March 18, 2025
Cover of Bandhavarchi Jhade by V.N. Shinde, a book on the beauty and spread of trees in nature.
Home » झाडांच्या पसाऱ्याचा मनोहारी पिसारा : बांधावरची झाडे !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

झाडांच्या पसाऱ्याचा मनोहारी पिसारा : बांधावरची झाडे !

‘बांध’ शब्द उच्चारला की दोन शेतामधील असणारी धाव दिसते. दगडमातीचा रचलेला एकसारखा ढिग- आपापल्या हद्दी समजाव्यात, ज्यावरून ये-जा करण्याचा पायवाटेचा मार्ग म्हणजे बांध. कधीकधी रानातील जनावरांना उकरण्यासाठी, लपण्यासाठीची ताल समोर येते. बांधाला ‘ताल’ हा शब्दही वापरतात. बांधावर शेतकरी सावली मिळावी म्हणून छोटीमोठी, विविध तऱ्हेची झाडे लावतात. अशाच विविध झाडांतील १० झाडांना आपल्यासमोर आणण्याचे काम केले आहे डॉ. व्ही.एन. शिंदेंनी. त्यांच्याद्वारे लिखित ‘ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी’ अर्थात ‘बांधावरची झाडे’ ग्रंथातून…

डॉ. नगिना माळी, समन्वयक, ऑनलाईन एमबीए,
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
इ-मेल – naginamali2012@gmail.com भ्रमणध्वनी – ८९७५२९५२९७

ग्रंथाचा लेखनपसारा झाडांच्या पसाऱ्याप्रमाणेच दिसतो. पुस्तकाचे वेगळेपण, पुस्तक वसंत आबाजी डहाके यांच्या झाड कवितेला अर्पण केले, येथूनच सुरू होते. मात्र अर्पणपत्रिका, प्रस्तावना किंवा अंतरिचे धावे यांच्याकडे न वळता सरळ बोरपुराणाकडे येऊ. रानमेवा म्हणून ओळखले जाणारे हे झाड. लेखकाने बोरास असलेली विविध भाषेतील नावेही दिली आहेत. जसे की बाएर, बादरी, बोरोई, कुल वगैरे. या बोरीची वैशिष्ट्ये, रूप, गुण, बिया, त्यांचा उपयोग, बिया रूजण्याची प्रक्रिया, रोपे, मूळ, रूंदी, आवश्यक जमीन, वातावरण, पाने, त्यांचा रंग, फुले, त्यांचा सुगंध आणि त्यावर आकर्षित होणारे कीटक इथपर्यंत सर्वकाही लिहिले आहे. सोबत बोराच्या फळांपासून होणारी मद्यनिर्मिती, कोशिंबीर, चटणी आणि लोणच्याच्या चवीसह पौष्टिकता दाखवून दिली आहे. लाकडाचा टिकाऊपणा, काटेरीवृत्ती आणि त्याचा सर्वसामान्य लोकांस होणारा फायदा अगदी जवळून मांडला आहे सोबत बोरन्हाण सांगायलाही विसरलेले नाहीत. एक महत्वाचा भाग बोरीविषयी मांडला आहे तो म्हणजे, बोरे खातखात जंगलात गेले कि, झोप येत नाही, माणूस सावध राहतो. आदिवासी तुळशीच्या लग्नात बोराची फांदी ठेऊन पूजा करतात. बद्रीनाथ येथे १०-१५ फूट बर्फ पडतो मात्र बोराची झाडे वाढतात. सोबत वेगवेगळ्या कथाही आहेत जसे कि आजोबा आणि नातू, आजी आणि कोल्ह्याच्या रोजच्या बोर खाऊन दारात घाण करण्याच्या सवयीवर तिने शोधलेला उपाय. बोरीचे झाड आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी बोरीच्या झाडाने पालखी अडकून महाराजांना धनाचे भांडार उपलब्ध करून दिले. लेखकांनी विविध उपमांनी, उपायांनी सजवलेली काटेरी बोर हल्ली मात्र केवळ नजर उतरविण्यापुरती उरू नये.

‘चवदार भाजीचा हादगा’ अगदी सहजपणे मांडला आहे. याच्या बीया रूजविण्यासाठी थंडी टाळावी लागते. जो हादगा हेथ, अगाथी, अगासे, ककनतुरी, बकफुल, अविसी अशा नावाने परिचित आहे. हादग्याची फुले भाजी बनवण्यास योग्य आणि मांसाहार विसरायला लावणारी. त्याच्याविषयी लेखक मांडतात, शोभेचे झाड ते कारण, पोपटी रंगाच्या शेंगा मन आकर्षून घेतात. आजच्या पिढीला माहीत नसणारा हादगा, त्याच्या विस्कटलेल्या वैशिष्ट्यांसह एकत्रित बांधला आहे. हादगा हा उत्सव आणि हादग्याचा पाऊस यांच्या नावाशी साम्य असावे हे नक्कीच! सोबत एक लोककथा मांडली आहे. शंकर व पार्वती सारीपाट खेळताना, हरलेल्या शंकरास पार्वती चिडवू लागली. रागात शंकर जंगलात गेल्याने त्यास शोधण्यास पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेतले. पुढे शब्दाशब्दांचा अपभ्रंश होऊन ते दोघे भुलाबाई, भुलोबा झाले. हादगा उत्सवात त्यांची मूर्ती ठेऊन पूजा होते.

आधी हिरवट आणि पिकल्यावर जांभळे दिसणारे, अनेक आजारावर रामबाण उपाय ठरणारे म्हणजे जांभूळ भेटते ‘जांभूळ आख्यान’मध्ये. जांभूळ झाडांविषयी लेखक लिहितात, हा एक वृक्षराज आहे. हे झाड टणक आणि अनेक फांद्यायुक्त असते, पाने चकाकणारी आणि १५-१६ इंचाचा बुंधा खरबरीत सालीचा असतो. झुपकेवजा वाढणारी फळे स्वादिष्ट असतात. म्हणूनच पक्षीही याला खायचे सोडत नाहीत. जांभूळ रक्त शुद्ध करते, साखर वाढीवर उपाय ठरतेच, शिवाय पानांमध्ये ‘ई’ जीवनसत्व असते. याच वैशिष्ट्यांमुळे विविध चित्रपटातही तिचा उल्लेख येतो. अनेकांनी यावर केलेल्या गीतरचनाही दिल्या आहेत. जांभूळाविषयी लेखकाने स्वतःचा अनुभव मांडला आहे. जून महिन्यात शनिवारी शाळा सुटली कि सरळ जांभूळ खायला गेलेले लेखक घरी वेळाने आले. वडिलांनी ‘वेळ का’ विचारल्यावर ‘थेट घरीच आलो’, असे खोटे सांगितले. पण जीभ बाहेर काढण्यास सांगितल्यावर चोरी पकडली आणि खणकन कानावर बसली. यातून खोटे न बोलण्याची शिकवण मिळाली.

शेवग्याच्या पानांची भाजी आणि शेंगांची आमटी न आवडणारा माणूस क्वचितच. अरण्यात भारतीय उपखंड, आफ्रिकन खंड आणि अरबस्तानात ओळखीचा असणारा, ‘घराघरातील आवडीचा शेवगा’. जो शिवगा, सेग्रा, सरिंजना, गुग्गल, मोचका अशा हास्यमय नावांने ओळखतात. लेखक याची ओळख करून देताना म्हणतात, पौष्टिकतेचा गुण, जनावरात विशेष प्रिय, पाने छोटी असण्याने पटकन गळणारी व पोकळ, ठिसूळ बुंधा. त्यामुळे पटकन कोलमडणारा. हिरवट तपकिरी रंगांच्या शेंगा ज्या खाण्याने दात साफ आणि टणक बनतात. संधिवातावर उपाय तर आहेच, शिवाय यांच्या फांद्यातून येणारा डिंकही महाग असतो. लाकडाचा वापर जळण म्हणून होत असला तरी बहुउपयोगी ठरणारे हे झाड. पण शेत व्यापतो म्हणून याच्याविषयी शेतकऱ्यांच्या मनात तितकी प्रियता नसल्याने, तोडण्याचे प्रमाणच जास्त. ‘दारासमोर नको’ अशा अंधश्रद्धाचा बळी असला तरी, हल्ली संकरित शेंगामुळे सर्वत्र मिळतो. शेवग्याची कथाही दिली आहे, पाहुण्यांना उद्यमी बनण्यासाठी मेहुणा शेवगा कापतो. शेवग्याच्या शेंगा रोज विकून सुखाने राहणाऱ्या, यापेक्षा काहीच न करणाऱ्या कुटुंबाच्या अंगणातील शेवग्याचे झाड मेहुणा रात्री कापतो. मेहुण्याचा पाणउतारा करून, ते ‘आता आपण जगायचे कसे’ या विचारात शेती करण्यास सुरुवात करतात. अनेक वर्षे पड्लेली शेती जोमाने पीक देते. ज्यामुळे कुटुंब सधन झाले. तोपर्यंत शेवगाही फुटला. त्याच्या शेंगा विकून पैसे आले. मेहुण्यास परत घरी बोलावून स्वागत-सन्मान केला.

चिंच शब्द उच्चारताच कोणाच्याही तोंडाला पाणी येणारच, अशीच ‘आंबटगोड चिंच’ लेखकाने मांडली आहे. मोठ्ठा पसारा असणारी, वाकड्या आकाराचे फळ देणारी, दणकट आणि टणक बुंधा, फांद्या व त्यांचा रंग तपकिरी, काळपट असणारे हे झाड. मध्ये देठ आणि बाजूने भरपूर छोटी, छोटी पाने अशी ही चिंच, इमली, आम्लिका, टामारिंग म्हणून परिचित. बियांना चिंचोके म्हणतात. त्यांचा खेळात वापर होतो, अशी सर्वंकश माहिती लेखक देतात. बिया, फूल, फुलांचे उपयोग, झाडाचे उपयोग मांडले आहेत. शिवाय चिंचेच्या उपमाही सांगितल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात आपल्या पसाऱ्याखाली सावली देणारी ही चिंच मधमाशांची पोळीही जपते. चिंचेच्या कहाण्या सांगताना ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ हि म्हण, चिंचेमुळे आली असावी असे सांगतात. चिंचेने लाकूड तोड्यास कुऱ्हाडीला दांडा दिला तर त्याने वाळलेली लाकडे तोडीत सर्व हिरवी झाडे तोडली. जंगल गेले आणि सर्व झाडे, लाकूडतोड्याची दया आलेल्या चिंचेला दोष देत राहिले. भूत चिंचेच्या झाडावर राहते याची कथाही आहे. ज्यात व्यापारी चिंचेच्या झाडावर भूत नाही सांगून, सिद्ध करतो म्हणतो. ही कथाही गावागावात ऐकायला मिळणारी.

फळांचा राजा ‘आंबा’, आबालवृद्धांचा लाडका. आंब्याचा इतिहास उलगडला आहे. त्याची लागवड भारतीय उपखंडातील. आंब्याच्या फळातील बी म्हणजे कोय. ज्यातून रोप तयार होते. आंब्याचा ऋतू उन्हाळा आहे. पाडाचे आंबे काढणे, पिकवणे हे कष्टाचे व कौशल्याचे काम. त्यात ‘आडी’ ओळखणे मुश्किल. सोबत आंबा औषधी झाड म्हणून परिचित. आयुर्वेदामध्ये नावाने आधी व वजन वाढविण्यात पुढे, तेव्हा तो कसा खावा, ते ठरवावे. आंब्याचा उल्लेख साहित्यात दिसतो आणि मग चित्रपटसृष्टी दूर कशी राहील! आंब्याच्या आठवणीत लेखकांचे बालपण भरलेले होते. त्याच्या कोया खेळताना वेळ जाई. कालांतराने घराच्या वाटण्या झाल्या मात्र वाटणीमध्ये १३ झाडे सामायिक ठेवली. आंब्याचा आनंद चोखून खाण्यात मिळे. पुढे आईने लोणचे घालणे व खार भाकर खाणे आवडीचे. उत्पनाचे साधन म्हणून ठरणारा आंबा अवर्णनीय. आंब्याचे स्थान लग्न समारंभापासून, पुजेपर्यंत सर्वत्र उपयोगाचे ठरले. सर्वात मोठे हे प्रकरण आहे.

आंबट, तुरट आवळा, जो बहुगुणी, औषधी आहे. याचेही नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. गोटीच्या आकाराचा. जाळीदार, नक्षीदार. याच्याविषयी लेखक लिहितात, याची लागवड बियांपासून करतात. औषधी, उंच उंच वाढणारे, तुरटपणामुळे तोंड वाकडे-तिकडे करायला लावणारे, पण केसासाठी उपयुक्त, क-जीवनसत्व देणारा आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा हा आवळा. तुलसी विवाहात याची जागा आधी. याचा उल्लेख महाभारतापासून एकादशी, नवमी, सरस्वती, विष्णू, दिपावलीमध्ये कुठे ना कुठे येतोच. अर्थात काय तर आवळा हा छोट्या फळांचा मात्र मोठ्या किर्तीचा ठरतो. ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ वाक्यप्रचारही आला. त्याची कथा ‘ज्ञानी होण्यासाठी कष्ट आवश्यक आहेत. त्यास कोणताही मधला मार्ग नसतो’, असे सांगणारी.

कडुलिंब त्याच्या नावावरूनच कडू चविचा, पण लेखक याला गोड म्हणतात, ते त्याच्या बहुविध गुणांमुळे. अर्थात नावात काय आहे. पाडव्याला ज्याचा मान, धनत्रयोदशीला खाल्ला जाणारा संयुक्त पानांचा, धान्याला किडण्यापासून वाचवणारा, त्वचारोगावार उपाय, टिकाऊ लाकूड, तेलाचे बहुविध उपयोग, दंतविकारापासून सुटका अशी अनेक गुणधर्म असणाऱ्या कडुलिंबाला गोड कोण नाही म्हणणार. म्हणूनच लेखकाला कडुलिंब, सज्जन माणसाप्रमाणे उभा असणारा वाटतो. कडुलिंबाचा गुण सांगताना म्हणतात, सायंकाळी सौभाग्यवतीसह घरी जाताना पशुपालकाने आपल्या बैलाच्या वेगासाठी शेपूट पिरघळली, ज्याने तो बैल स्कुटर सोबत लेखकाच्या पायावर पाय देऊन गेला. जखमा भरण्यासाठी देवर्षीच्या सांगण्यावरून त्यांनी कडुलिंब, हळद आणि कढीपत्ता कुटून लावला. या प्रयोगाने जखम बरी झाली.

बाभूळ म्हटले की तिचा पसाराच पसारा, विखुरलेल्या फांद्या. मोठमोठ्या काटेदार झुडुपावर अनेक पक्षी घरटी करतात. रातकिडे काट्यांच्या घरात किरकिर आवाज करतात. लोकांना न आवडणारे झाड असले तरी ती वेडी नव्हे तर शहाणी बाभूळ असे लेखक म्हणतात. याचे कारण म्हणजे बाभळीला उगवण्यासाठी कोणत्याही प्रकारची माती चालते. वेगाने वाढत नसली तरी अनेक वर्ष जगते. अगदी बुंध्याचा रंग काळा होईपर्यंत. चेहरा व हातापायावर सुरकुत्या पडलेल्या वृद्धाप्रमाणे ती दिसते. पाने कमी फांद्या आणि काटे भरमसाठ. संयुक्त पानांनी न बहरणारी पण ऊन, वारा पावसात ताठ उभी. बाभळीच्या पानाला शेळ्या-मेंढ्या आवडीने खातात. बाभळीच्या फांद्यांपासून दातवन बनवतात. त्यांने दात घासतात. महत्त्वाचे म्हणजे बाभळीच्या छायेत जाताना काटे टोचतील असे वाटले तरी लाकूड टणक. पूर्वीचे लोक घरासाठी बाभळीचेच लाकूड वापरायचे. बाभळीच्या शेंगाही अगदी दणकट, न फुटणाऱ्या. ज्या गावाकडे सरपण म्हणून वापरतात. बाभळीचा डिंक बहुगुणी, पण लोक बाभळीला काटेरी म्हणून तोडतात. बाभुळचे झाड अव्वा कि सव्वा, वेडेवाकडे वाढते, तरी चोर-पोलीस खेळ, काटा काढणे हि म्हण बाभळीमुळेच आली असल्याचे सांगतात.

सागाचे झाड म्हटले की समोर येतात मोठमोठी पाने, येणारा झुबकेदार मोहोर आणि त्यातून गोट्यास्वरूपात येणारी फळे. कणखर सागाशिवाय फर्न‍िचरला पर्याय तो कोणता. सागवान झाडाचे वर्णन करताना, मुळांना फुटवे फुटूनही रोपे येतात. पाने भरदार, नक्षीदार, जाळीदार, त्यामुळे सावली देणारे झाड. कोवळ्या पानाला चुरघळले तर हात लाल करण्याचा गुण. यामुळे याचा वापर मुली मेहंदीसारखा करतात. महत्त्वाचे म्हणजे तो पावसाळ्यात खुलतो. थंडीत मात्र पाने टाकतो. पण अवाढव्य मोठमोठ्या फांद्या असणारा सागवान उंचउंच वाढतो. शेती तर केलीच जाते, उत्पन्नाचे साधन म्हणून याची लागवड करतात.

अशा वेगवेगळ्या दहा झाडांबाबत अचूक माहिती देणारा हा लेखनग्रंथ २०० पानांचा आहे. लेखकाने प्रत्येक झाड, त्याची विविध नावे, त्याची लागवड, जमीन, पाने, फुले, उपयोग, लाकूड, त्या झाडांकडे आकर्ष‍ित होणारे प्राणी, पक्षी, विविध ऋतूत त्याचे रूप आणि सोबत लेखकाच्या आयुष्यात आलेल्या त्या झाडांविषयीचे किस्से, प्रसंग मांडले आहेत. भारतीय संस्कृतीत आलेले संदर्भ, उत्सव मांडणे अवाकच! पर्यावरणाविषयी जवळिकता साधण्यास मूलांपासून प्रौढापर्यंत पर्यावरण जाणीव जागृती आपला इतिहास समजून देण्यास हा ग्रंथ नक्कीच यशस्वी होईल.

पुस्तकाचे नाव – ओळखीच्या झाडाच्या अनोळखी गोष्टी
लेखक – डॉ. व्ही.एन. शिंदे
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन
पृष्ठे – २००
किंमत – रू. २६०


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading