कृषीसल्लाः भुईमुगााचे अन्नद्रव्य तर सूर्यफुलाचे खत व्यवस्थापन
भुईमुग🥔🥔
अन्नद्रव्य व्यवस्थापन
✨सेंद्रिय खते
एकरी २ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवणीआधी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होते. त्याचबरोबर जमिनीची जलधारण क्षमता वाढते. जमिनीतील लाभदायक सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाते. शेणखतातून महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन पीकवाढीवर चांगला परिणाम दिसून येतो.
✨रासायनिक खते
पेरणीवेळी १० किलो नत्र (२१ किलो युरिया), २० किलो स्फुरद (१२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), २० किलो पालाश (३३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) एकरी द्यावे. भुईमुगास नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये आवश्यक असतात. त्याचबरोबर सल्फर व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. त्यामुळे स्फुरद हे अन्नद्रव्य सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या माध्यमातून द्यावे. त्याचप्रमाणे पेरणीवेळी ८० किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे; तर ८० किलो जिप्सम हे आऱ्या सुटताना द्यावे, जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण आणि एकूणच उत्पादनात वाढ होते.
माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, पेरणीवेळी एकरी फेरस सल्फेट ८ किलो, झिंक सल्फेट ८ किलो व बोरॉन २ किलो द्यावे.
✨जैविक खते
जमिनीत नत्र स्थिरीकरणासाठी रायझोबिअम जिवाणू संवर्धकाची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. स्फुरदाची उपलब्धता वाढविण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू संवर्धकाची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
सुर्यफुल 🌻
खत व्यवस्थापन
सूर्यफुल पेरणीपूर्वी दोन आठवडे अगोदर जमिनीमध्ये एकरी ८ ते १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. बागायती सूर्यफुल पिकास एकरी २४ किलो नत्र (११४ किलो अमोनियम सल्फेट), १२ किलो स्फुरद (७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व १२ किलो पालाश (२० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) खतमात्रा आवश्यक आहे. पेरणी करतेवळी ५० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश जमिनीत मिसळावे. उरलेला नत्राचा हप्ता पेरणीनंतर ३० दिवसांनी व ६० दिवसांनी असा दोनवेळा विभागून द्यावा. माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत खतमात्रेत आवश्यकतेनुसार बदल करावेत. रासायनिक खतांच्या कार्यक्षम उपयोगासाठी पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. पेरणी करताना वरच्या छिद्रातून बियाणे, तर खालच्या छिद्रातून रासायनिक खते पेरावीत. पिकास नत्राची मात्रा अमोनिअम सल्फेटमधून आणि स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास या खतांमधून सल्फर व कॅल्शिअम या दुय्यम अन्नद्रव्यांच्या पुरवठा होऊन तेल व दाण्यांचे उत्पादन अधिक मिळते.
(सौजन्य – कृषक )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.