केले गेले. राष्ट्रवंदना गायन आणि सहभोजनाने पालखी प्रस्थान सोहळ्याचा समारोप झाला. या सोहळ्यात सर्व समाजाचे महिला पुरुष मंडळी मोठ्या आस्थेने सहभागी झाले होते. गावात एकंदरीत दिवाळीसारखे चित्र दिसत होते.

पालखी पदयात्रेचे मार्ग

मांगलगाव येथून निघालेली पालखी भिसी, बोरगांव (बुटी), चिचुली, मालेवाडा, पायमी (चिंचाळा), ठाणा, उमरेड, उदासा, हळदगाव, नागपूर (सेवाश्रम), ठाणेगाव, कारंजा (घाडगे), तळेगाव (शामजी पंत), भारवाडी, तिवसा या मार्गाने श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे पोहचली.आश्रमात २१ व २२ असे दोन दिवस मुक्काम केल्यानंतर मोझरी वरून कौंडण्यपूर, आर्वी, सुकळीबाई, सुरगाव, पवणार, सेवाग्राम (आश्रम), मांडगाव, समुद्रपूर, पाईकमारी, गिरड, भिसी, आंबेनेरी, जांभूळ घाट, मेटेपार या मार्गाने परत मांगलगाव येथे ३१ ऑक्टोंबर २४ रोजी पोहोचेल. विशेष म्हणजे कर्मयोगी श्रीतुकाराम दादा गीताचार्य यांनी सुरू केलेली अड्याळ टेकडीची पालखी व मांगलगावची पालखी नेहमीच ठाणा येथे एकत्र येऊन मोझरी कडे मार्गक्रमण करीत असते.

पालखी पदयात्रेचे उद्दिष्ट

गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावे हे राष्ट्रसंतांचे स्वप्न होते. त्यामुळे प्रत्येक गावात ध्यान – प्रार्थना, ग्रामसफाई, सामूहिक श्रमदान, ग्रामोद्योग, अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट प्रथा निर्मूलन, सामूहिक विवाह, आरोग्यधाम, ग्रामसभा ग्रामसंरक्षण दल, व्यसनमुक्ती, ग्रामगीताप्रणित विभिन्न प्रयोग, महिला संघटन, युवा संघटन स्थापन करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गावी पालखीचा मुक्काम असतो, त्याच्या गावी ग्रामगीता प्रणित प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामगीता ग्रंथात सांगितलेल्या प्रमाणे
” उद्योगाच्या सुंदर कला ! वाद्यकलादी व्यवहार कला ! माणुसकीच्या आचार कला! योजाव्या तेथे !! “

“माणसाने मार्गी कैसे चालावे !
कैसे बसावे, कैसे बोलावे? ! आपुले वर्तन कैसे ठेवावे !
घरात आणि समुदायांत !!”

“याचा सुंदर पाठ द्यावा !
सर्वांचे ऐक्य शिकवावे गावा! यात्रा-उत्सवे संचार व्हावा !
नवतेजाचा सर्वांमाजी”
!! ग्रामगीता !!
या उद्दिष्टाने ही पालखी दरवर्षी पदयात्रा ‘चैरवती चैरवती ‘ प्रमाणे सुरू आहे , मांगलगावच्या श्रीगुरुदेव भक्तांच्या मंगलकार्य निष्ठेला जयगुरू….


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading